श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर राजेश सिंग अधिकारी, महावीर चक्र (मरणोपरांत) 

भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध. ३० मे,१९९९. 

दहाच महिन्यांपूर्वी त्याची अशीच वरात निघाली होती आणि तिच्या दारी आली होती. घोड्यावर बसलेला तो राजबिंडा…रूबाबदार! लष्करात अधिकारी असलेला तो होताच तसा देखणा. आठ वर्षांच्या सेवेत लष्कराने शिस्तीच्या संस्कारात एका कोवळ्या तरूणाचे मजबूत शरीरयष्टीच्या,अदम्य आत्मविश्वास असलेल्या, भेदक नजर असलेल्या एका जवानात रुपांतर केले होते… सैन्याधिकारी… राजेश सिंग धर्माधिकारी! इतक्या वर्षांत त्याने मेजर पदापर्यंत मजल मारली होती…आणि  आता तो बनला होता दीडशे ते दोनशे सैनिकांचे नेतृत्व करणारा लढवय्या. १९९९ वर्ष निम्मे सरत आलेले होते. कारगिल परिसरातून आता मेजर साहेबांची बदली होण्याचे दिवस जवळ आले होते. पण….कारगिलच्या शिखरांवरून अप्रिय बातम्यांचा वारा खाली घोंघावू लागला. 

सुरुवातीला वाटले होते की पाकिस्तानातून भारतात कश्मिरविरोधात भारतीय सैन्याला उपद्र्व देण्यासाठी घुसलेले अतिरेकी असावेत आणि तेही नेहमीप्रमाणे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. पण धर्माधिकारी साहेबांनी त्या पर्वतशिखरांवरून आपले हेलिकॉप्टर उडवत नेले आणि टेहळणी केली तर परिस्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या अपेक्षेपेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. शिवाय त्यांनी शिखरांच्या मोक्याच्या ठिकाणी पक्के आणि सुरक्षित बंकर्स खोदून ठेवलेत…त्यातून त्यांना खाली नेम धरणे सोपे होते. आणि अतिशय कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली होती. गरम कपडे,बूट,हवाबंद पौष्टिक अन्नपदार्थ,संपर्क साधने आणि इतक्या उंचीवर आणून ठेवलेला पुरेसा दारूगोळा! 

मेजरसाहेब तळावर परतले ते चेह-यावर काळजीचा रंग घेऊनच. शत्रू आपल्या अत्यंत जवळ आला आहे. त्यांनी सहका-यांना सावध केलं. तोवर कारगिलच्या इतरही शिखरांबाबत हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालं होतं. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचं गस्तीपथक परतलेलं नव्हतं..त्यांना शोधायला गेलेल्या पथकावरही तुफान हल्ला होऊन पथक नेस्तनाबूत झालं होतं. मेजर धर्माधिकारी यांच्या समोर तोलोलिंग नावाचं भारताचं पर्वतशिखर आता शत्रूच्या ताब्यात होतं. आणि हे शिखर पुन्हा हस्तगत करायचं म्हणजे प्रत्यक्ष मरणाला सामोरं जाणं. कारण परिस्थिती शत्रूला शंभर टक्के अनुकूल होती…पण तोलोलिंग परत घेतलं तरच इतर शिखरं पादाक्रांत करता येणार होती. 

योग्य वेळ पाहून शिखरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहिला प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला…कारण दाट धुकं,वरून शत्रूचा तुफान आणि अचूक गोळीबार. त्यात शत्रूच्या स्नायपरने आपल्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर यांना अचूक टिपून धारातीर्थी पाडलं होतं. त्यादिवशी अधिक चढाई करणं अशक्य झाल्यानं खट्टू होऊन माघारी फिरणं भाग पडलं. 

त्यादिवशी पलटणीत सैनिकांच्या कुटुंबियांची पत्रं पोहोचली. जशी चातकाला पावसाच्या पहिल्या थेंबांची प्रतिक्षा तशी जवानांना आपल्या आप्तांची ख्यालीखुशाली समजण्याची उत्कंठा. मेजर धर्माधिकारी तर नवविवाहीत. आणि राजेश आणि किरण…त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलू पाहणा-या एका फुलाच्या प्रतीक्षेत आणि स्वप्नात मग्न असलेलं दांपत्य! पण सीमेवर जमा झालेले युद्धाचे ढग आता किरण यांच्या घरापासूनही स्पष्ट दिसत होते. काळजाला लागलेल्या घोर काळजीचे प्रतिबिंब प्रत्येक शब्दात अगदी आरशासारखे स्वच्छ दिसत होते. पण…मेजरसाहेब तर आता मोहिमेवर निघालेले होते. त्यांना सोळा हजार फुट उंचीवर त्यांच्या पत्नीचे पत्र मिळाले! एका हातात पत्नीचे पत्र, एका हातात तोलोलिंगचा नकाशा आणि खांद्यावर रायफल. डोळ्यांनी पहावे तरी काय आणि वाचावे तरी काय? मेजरसाहेब सहका-यांना म्हणत होते… नकाशा वाचला पाहिजे…तेथून परतल्यावर निवांतपणे वाचता येईल की बायकोचं पत्र! असून असून असणार काय पत्रात? काळजी वाटते, काळजी घ्या…वाट पाहतो आहोत…आम्ही…म्हणजे मी आणि आपलं बाळ!  

तोलोलिंगवर चढाई करता येईलच पण जिवंत परतण्याची शक्यता शून्य! लष्करात जिंदगी घालवलेल्या सर्वांना हे दिसत होतं…आणि त्यात हा गडी म्हणतोय…मोहिमेवरून आल्यावर निवांत वाचेन की पत्र! इतर जवानांना मोहिमेवर निघताना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं म्हणून अधिका-यांनी खास सॅटेलाईट फोनची व्यवस्था केली होती. मेजर राजेश साहेबांनी आपल्या साथीदारांना आधी बोलू दिलं…साहेबांचा नंबर लागला आणि त्या सॅटेलाईट फोनची बॅटरी संपली…बोलणं झालंच नाही…शेवटपर्यंत. 

मागच्याच आठवड्यात मेजरसाहेबांनी आपल्या अर्धागिंणीला पत्र धाडलं होतं. “मला लढाईला पाठवलं जातंय…आणि मलाही जायचंच आहे खरं तर. सैनिकासाठी लढाई म्हणजे एक तीर्थयात्रा…दोन्ही लोकी आशीर्वाद देणारी. मी परत येण्याची शक्यता धूसर आहे. नाहीच आलो तर आपल्या होणा-या बाळाला कारगिलच्या या शिखरांवर नक्कीच घेऊन ये. दाखव त्याला..त्याचा बाप कुठे लढला ते! देशाचा संसार सावरला तरच मी आपला संसार भोगू शकेन. या पत्राच्या उत्तरात तू काय लिहिणार आहेस हे मला आधीच ठाऊक आहे….!” 

याच पत्राचं उत्तर आलं असावं…आणि त्यात बाईसाहेबांनी काय लिहिलं असावं याची उत्सुकता मेजरसाहेबांना असण स्वाभाविक होतं. पण कर्तव्यापुढे वैय्यक्तिक आयुष्य कवडीमोलाचं असतं सैनिकांसाठी! संसार तर होत राहील….देशाचा संसार राखणं गरजेचं होतं. मेजरसाहेबांनी ते पत्र न उघडताच आपल्या ह्र्दयावरील खिशात अलगद ठेवून दिलं आणि प्लाटून…लेट्स मार्च अहेड! असं खड्या आवाजात म्हणत ते आपल्या सहकारी सैनिकांच्या चार पावलं पुढेच निघाले….नेत्याने अग्रभागी राहायचं असतं…शत्रूला भिडायचं असतं. नव्वद अंशाचा,चढण्यास अशक्य असलेला कोन,पहाटेचा अंधार,जीवघेणी थंडी,वरून होणारा गोळीबार. खरं तर शत्रू इतका आरामशीर बसला होता की त्यांना गोळ्याही झाडण्याची गरज पडली नसती…केवळ एखादा दगड जरी वरून भिरकावला असता खाली तरी वरती चढण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जवान खोल दरीत कोसळून गतप्राण होईल…आणि तसं होतही होतं. 

मेजरसाहेबांना आता थांबायचं नव्हतं. त्यांनी आपल्या तुकड्यांना तोलोलिंगला तिन्ही बाजूने वेढण्याचे आदेश दिले. आणि मधल्या तुकडीच्या अगदी पुढे निघाले सुद्धा…त्यांच्या दिशेने अर्थातच तुफान गोळीबार सुरु झाला….दुश्मनांकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आग ओकणारी. मेजरसाहेब तशाही स्थितीत मोठमोठे दगद शिताफीने ओलांडत आणि त्याचवेळी आपल्या गनमधून वर फैरी झाडत इंचाइंच करीत वर जात होते. शत्रू लपून बसलेल्या पहिल्या बंकरपर्यंत पोहोचताच त्यांची आणि शत्रूच्या दोन जवानांची समोरासमोर गाठ पडली…मेजरसाहेबांनी त्या दोघांशी हातघाईची लढाई लढली. शत्रू काही अर्धप्रशिक्षित घुसखोर अतिरेकी नव्हता…पाकिस्तानी लष्कराचा नियमित सैनिक होता. पण भारतीय लष्कराचे प्रशिक्षण वरचढ ठरले….आणि भारतीय जवानांचे मनोधैर्यही! मेजरसाहेबांनी दोघांचाही खात्मा केला…हे सगळं करत असताना त्यांच्या देहात गोळ्या घुसलेल्या होत्या. हे सगळं त्यांचा एक सहकारी काही अंतरावरून पहात होता…तेव्हढ्यात त्याच्या संपर्क साधनावर वरीष्ठ अधिका-याने संपर्क साधला….सहकारी म्हणाला…अधिकारी साहब…जांबाजीसे लड रहे है….” तितक्यात एका गोळीने या सहका-याचा वेध घेतला…संपर्क कायमचा समाप्त झाला. 

इकडे मेजरसाहेबांनी पुढे कूच केले…पहिला बंकर जवळ जवळ ताब्यात आलेला असतानाच त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला….आणि देहाचा आणि जीवाचा संबंध संपुष्टात आला! आता आत्मा मुक्त झाला होता स्वर्गात जाण्यास! मेजरसाहेबांचे सोबतीही या प्रवासात त्यांच्याच सोबत होते! यश थोडे मिळालेले असले तरी त्या यशाने पुढच्या यशाचा पाया रचला होता….ही अशक्यप्राय कामगिरी होती….हे खरं तर आपलंच अपयश होतं….शत्रूच्या कावेबाजपणाचा अंदाज यायला तसा खूप उशीर झाला होता आणि हा डाग धुण्यासाठी रक्तच कामी येणार होतं…आणि सुदैवानं या रक्ताची टंचाई नाही आपल्याकडे. 

छातीत घुसलेल्या गोळ्या… त्यातून रक्ताचे प्रवाह शरीरभर ओघळत असताना त्या रक्ताने मेजरसाहेबांच्या खिशातील पत्रालाही अभिषेक घातला….सौ.किरण अधिकारी यांनी जीवाच्या तळापासून लिहिलेले शब्दांनी लालरंग ल्यायला होता….विरहाची पत्रं प्रेमिकांच्या आसवांनी भिजतात …इथं शेवटचा निरोप रुधिराने ओलाचिंब झालेला होता. 

बारा तेरा दिवस मेजरसाहेब आणि सहका-यांचे निष्प्राण देह तोलोलिंगवर शत्रूच्या बंकर्समध्ये निश्चेष्ट पडून होते……युद्धाच्या धुमश्चक्रीत तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं…आणि ते देह परत मिळवण्याचा वज्रनिर्धार करून पुन्हा तोलोलिंगवर चढाई करण्यास आणखी जवान आणि अधिकारी सज्ज होते! लीव न में बहाईंड. कोई साथी पिछे न छुटे! 

मेजरसाहेबांच्या घरी चौदा दिवस काहीही खबर नव्हती….कलेवरंच नव्हती तर हौतात्म्य जाहीर तरी कसं करायचं? कोण जाणो…चमत्कार झालेलाही असावा! पण असे चमत्कार विरळा! 

आज मेजरसाहेब आपल्या स्वत:च्या घरी आले होते…जसे नव्या नवरीला घरी मिरवणुकीने घेऊन आले होते तसे…पण आज दृश्य वेगळे होते. फुलं होती,हार होते…पण ते सरणावर जाणा-या देहावर पांघरण्यासाठी. हजारो लोक होते सोबत…पण त्यांच्या ओठांवर अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत आसवं. 

ती अगदी स्तब्ध उभी होती त्याच्या. इतरांच्या शोकाच्या गदरोळात तिचं शांत राहणं भयावह होतं. लोकांना आता तिचीच काळजी वाटू लागली…दु:खानं भरलेलं काळीज मोकळं नाही झालं तर काळीज फाटून जातं…अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने लिहून ठेवलंय… Home they brought her warrior dead: She nor swoon’d nor utter’d cry:All her maidens, watching, said, “She must weep or she will die.” त्यांनी त्या हुतात्मा योद्ध्याचा,तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात आणून ठेवला आहे…पण ती थिजून गेलीये…एकही हुंदका फुटत नाहीये….ती रडली नाही तर ती सुद्धा मरून जाईल…(मग तिच्या नवजात बाळाचं काय होईल?) पण इथं कुणी काहीही बोलायची हिंमत करत नव्हतं! ती बराच वेळ तशीच उभी राहिली त्याच्या कलेवराजवळ…आणि तेवढ्यात पार्थिव घेऊन आलेल्या लष्करी अधिका-याने तिच्या हातात मोठ्या अदबीने एक लिफाफा ठेवला…त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात नाव होतं…तिच्याच अक्षरात….मेजर राजेश अधिकारी यांस….! लिफाफा फोडला गेलेला नव्हता..आतलं पत्र तसंच होतं…वाचलं न गेलेलं!  

तो आता ते पत्र कधीही त्याच्या डोळ्यांनी वाचू शकणार नव्हता…मात्र त्याचा आत्मा कदाचित पत्रातील मजकूर ऐकायला आतुर झालेला असेल…तिने आसवांच्या शब्दांनी त्याच्या कानात तिने पत्रात लिहिलेला मजकूर ऐकवला असेल…तिने लिहिले होतं….तुम्ही परत आलात तर मी खूप भाग्यवान समजेन स्वत:ला, पण मातृभूमीच्या रक्षणार्थ तुम्ही प्राणांचं बलिदान दिलंत तर एका योद्ध्याची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी मला माहित नाही…पण मी त्या बाळाला तुम्ही लढलात त्या युद्धभूमीवर निश्चित घेऊन येईन…आणि त्याला किंवा तिला तुमच्यासारखंच शूर योद्धा बनवीन….तुम्ही माझे हे उत्तर तुमच्या डोळ्यांनी वाचलं असतं तर तुम्हांला किती आनंद झाला असता ना…राजेश?  तुम्हांला इन दी हेवन हे गाणं म्हणायला आवडायचं ना!  

Beyond the door There’s peace, I’m sure And I know there’ll be no more Tears in heaven…स्वर्गात आसवांना जागा नाही मुळीच….सुखद शांतता असते तिथे….मला माहित आहे…तुम्ही त्या स्वर्गात सुखनैव रहाल! 

(पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या अगदी आरंभीच्या दिवसांत तोलोलिंग नावाचं महत्त्वाचं शिखर पाकिस्तान्यांकडून ताब्यात घेण्यासाठी तेथील पत्थरांना आपल्या जवानांनी अक्षरश: रक्ताचा अभिषेक घातला. यातीलच एक तरूण रक्त होतं मेजर राजेशसिंह अधिकारी यांचं. मुंबईच्या सैनिकप्रेमी भगिनी उमा कुलकर्णी या रोज एका सैनिकाची माहिती पोस्ट करीत असतात. त्यातूनच अधिकारी साहेबांच्या पराक्रमाविषयी वाचायला मिळालं. आणि महावीर चक्र (मरणोत्तर) विजेते मेजर राजेशजी अधिकारीसाहेब आणि त्यांच्या पत्नीचा,कुटुंबियांचा त्याग प्रखरतेने नजरेसमोर आला. त्या पोस्टवर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments