श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, तीही अर्धा दिवस. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे अमर्याद सुख. शाळेतून परत येताना नुसता धुडगूस. बेस्ट च्या १७१ क्रमांकाच्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर, एकदम पुढच्या आसनावर, खिडकीसमोर बसून वारा खात केलेला भन्नाट प्रवास. काहीतरी वेगळंच वाटत राहायचं. शनिवार रविवारची ही महती अगदी आजतागायत तशीच, काळ गोठल्यागत.
शनिवारचा मधल्या सुट्टीचा डबा म्हणजे पण काहीतरी वेगळाच अनुभव. कधी पोळीचा लाडू, कधी sandwich, कधी पोह्याचा चिवडा, कधी सुकी भेळ. तेव्हाचा तो quick bite. हा खाऊ पट्कन गिळून शाळेच्या प्रशस्त मैदानावर खेळण्यासाठी जाण्याची प्रचंड घाई. कधीकधी पैसे मिळायचे खाऊसाठी, पण मर्यादित. आमच्या शाळेचं कॅन्टीन फार भारी होतं. हॉट डॉग या प्रकाराशी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली.
तो प्रकार मात्र आम्ही लांबूनच बघायचो. आमची झेप वडापाव नाहीतर इडली चटणी, इथपर्यंतच मर्यादित. काही सुखवस्तू घरातली, इंग्रजी माध्यमातली मुलं चवीपरीने तो पदार्थ खाताना आम्ही बघायचो आणि कोण हेवा वाटायचा त्या पदार्थाचा आणि तो खाणाऱ्या त्या मुलांचा सुद्धा!
पोरांच्या अलोट गर्दीत प्रचंड लोटालोट करून हस्तगत केलेला वडा पाव म्हणजे अगदी दिग्विजय . तो तिखटजाळ वडापाव खाऊन झाल्यावर, नळाखाली ओंजळ धरून पाणी पिण्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. आज असं नळाचं पाणी पिणं म्हणजे महापाप. पोरांना बाटलीबंद किंवा अति शुद्ध केलेल्या पाण्याची सवय. ती किती योग्य, किती अयोग्य यावर भाष्य करणे कठीण, पण आम्ही असं नळाचं पाणी पितच वाढलो, हे मात्र निर्विवाद सत्य.
कधीतरी अवचित, डब्यात गुंडाळी पोळी असायची. गुंडाळी पोळीत बहुतेक वेळा साजूक तुपाचा नाजूक लेप आणि त्यावर पिठी साखरेची पखरण असायची. पोळी गुंडाळून त्याचे दोन तुकडे केले जायचे आणि असे चार पाच तुकडे म्हणजे अगदी भारी काम असायचं. कधी पोळीवर साखरांबा नाहीतर गुळाम्बा पण लेपन होऊन यायचा. तेव्हा बाटलीबंद जॅम चा जमाना सुरू नव्हता झाला आणि हा घरगुती जॅम म्हणजेच परमोच्च बिंदू असायचा चवीचा, आईच्या किंवा आजीच्या मायेचा स्पर्श लाभलेला. जेव्हा wrap संस्कृती अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा आईच्या हातचा हा मायेचा wrap मनाला आणि जिभेला सुख देऊन जायचा.
आजही या गुंडाळी पोळीचा आस्वाद घेतच असतो मी वेळोवेळी. गरमागरम पोळीवर कधी तूप साखर, तर कधी लसणीच्या कुटलेल्या तिखटाचा लेप लेऊन किंवा आंब्याच्या लोणच्याचा खार सोबत घेऊन जेव्हा हा साधासुधा पदार्थ समोर येतो तेव्हा चाळवलेल्या भुकेचं शमन तर होतंच पण विस्मृतीत जाऊ पहात असलेल्या सुखकारक आठवणी पण सुखद समाधान देऊन जातात. तो काळ आणि रम्य भूतकाळ आज समोर येताना अतीव सुखाचं निधानच घेऊन येतो हे मात्र नक्की.
लेखक : श्री पराग गोडबोले
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com