श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(विविध व्यवसायाच्या संतांच्या दृष्टीतून)

विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे ! सगळ्या  भक्तांचा, जातीपातींचा, व्यावसायिकांचा, बलुतेदारांचा तो देव ! मातीसारखा, अत्यंत वात्सल्याने भरलेल्या धरतीसारखा !! जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो. बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती, तुमचे शब्द, तुमचं प्रेम याचा तो भुकेला..

या विठ्ठलाने शेकडो वर्षे, महाराष्ट्राची अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, संगीत, कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली. अठरापगड जातींच्या समाजाला भक्तीसमृद्ध केले. अध्यात्मातील चारीही मुक्तींचा सोपा मार्ग, समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला. पुरुषसूक्तात जरी ” ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् ” अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू ( अगदी ब्राह्मणसुद्धा ) हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु  ” पद्भ्यां शूद्रो अजायत ” अशी उपमा  दिलेल्या  पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवतगीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक अध्यात्मिक क्रांतीच झाली. येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले. अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही. खुद्द ज्ञानेश्वर माउलींनी, त्यांच्या कुटुंबीयांचा अपरिमित छळ होऊनही कुणालाही शिव्याशाप दिले नाहीत. उलट देवाकडे पूर्ण विश्वाच्या भल्याचे पसायदान मागितले.

नंतरच्या मांदियाळीतील  संतांच्या स्वभाव, व्यवसाय, कार्यानुभवांमुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला, भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे.

संत गोरा कुंभार आपल्या अभंगात ” देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ” आणि  ” न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ” असे म्हणतात. 

संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात — देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।। त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। जीव शिव करूनी फुंकी । रात्रन्‌दिवस ठोकाठाकी ।। विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।। ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।। खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।। नरहरी सोनार हरीचा दास । भजन करा रात्रं दिवस ॥

संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्येच विठ्ठल दिसतो.ते म्हणतात, “आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी, लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || “

संत तुकाराम महाराज समाजातील जातीभेदाबाबत उपरोधकपणे म्हणतात, बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों II

संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामांबद्दल म्हणतात — तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥

संत कान्होपात्रा या महान संत कवयित्री, जन्माने गणिका कन्या. त्यांचे सांगणे कांही वेगळेच ! — 

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।

संत चोखामेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत, सर्वात उच्च तत्वज्ञान  —— ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ II

संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५II 

प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे. पं. भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गातांना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल, जरा अधिकच मृदू असतो. ग.दि.माडगूळकरही  विठ्ठलाला विविध घट बनविणारा ” वेडा कुंभार ” असे म्हणतात. जगदीश खेबुडकर ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी ( ठिणगी रुपी फुले ) वाहू दे ” असे म्हणतात.

आता आषाढी एकादशी आली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा माऊलीभेटीला निघाला आहे. सर्वांचा विठ्ठल एकच, पण त्याचे दर्शन मात्र व्यवसाय, समाज, अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते. वारीमध्ये चालणारा, धावणारा, टाळकरी, माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो, असे सगळेच ”  माऊली “! चंद्रभागेच्या तीरी या माऊलींच्या  रूपातील अवघा भक्ती रंग एकच ” विठ्ठल रंग ” होतो. मग सर्वांचे फक्त एकच काम उरते — बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव II

लेखक :  श्री मकरंद करंदीकर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments