सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 240
☆ गज़ल – रंग सारे पाहिले की… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
कोणत्याही सत्यतेला शक्यतो टाळू नको
त्या जुन्या नात्यास आता व्यर्थ सांभाळू नको
*
रंग सारे पाहिले की, मैफलींचे तू इथे
मौन त्यांनी पाळलेले तू तरी पाळू नको
*
श्वापदांची काळजीही घेतली जातेच की
माणसांच्या भावनांना, जास्त कुरवाळू नको
*
कोण आहे राव येथे, चोरट्यांनी हेरले
अक्षरांची रत्नमाला कुंतली माळू नको
*
तूच जा परतून आता, थांबली आहेस का ?
काळ तो बदलून गेला, पुस्तके चाळू नको
*
मान्य आहे फक्त पूर्वी ,खेडकर पूजा इथे
तू न कोणी संत वेडे, आसवे ढाळू नको
*
वेगळे आहे जगाचे वागणे आता “प्रभा”
त्या जुन्या चाफ्यासवे आकंठ गंधाळू नको
☆
© प्रभा सोनवणे
१३ जुलै २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈