श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ “संसार…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
☆
एक डोळा बारीक करून
सुईत दोरा ओवतेस
आणि,
लेकराच्या शर्टाला बटण
लावतेस तेव्हा,
नेमक्या जागी सुई खुपसताना
किती किती हळहळतेस
बटन लावून झालं की,
किंचितशी मंद हसतेस
आणि,
निजलेल्या लेकराचा हळूच मुका घेतेस
खरं सांगू….?
तू बायको नाहीस आईच वाटतेस माझी…
अंगणात कावळा दंगा घालतो
तेव्हा,
तुझ्या डोळ्यात
तुझं माहेर जसंच्या तसं दिसू लागतं
पाणावलेल्या डोळ्यांनी
टाच उंचावून दूरवर पाहतेस
मुसमुसलेल्या हुंदक्यांनी
सांज होऊन जाते
तोंडावर पाणी मारून
पुन्हा स्वयंपाकघरात जाते
माहेरच्या आठवणीतच
कुकरच्या शिट्ट्या वाजत राहतात
आणि उचक्यांसोबत हुंदके
पुन्हा डोळ्यातून वाहतात
ये विसर ना आज सगळं
लेकरं झोपलीयत
मला मांडीवर घे
ये गा ना एखादी अंगाई
फक्त माझ्यासाठी
आणि आज तरी पगाराचा
हिशोब मांडू नकोस
आकड्याची वजाबाकी करू नकोस
शांत झोपव मला
खूप दिवस झाले गं
या जगाने मला शांत झोपू दिलं नाही
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈