सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ ‘प्रार्थना असावी अशी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
मनात येणारा प्रत्येक सकारात्मक विचार ही प्रार्थना असते. या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळत असतं. म्हणून आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण असणं आवश्यक आहे.
प्रत्येक विचारानं आपल्या मनात आणि बाहेर तरंग निर्माण होतात. ते सर्वत्र पसरत असतात. प्रत्येक प्रार्थना म्हटली जाताच ती ऐकली जाते, आणि जशी ती ऐकली जाते तसं तिला उत्तरही मिळतं. यासाठी मनातला प्रत्येक विचार सकारात्मक असावा या हेतूनं प्रयत्न करणं अगत्याचेच आहे.
एका दिवाळी अंकात एका ज्येष्ठाने केलेली प्रार्थना वाचली. ” हे प्रभो… आता या वयात, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक विषयावर मी मतप्रदर्शन केले पाहिजे असे नाही. सर्वांना सरळ करण्याच्या सवयीपासून मला सावर…. मला विचारशीलतेचे वरदान दे. प्रभुत्व न गाजविता मी सेवातत्पर असावे. काथ्याकूट न करता मी नेटकेपणाने प्रश्नाला भिडावे. एखाद्या गोष्टीबद्दल दुमत होईल तेव्हा नमते घेण्याची सुबुद्धी मला दे. कधी कधी माझंही चुकतं, हा जीवनाचा मंत्र मान्य करायला शिकव. अनपेक्षित ठिकाणी चांगुलपणा पाहण्याची आणि तिऱ्हाईत व्यक्तीमधील गुणांचा गुणाकार करण्याची निर्मळ नजर दे आणि हे प्रभो, सदा सर्वांबरोबर शुभ बोलण्यासाठी प्रेरणा दे !”
आत्मचिंतनातून स्फुरलेल्या अशा प्रार्थना जीवनाचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवितात.
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” नामस्मरण करीत आनंदात असावे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈