श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

प्रिय देशबंधू / भगिनींनो,..☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय देशबंधू / भगिनींनो,

आज तुम्ही माझी पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी करीत आहात. मागील साधारण १०० वर्षात माझ्या मागे अनेक गोष्टी घडून गेल्या. अनेक नेते आले आणि गेले , भारताला स्वातंत्र्य (खंडित…!) मिळाले. आम्ही जहाल होतो हे फक्त पुस्तकात राहिले आणि अहिंसेच्या नादानपणाने कळस गाठला. तुम्हाला फक्त माझा एकच अग्रलेख आठवत असेल कारण पाठ्यपुस्तकात तो निदान तितका तरी छापला गेला आणि आजही तो टिकून आहे. असो….!

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशा शीर्षकाचा आम्ही अग्रलेख लिहिला. त्याने आपल्या देशात जनजागृती झाली पण ब्रिटिश सरकारची माझ्यावर वक्रदृष्टी झाली. ते लोकं निमित्त्तच पाहात होते. मग त्यांनी माझ्यावर खटला भरला. मला शिक्षा झाली आणि मी मंडालेला गेलो. हे तुमचे माझ्यावर केलेली भाषणे ऐकून पाठ झाले आहे, याचि पूर्ण जाणीव मला आहे. 

आपल्याकडे सध्या एक प्रथा सुरू झाली आहे. काही निवडक आणि दिवंगत नेत्याची  पुण्यतिथी साजरी केली, त्यांच्या प्रतिमेला हार घातला, त्यांच्या त्यागाबद्दल चार गौरवोद्गार काढले, वृत्तपत्रात सरकारी खर्चाने पानभर जाहिरात दिली की तुम्ही आपल्या मर्जीनुसार वागायला मोकळे. असे वर्तन मागील अनेक वर्षे मी पहात वैकुंठातून पाहात आहे. आज अगदीच राहवले नाही म्हणून हा पत्र प्रपंच.

आमच्यावेळी स्वातंत्र्य मिळवणे हेच तरुणपिढीचे ध्येय होते आणि तेच योग्य होते. आज खंडित का होईना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आज त्याला ७५ पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत. मागील ७५ वर्षात आपण आपल्या पुढील पिढीला कोणता इतिहास शिकवला? पराजयाचा की विजयाचा? आपल्याला खूप मोठा वारसा लाभला आहे, पण आपण त्याकडे उघडे डोळे ठेवून पूर्णपणे डोळेझाक केली आहे. सरकारने सर्व काही करावे आणि आपण मात्र हातावर हात ठेवून बसावे अशी मानसिकता ब्रिटिशांच्या काळात होती. अर्थात त्यांनी ती प्रयत्नपूर्वक निर्माण केली होती. मागील ७५ वर्षात तुम्ही त्याची री ओढलीत. आंगल् भाषेला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण माझी अपेक्षा  अशी होती की तुम्ही आंगल् भाषा शिकाल आणि जगाला गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, दासबोध समजून सांगाल. पण आपण तर अभ्यासक्रमात याचा समावेश होऊच दिला नाही…..

याला मी काय म्हणावे ?

प्लेगच्या साथीत ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले तेव्हा चाफेकर बंधूंनी त्यांचा सूड घेतला. इथे संसदेवर हल्ला करणाऱ्या नराधमांना माफी मिळावी म्हणून येथील बुद्धिजीवी स्वाक्षरीची मोहीम काढत आहेत.

पुढील पिढीला आपण नक्की काय देणार आहोत, याचा तरी विचार करा…

आज जे प्रश्न देशापुढे आ वासून उभे आहेत, त्यातील किती प्रश्न आपण आपल्या (अ)कर्तृत्वाने निर्माण केले आहेत आणि किती प्रारब्धवश आहेत…?

थोडा विचार करा…

माझ्या समकालीन असलेल्या काही लोकांनी जहाल ठरवले आहे. आता तसेच बोलून दाखवणे क्रमप्राप्त नव्हे काय ? 

माझ्या नंतर मोहन ने स्वातंत्र्य चळवळीची धुरा हातात घेतली. स्वातंत्र्य मिळाले पण त्यातील स्व मात्र आपल्याला अद्याप गवसला आहे असे म्हणता येईल ? तुम्हाला असा विश्वास आहे ? आणि नसेल तर त्याला जबाबदार कोण ? यासाठी तुम्ही काय करणार आहात ?

ब्रिटिशांनी आपल्याला मला काय त्याचे? असा विचार करायला शिकविले? आणि तुम्ही मागील अनेक वर्षे हेच करीत आहात ?

असं ऐकतोय की तुम्ही स्वातंत्र्य मागील अनेक राष्ट्रपुरुषांची त्यांचा जन्माने प्राप्त झालेल्या जातींमध्ये विभागणी केलीत…!अरे याला बुध्दी म्हणायचे की विकृती ? ज्ञानाला मान देणारा भारतीय इतका विकृत कसा झाला रे….! आपला पुढारी सांगतोय, कुठल्या तरी पुस्तकात काहीतरी छापून आले म्हणून तुम्ही असे मुर्खासारखे वागू पहात आहात ? स्वतःची बुध्दी वापरणार की नाही ? 

एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, आपण स्वतंत्र विचार करण्या इतपत अजून परावलंबीच आहोत….

आज माझी पुण्यतिथी साजरी करताना, वरील मुद्द्यांचा विचार आवर्जून करा. ही माझी विनंती नाही. अर्ज विनंती करणाऱ्यातला मी नाही. ठोकून सांगतोय. भले तर देऊ गांधीची लंगोटी, नाठाळाच्या हाती मारू काठी हे तुकोबांचे तत्त्वज्ञान जगणारा मी आहे.

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लोकमान्यांनी आजच हे पत्र का लिहिले असेल ? आपला प्रश्न रास्त आहे. पण तुम्हीच पहा ना ? आज तरुण काय करतोय ? आपल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत ? ज्या छत्रपतींचे नाव घेऊन प्रत्येक पक्ष राजकारण करीत आहे, त्या छत्रपतींच्या किल्ल्याची दशा आणि दिशा काय झाली आहे ? ज्यांना शिवबांनी तलवारीने पाणी पाजले, त्यांची हिंमत किती वाढली आहे ? 

मला तर वाटते आहे की पुन्हा भारत मातेच्या पोटी जन्म घ्यावा आणि पुन्हा एकदा सरकारचे, नव्हे येथील जनतेचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहावा.

पण मला खात्री आहे. तुम्ही सर्वजण देशभक्त सुजाण नागरिक आहात. थोडी वाट चुकली असेल तर या पत्राने पुन्हा योग्य वाटेवर याल आणि आपल्या भारत मातेला पुन्हा एकदा विश्वविजयी केल्याशिवाय राहणार नाही. सुज्ञास आणिक सांगायची गरज पडत नसते….!

सर्वांस अनेक आशीर्वाद. इथेच थांबतो.

तुमचा,

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments