सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “यक्षरात्र” – कवयित्री : अरुणा ढेरे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

 पुस्तक – यक्षरात्र

 कवयित्री -अरुणा ढेरे

 प्रकाशन वर्ष -१९८७

मूल्य- २५/

अरुणा ढेरे या कथा, कादंबरी ,काव्य, ललितलेखन, कुमार व किशोर वयोगटासाठीचे लेखन, सांस्कृतिक व ऐतिहासिक लेखन करणाऱ्या मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीयुत र .चि. ढेरे यांची समृद्ध भाषा श्रीमंती त्यांना लाभली आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहात कवयित्रीच्या 1980 ते 1986 या काळातील एकूण 72 छोट्या कवितांचा संग्रह आहे.

शीर्षक “यक्षरात्र”हे विशेष आहे. यक्ष व रात्र यांनी मिळून यक्ष रात्र हा शब्द तयार झाला आहे. यक्ष सुंदर आणि मायावी असतात. त्यांची तुलना ‘रात्रीशी’ केली आहे. आयुष्यातील धुंद करणाऱ्या, मंतरलेल्या, मायावी रात्रींतील प्रसंगांचे वर्णन यात आहे. या यक्षरात्रींचे कवितेशी संबंध सांगताना त्या म्हणतात , याच मंतरलेल्या रात्रीत नवनिर्मिती होते आणि नवनिर्मितीचे व कवितेचे जन्मोजन्मीचे नाते असते. ‘यक्षरात्र’ या नावाच्या कवितेत त्या म्हणतात,

“….. आणि रंग गर्द क्षितिज पेटले,

       रात्री उजाडले क्षणमात्र 

       तमाने टाकली प्रकाशाची कात, 

        झाली काळजात यक्षरात्र”.

अबोल भावना कवितातून कशा झरतात हे सांगताना, त्या म्हणतात,

     “तुला समजू न शकणाऱ्या         

     जाणिवांचे हुंदके गळाभर दाटून

     येतात आणि फारच असह्य झाले 

     की कविता होऊन कागदावर        

     ठिबकू लागतात .”

आयुष्यातील स्वार्थी नाती व त्यामुळे कवितेला लाभलेले कोरडेपण याबद्दल कवयित्री लिहितात,

   ” पाहिले मोर तत्वांचे,

    ते सर्व पिसे झडलेले,

    अन ओळख हिरवी जिथे,

     ते पान कुणी खुडलेले .”

पुढे एक ठिकाणी त्या लिहितात

“मी माझ्या आत आत उतरते आणि     

नुसतीच बाहेर पाहते …

तेव्हा भीती वाटते.”

 पुढे एके ठिकाणी त्या लिहितात,  

‘शब्दांचे दुःख निराळे.

 ना कळत्या अर्थापाशी मोराचा पंख झळाळे.’

 दुःखातून बाहेर पडून लेखनातून स्वतःची ओळख निर्माण करताना, संघर्ष करताना त्या म्हणतात,

‘ माझी नाव वलवायला मला माझेच हात हवे होते ,

आता हात नाहीत ,

शब्दांचे वागणे बदलले आहे ,

माझे पाणी बदलले आहे,

 माझे जाणे आणि गाणे ही बदलले आहे .,’

विसर पडलेल्या नात्यांबद्दल त्या लिहितात ,

“सागांच्या भिंती मधुनी कोंडल्या सुखाच्या हाका,

 पाखरे विसरून गेली आश्वासक आणाभाका’.

अश्रू लपवून स्मितहास्याने जीवनास सामोरे जाताना,आत्मविश्वास वाढवताना त्या लिहितात ,

“देहाचे पान थरारी ,

मज हवीच माझी माती ,

दुःखाच्या ओटी वरती

 तु लाव स्मिता ची पणती.’

 पतीच्या विरहात ” तू नसताना “या कवितेत त्या लिहितात ,

   ‘तेव्हा या देहस्वी प्रदेशाशिवाय   

   अन्यत्र कुठे तृप्तीची तळी असतील

   असे वाटले ही नव्हते,

   आता आभाळ निवड ,हवा संथ

   आहे, 

  विलासीचंद्र मी जरा काढून ठेवला  

  आहे .”

रात्रीत भेटणाऱ्या प्रेमाची जग जाहीर रीत सांगताना त्या लिहितात,

   “प्रेम भोगावे जरासे पांघरूनि

    वासना, आतडी सजवून भोळी,

    रंगवावा पाळणा”.

 शृंगारसात  त्या लिहितात ,

“उगीच नेसले हिरवी साडी, काळे काठ.

 झुलवीत आले जुन्या नदीचे नवखे घाट,

 पायात पैंजण चांदीचे,

 घुंगुर गाणे धुंदीचे.

 राघू लाल चोळीवरती,

 केसातून पिवळी शेवंती”.

सासुरवाशीणीला “माहेरी बोलवा” या कवितेत त्या लिहितात,

” चार दिवसांवर उभा ओला श्रावण झुलवा.

 न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा,

 तिच्या अंगावर इथे किती गोंदले निखारे,

 तिथे फिरेल त्यावरी रक्त चंदनाची वारे.

थोडा वेळ दे गारवा, तिला माहेरी बोलवा,

सोसायचाच ना आहे पुन्हा वैशाख वणवा .”

“पाऊस” या कवितेत त्या लिहितात,

आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे.

पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो खोवून पीस मोराचे कान्हा होतो.

हिमशुभ्र कळ्यांवर तमाम झुकतो, जेव्हा पाऊस रसिक राधेचा राणा होतो.” 

“पाऊस  कुणा राव्याला दाणे देतो ,

तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो ,

दिशा मोकळ्या दाही ,

पाण्याला पाऊस रत्न पैंजण देतो.”

आयुष्यात शब्दांचे कवितेचे गाण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात

    “उघडना ,ओठ जरा .जुळू दे ना 

     गाणे. गाण्या विना खरे का ग

      माणसाचे जिणे?”

अशा अनेक कविता वाचल्यानंतर या काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये सांगताना मला आवर्जून सांगावेसे वाटते यातील कित्येक ओळी साड्यांच्या घडी प्रमाणे  हळुवार आयुष्याची रीत उलगडून दाखवतात. यांच्या कविता लयबद्ध आहेत .डोळ्यासमोर खेडेगावातील पावसातले वातावरण, जांभळे डोंगर ,हिरवीगर्द झाडी , गार उनाड वारा, चंदेरी पाणांतून टपटपणारे थेंब ,डोहाकटी नाचणारा मोर ,हिरवा राघू ,साजनाची ओढ हे सोबत असल्याचा भास होतो . कवयित्री शब्दांची धनी आहे. तिच्या पोतडीतून आलेले काही शब्द अगदी नवे कोरे वाटतात. “पायांना भुईच्या रंगाचे धन, चंद्र भाकरीचा तव्यात उतरून घ्यायचा, पानावर चढते चांदी, मोरांचे पंख झाडले इ.अशा अनेक शब्दांना मोरपिसांपरी पावसात न्हात, गार वारा पीत ,कधी विरहाच्या कधी मिलनाच्या स्पर्शांना अनुभवत या कविता जीवनाचं वास्तव स्त्री मनातून सांगून जातात. आणि या संसाराच्या पाशातून मुक्त करत कवयित्रीला लिखाणाचे बळ देतात. त्या उंचीवर बसून ती पुन्हा वळून पाहते तेव्हा तिच्या आयुष्यातले हे क्षण, या रात्री तिला यक्षरात्रीसारख्या भासू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने प्रत्येकीच्या आयुष्यातली यक्षरात्र त्यां सोबत चमकू लागते. असा अनुभव देणारा हा काव्यसंग्रह नक्की वाचायला  हवा.. 

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments