सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ हास्य मुद्रा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
☆
हास्य मुद्रा तुझी पाहता
मन माझे मोहूनी गेले
चिंब भिजले यौवन तव
मनास या गुंतवित गेले
*
तव रुपाची नशा आगळी
अंगावरी चैतन्य झळाळी
हिरव्या मखमालीची वसने
वरती ही नक्षी सोनसळी
*
लेकुरवाळे रुप साजिरे
पाना फुलांतून विलसते
तृप्त अशी ही प्रियतमा
मला प्रीतीने साद घालते
*
दूर जरी मी असलो राणी
तुला भेटतो क्षितीजावरी
आपुली प्रीती युगायुगांची
निळी शाल तुज मी पांघरी
*
सरिता निर्झर सागरही
वृक्षवल्ली वनराई अपार
खग-विहगांचे कूजन रंगे
केशकलापी पुष्पसंभार
*
पाऊस धारांमध्र्ये सखये
प्रीती ही भरास आली
चैतन्याच्या उर्मीने भारली
नभ धरेची प्रीत आगळी
☆
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈