सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर

– आणि त्याने सांगितलेले  “तीन टेकअवेज

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth College नं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.

आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 

१. Effortless is a myth 

एफर्टलेस – एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.

२. It’s only a point

आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It’s only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.

उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

३.‘Life is bigger than the court’

आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.

टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 

लेखिका : नीलांबरी जोशी 

(फेडरर यांच्या संपूर्ण भाषणाची लिंक — https://www.youtube.com/watch?v=pqWUuYTcG-o&ab_channel=Dartmouth

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments