श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ मला माफ करा… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.) – इथून पुढे —
खरं तर सगळीच नाती प्रेमाच्या पायावर उभी असतात. परंतु जीवनयात्रा मात्र तडजोड नावाच्या कुबड्यांच्या साहाय्यानेच पूर्ण करावी लागते. चल, आपण गप्पा मारत बसलो आहोत. इतक्यात आमची दुरंतो एक नंबरवर येईल. बी-नाईन डबा समोरच लागतो. तुला मात्र तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. पुन्हा भेटू या. हे माझं कार्ड” असं म्हणत राघवेंद्र आईला घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघाला.
बेंगलुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेस उशीराने धावत असल्याने अजून एका तासाचा अवधी होता. महेश अस्वस्थपणे बसून राहिला. राघवेंद्राने महेशवर पुन्हा एकदा मात केली होती. संस्काराच्या बळावर ह्यावेळी त्याने महेशला खुजं ठरवलं होतं. महेश आत्ममग्न होऊन विचार करीत बसला.
चार महिने संपून एक आठवडा झाला तरी अविनाश दादाचा बाबांना घेऊन जाण्याविषयी निरोप आला नाही. बाबांना सांभाळायची त्याची पाळी येते त्याचवेळी त्याची रजा मंजूर होत नाही किंवा तो कुठल्याशा टूरवर असतो. ऑफिसचा कर्मचारी बाबांना बेंगलोरला पोचवायला चाललाय.
बाबा आजही निघायला आढेवेढे घेत होते. चुकार मुलं शाळा चुकवण्यासाठी काहीतरी कारणं सांगतात ना, तसं तब्येत बरी नाही म्हणून बाबा बेंगलोरला जायला कुरकुरत होते. मी आधीच टू-टायर एसीची रिझर्वेशन करवून घेतली होती म्हणून बरं आहे.
मी घरात मात्र खलनायक ठरलो.
‘बाबा, आजोबांना बेंगलोरला पाठवायची एवढी जबरदस्ती कशाला करताय? राहू द्या ना इथंच’ असं दोन्ही मुलं म्हणत होती. काल रात्री मुग्धा तर माझ्याशी चक्क भांडत होती. ‘अहो, मामंजीना त्यांच्या मनाविरूध्द कशाला पाठवताय? त्यांचा तुम्हाला काय त्रास होतोय? माझं ऐका. आपली मुलेही मोठी झाली आहेत. त्यांना सगळं समजतं. पुढे जाऊन त्यांनीही आपल्याला दर सहा महिन्याला असं बस्तान हलवा म्हटल्यावर तुम्हाला सहन होईल का, त्याचा एकदा विचार करा म्हणून विनवत होती. आज हा राघवेंद्र अचानक उगवला आणि मला शाब्दिक चपराक मारून गेला.
महेशचं दुसरं मन म्हणालं, ‘राघवेंद्र म्हणतो त्यात काय चुकीचं आहे? माझ्याहून दोघे मोठे बंधू पदवीधर झाले, नोकऱ्या मिळवल्या. दोघांची लग्ने एकाच मांडवात झाली. नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर पडले. मी शेंडेफळ असल्याने आईबाबांचा लाडका होतो. आज मी जो काही आहे ते केवळ बाबांच्या प्रोत्साहनानेच. ते सदैव माझ्या पाठीशी असायचे. मी रात्री अभ्यासासाठी जागत असायचो त्यावेळी ते जागे असायचे. नोकरीच्या वेळी देखील त्यांचंच मार्गदर्शन उपयोगी पडलं. माझं लग्नही त्यांनी किती हौसेनं आणि थाटामाटात केलं.
आई गंभीर आजारी होती तेव्हा एका रात्री मी आईबाबांचं संभाषण आडून ऐकलं होतं. मी असं कसं विसरलो? आई म्हणत होती, ‘अहो, मी फार दिवस जगेन असं वाटत नाही. मी गेल्यावर तुमची हेळसांड होईल म्हणून माझा जीव इथेच घुटमळतोय हो.’ बाबा आईला धीर देत म्हणाले, ‘सरस्वती, तुला काही होणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. महेश आणि मुग्धा मला कधीच अंतर देणार नाहीत. ते मला फुलासारखं जपतील ह्याची मला खात्री आहे.’ बाबांना माझ्याविषयी किती खात्री होती.
आई गेली अन पहाडासारखे बाबा खचून गेले. ज्या बाबांनी माझा हात धरून मला पुढे नेलं होतं, त्यांना आज माझ्या आधाराची आवश्यकता आहे आणि मी त्यांना दूर लोटू पाहतोय. आईबाबांच्या आशीर्वादाने देवानेही मला भरभरून दिलंय. बाबांना सांभाळणं काहीच अवघड नाहीये. माझ्यासारखा नतद्रष्ट मीच आहे.
अचानक “ शंभू” या हाकेने महेशची तंद्री भंग पावली. आपला थरथरता हात महेशच्या मनगटावर ठेवत बाबा काकुळतीने म्हणाले, “शंभू, बाळा तू मला न्यायला येशील ना रे? मला बेंगलुरूत अजिबात करमत नाही. अरे, पुण्यातलं घर हे माझं आनंदनिधान आहे. ते घर आम्ही मोठ्या कष्टानं उभं केलंय. ह्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, त्या खिडक्या, भिंती यांच्याशी माझं अतूट नातं आहे, मैत्री आहे. खिडकीजवळ थांबून मी तुळशी वृंदावनाकडे बघतो, तेव्हा मला तुझ्या आईची आठवण येते. नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. मग खिडकीतून येणारा मंद वारा माझे ओघळलेले अश्रू पुसून माझं सांत्वन करून जातो रे.”
महेश पटकन जागेवरून उठला आणि म्हणाला, “बाबा, तुम्ही इथेच थांबा. हा मी आलोच.” महेश धावतच बाहेर पडला. दुरंतो अजून सुटायची होती. बी-नाईनचा डबा समोरच होता. राघवेंद्रच्या कार्डावरून महेशने मोबाईल लावला. “राघवेंद्रा मी बी-नाईनच्या बाहेर उभा आहे. एका मिनिटासाठी येशील का?”
राघवेंद्र काही क्षणासाठी खाली उतरला. महेशने राघवेंद्रला घट्ट मिठी मारली आणि एवढंच बोलला, “‘मित्रा, आपली ही भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. दिल्लीहून परत आल्यावर तुम्ही सहकुटुंब माझ्या घरी या. हे माझं कार्ड!” एवढ्यात गाडीने शिट्टी दिली आणि वेग घेतला तसा हळूहळू राघवेंद्र दृष्टीआड झाला.
महेश वेटींग रूमवर परत आला. दोघा कर्मचाऱ्यांना म्हणाला, “चला, घरी जाऊ या. ट्रीप कॅन्सल. बॅगा आपल्या कारमध्ये ठेवा.”
बाबा गोंधळून जात म्हणाले, “शंभू बेटा, अचानक असं काय झालं? मी काही चुकीचं बोललोय का? नाराज होऊ नकोस रे बाळा, मी जाईन बेंगळुरूला राहायला.”
महेशने हात धरून बाबांना उठवलं. भावूक झालेल्या महेशने कित्येक वर्षानी बाबांना गळामिठी मारली आणि कसंबसं सावरत म्हणाला, “बाबा, मला माफ करा. आपण आपल्या घरी जाऊ या. आता तुम्ही कायमचे पुण्यातल्या घरात राहा. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे माझं वचन आहे.”
बाबा पाणावलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत पुटपुटले, ” पाहिलंस सरस्वती, माझं म्हणणं खरं ठरलंय ना? तू उगाच काळजी करत होतीस…” आणि बाबा त्यांच्या लाडक्या शंभूचा हात धरून समाधानाने आपल्या घराकडे जाण्यासाठी परत निघाले…….
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈