श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ वसंत यावा आनंदाचा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
आजोबा :
झाडाच्या फांदीवर होते
पान एकले विसावले
झाडावरचे वेगवेगळे
खेळ बघोनी सुखावले …
आजी :
पानाच्या जोडीला होते
एक आणखी पान
जाणत होती दोन्ही पाने
एक दुज्याचे मन …
मुलगा नि सून :
नकळत येऊन पाउस वारे
पान भिजावे पान डुलावे
नकळत फांदिस मिळता झोका
हिंदकळोनी पान हसावे …
नातू :
गाता पक्षी कुणी चिमुकला
येऊन पानासी बिलगावा
पानावरती तरंगणारा
थेंब चोचिने पिऊन जावा …
नात :
सानुकल्या लाघवी कळीने
लाजत घालावी साद
कुरवाळुनिया मग पानाने
द्यावा तिजला प्रतिसाद …
फांदी पाने कळ्या नि पक्षी
ऐसा मेळ जुळावा
वसंत यावा आनंदाचा
अवघा वृक्ष फुलावा …. .
☘️
© सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈