श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ विठ्ठलाचे पायी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ज्यांचे काळजाचे तुकडे देशाच्या सीमांवर प्रत्यक्ष मृत्यूसमोर अहोरात्र उभे असतात, त्यांच्या डोळ्यांची आणि गाढ झोपेची ओळख खूपच पुसट झालेली असते. रात्रीचा दीड एक वाजला असेल. भाऊंना तशी नुकतीच झोप लागली होती. एखादा डुलका झाला की बाकी वेळ ते जागेच असायचे. त्यांचे चिरंजीव बजरंग आणि त्यांचे सर्वच कुटुंब,गाव त्यांना ‘ भाऊ ‘ म्हणून संबोधत असे. बजरंग फौजेत भरती होऊन तसे स्थिरावला होते. पत्नी,दोन मुलं असा संसारही मार्गी लागला होता. नोकरीची वर्षेही तशी सरत आलेली होती. लवकरच कायम सुट्टी येण्याचा, सेवानिवृत्ती पत्करण्याचा त्यांचा विचार होता. बाकीच्या वेळी अजिबात आवश्यकता पडत नसतानाही केवळ धाकटे चिरंजीव बजरंगराव आणि बाहेरगावी नोकरीत असलेले थोरले चिरंजीव यांचेशी बोलता यावं, त्यांची ख्यालीखुशाली कळत राहावी,म्हणून भाऊंनी घरी टेलिफोन बसवून घेतला होता.
टेलिफोन खणाणला तसे भाऊ ताडकन झोपेतून जागे झाले व उठले. वयोमानाने त्यांच्या पत्नीला ऐकायला कमी यायचे. त्यांच्या पत्नी म्हणजेच बजरंग यांच्या आईसाहेब या आवाजाने जाग्या झाल्या नाहीत. तिकडून बजरंग फोनवर होते. त्याकाळी मुळात सैनिकांसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था नव्हती. जी काही व्यवस्था होती ती पुरेशी नव्हती. सीमावर्ती भाग आधीच दुर्गम. त्यातच सीमेवर युद्धाचे काळे ढग जमा झाल्याचे दिवस. टेलिफोन करण्यासाठी काही तास लागायचे आणि अर्थातच प्रत्येकालाच घरच्यांशी बोलायचे असायचे! पत्रांतून फार काही लिहिता येत नसे. आणि लिहिलेली पत्रे घरांपर्यंत पोहोचायला उशीर तर लागायचाच!
बजरंग यांचा फोन करण्याचा नंबर रात्री दीड वाजता लागला! एवढ्या उशीरा फोन करण्याचं कारणही तसंच होतं. बजरंग यांची पलटण अंतिम लढाईला निघायची होती. परत येण्याची शाश्वती कधीच नसते! चार शब्द बोलून घ्यावेत, निरोप द्यावा म्हणून बजरंगरावांनी घरी फोन लावला होता. त्यांची पत्नी त्यावेळी ग्वाल्हेरला असल्याने तिच्याशी बोलणे शक्य नव्हते.
सैनिकाला घरी सर्व काही सांगता येत नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गुप्तता पाळावी लागते. बजरंगराव एरव्ही खूप कठीण काळजाचे…वागण्यात कडक! कर्तव्यात वैय्यक्तिक भावनांचा अडसर येऊ न देणारे शिपाई गडी! पण आज त्यांचा स्वर कातर होत होता..त्यांच्या मनाविरुद्ध! फोनवर फार वेळ बोलताही येणार नव्हते आणि काय बोलावे ते समजतही नव्हते! फोन ठेवताना शेवटी बजरंगरावांच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले… ” माझ्या पोरांना चांगलं शिकवा!”
भाऊ आता खडबडून जागे झाले होते! बजरंगराव आधी असे कधी काही बोलल्याचे त्यांना आठवेना. आजच असं काय झालं असावं, की त्यांनी ही निरवानिरवीची भाषा बोलावी? फोन बंद झाल्याने काही उलगडाही होईना! पत्नीला उठवून हे सांगावं असं त्यांना वाटेना. ती बिचारी आणखीनच काळजीत पडेल!
भाऊंनीं डोळे मिटले…पांडुरंगाला स्मरत हात जोडले आणि स्वत:शीच काही पुटपुटले. आणि उठून ते देवघरातल्या पांडूरंगाच्या तसबिरीपाशी गेले. अबीर कपाळावर लावला आणि सकाळची वाट पहात डोळे मिटून पडून राहिले….पण डोळ्यांसमोरून बजरंग काही हलत नव्हते. तसा ते सुट्टी संपवून ड्यूटीवर जायला निघाले की, त्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. पण ते दाखवायचे नाहीत वरवर. कामाला निघालेल्या माणसाचे चित्त दु:खी करू नये, असा त्यांचा विचार असे. बाकी एकांतात किती आसवं ढाळत असतील ते विठ्ठलालाच ठाऊक! सैनिकांच्या आई-बापांची,पत्नी,मुलांची, बहिण-भावांची अशीच तर असते अवस्था!
आषाढी वारीचे दिवस होते. एरव्ही शेतांमधल्या विठ्ठलाची सेवा करण्यात मग्न असलेल्या भाऊंनी यंदा वारीला जाण्याचे ठरवले. ते समजल्यावर गावातल्या माळकरी मंडळींनाही आनंद झाला. बघता बघता सात वर्षे गेली. इकडे फौजेत कर्तव्य बजावणारे बजरंगराव अनेक जीवघेण्या संकटांतून सहीसलामत बचावले….शत्रूने शेकडो गोळ्या डागल्या…पण कोणत्याही गोळीवर बजरंग हे नाव नव्हतं! उलट त्यांच्याच गोळ्यांवर दुष्मनांची नावे ठळक होती. घरी सुट्टीवर आले की ते दिवस कधी संपूच नयेत,असे वाटायचे सर्वांना…भाऊंना तर जास्तच!
त्यांनी पंढरीची वारी सुरू केल्याला यंदा सात वर्षे पूर्ण होणार होती. खरे तर आधी ते आपल्या मोठ्या जिगरीने कमावलेल्या आणि राखलेल्या शेत-मळ्यातच विठ्ठल शोधायचे सावता महाराजांसारखे. गळ्यात तुळशीमाळा होतीच त्यांच्या जन्माच्या पाचवीला त्यांच्या वडिलांनी आवर्जून घातलेली.
कालांतराने तब्येत ठीक नव्हती तरी भाऊंनीं हा नेम मोडला नव्हता. ‘कशाला पायपीट करता एवढी. खूपच वाटलं तर एस.टी.नं जात जावा की’ असं बजरंग म्हणायचे तेंव्हा भाऊ फक्त हसायचे आणि म्हणायचे…तो चालवत नेतोय तोवर चालायचं!
यंदा भाऊंची सातवी वारी.एक तप पूर्ण करायचं होतं. चालवत नव्हतं तरी भाऊ नेटाने माऊलींसोबत निघाले. बजरंग या वर्षी फौजेतून कायमसाठी घरी यायचे होता. आणि येण्याचे दिवस जवळ आले होते. पण तरीही भाऊ वारीला निघून गेले…बजरंग आणि पांडुरंग त्यांच्यासाठी कुणी वेगळे नव्हते.
आषाढी झाली…पालख्या माघारीच्या रस्त्याला लागल्या. गावातल्या दिंड्या मिळेल त्या वाहनांनी लगोलग माघारी निघाल्या. बजरंग त्या सकाळीच सुट्टीसाठी घरी पोहोचले होते. संध्याकाळच्या सुमारास दिंडीचा ट्रक गावात पोहोचला. भाऊ घराकडे निघाले…थोडे थकले होते, चेहरा काळवंडला होता उन्हातान्हानं, पण त्यावर समाधान झळकत होतं. एक देवाचा वारकरी आणि एक देशाचा धारकरी असे दोघे एकाच दिवशी घरी आले होते…हा योगायोग!
बजरंगरावांनी वडिलांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवले…’देवा,विठ्ठला.. पांडुरंगा!शब्द राखला तुम्ही!’ भाऊ उद्गारले!
रात्री भाऊंचे पाय चेपताना बजरंग म्हणाले,”भाऊ,आता तुमच्याच्यानं चालवत नाही. बास झाली आता वारी!”
“आणखी आठ वर्षे वारी करणार काहीही झालं तरी! ‘ देह जावो अथवा राहो..पांडुरंगी दृढ भाव!’… पूर्ण होऊ दे नवस माझा! बजरंगरावांना काय किंवा घरातल्या इतर कुणाला काय, नवसाचं काही माहीत नव्हतं. “कसला नवस?” बजरंगरावांनी विचारले.
“त्या दिवशी रात्री तुझा दीड वाजता फोन आला. नीट काही कळालं नाही. पण तू म्हणाला,”पोरांना नीट शिकवा..सांभाळा! ते तुझं बोलणं काळजाला घरं पाडून गेलं. मला माहित होतं, तुला काही उलगडून सांगता येणार नव्हतं. पण मी तर फौजीचा बाप की रे! मला सगळं समजून चुकलं! पोरं लढायला निघालीत….परत नजरेस पडतील की नाही,देव जाणे! म्हणून त्या देवालाच साकडं घातलं…आमच्या सैनिकांना सुरक्षित ठेव…लढाईत त्यांचंच निशाण उंच राहू दे…! पांडुरंगा..तुझ्या बारा वा-या करीन न चुकता! पण माझ्या लेकराच्या पाठीशी उभा रहा!” पांडुरंगाने माझं ऐकलं! आज तू माझ्यासमोर आहेस!” असं बोलताना भाऊंचे डोळे भरून आले होते…त्यांच्या डोळ्यांतून खाली ओघळणा-या अश्रूंच्या धारेत बजरंगराव न्हाऊन निघाले!
दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली असतानाही भाऊंनी ‘ केला नेम चालवी माझा ! ‘ असं विठ्ठलाला विनवणी करीत करीत बारा वर्षांचा नवस फेडला!
(माजी सैनिक आणि पत्रकार श्री.बजरंगराव निंबाळकर साहेब यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्रातील एका प्रसंगाचे हे मी केलेले कथा रूपांतर ! मूळ पुस्तकात या आणि अशा अनेक घटना,गोष्टी आहेत. येत्या सव्वीस-सत्तावीस जुलै रोजी हे आत्मचरित्र प्रकाशित होईल.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈