सुश्री तृप्ती कुलकर्णी
विविधा
☆ पाऊस काय काय करतो… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
(रस्तोरस्तीच्या गोष्टी)
थकलेल्या, मळलेल्या रस्त्यांना चकचकीतपणाचा मुलामा देतो. भरून टाकतो त्याच्यावरचे सगळे खाच-खळगे आपल्या ओल्या मायेनं. आणि रस्त्यांना दाखवतो अंतरबाह्य जगण्याची झलक. मग सरळसोटपणे वाहणारा रस्ताही मध्येच थबकतो, आपल्याच खळग्यात डोकावणाऱ्या आपल्या सोबत्यांसाठी! अन् मग एकमेकांची अंतरंग दिसू लागतात त्यांना. पुसू लागतात ते एकमेकांच्या व्यथा. कधी रस्त्यावरचा दिवा आपल्या प्रकाशाची उब त्याला देऊ पाहतो. कधी निरभ्र आकाश त्याला शांतता देतं. तर कधी डोकावणारं झाड आपल्या पानाफुलांच्या संसाराच्या गोष्टी त्याला सांगतं.
पण याबरोबरच त्यांनाही जाणून घ्यायचं असतं सिमेंटच्या, डांबराच्या आड खोल खोल दबलेल्या खऱ्याखुऱ्या रस्त्याचं रूप आणि त्याची कथा, त्याची व्यथा.
एक निराळंच विश्व असतं त्यांचं. प्रत्येकाची भाषा वेगळी पण तरीही एकमेकांना समजेल अशी…
काय असेल बर त्या संवादात? त्या विश्वात?
वर्षानुवर्षं एकाच जागी स्थिर राहण्याचं दुःख, घरट्याची गरज संपताच सोडून जाणाऱ्या पक्ष्यांच्या आठवणी, आपल्याच अंगाखांद्यावर खेळणाऱ्या फुलापानांच्या अल्पायुष्याची खंत, का आपल्या एकटेपणाला या खळग्याची साथ मिळाली म्हणून झालेला आनंद? का यापेक्षाही वेगळं काही…
आता रस्त्यावरचा दिवा. जेव्हा डोकावत असेल त्या खळग्यात तेव्हा सगळ्यात पहिलं बघत असेल आपलं पारदर्शी रूप! आपल्या किरणांची तहान भागवत असेल का? सोडत असेल का आपल्या किरणांना त्या छोट्या डोहरुपी खळग्यात डुंबायला… का मदत करत असेल रस्त्याला, त्याच्या खोल अस्तित्वाचा शोध घेण्यात?
आकाशाचा दाटलेपण, खरंतर साचलेपणच रीतं होत असेल का त्या खळग्यात? काय वाटत असेल त्या आकाशाला, आपल्याच साचलेल्या भावनांकडे त्रयस्थपणे पाहताना? सगळा निचरा झाल्यावर येणारं निरभ्रपण म्हणूनच जपता येत असेल का त्याला?
आणि या सगळ्यात अखंड चालत राहण्याचं कर्तव्य निभावणाऱ्या रस्त्याला काय वाटत असेल? सांगत असेल का तो त्या झाडाला रस्तोरस्तीच्या गोष्टी? सांगत असेल का आकाशाला त्याच्या अथांगपणाचं, स्वच्छंदपणाचं महत्त्व? दिव्याला सांगत असेल का रात्री त्याच्यासोबत असण्यानं, त्याला दिसणाऱ्या रस्त्यावरच्या वर्दळीचं खरं रूप? काय काय येत असेल ना या साऱ्यांच्या मनात? आपलं जगणंही कोणीतरी कौतुकाने पहावं असं वाटत असेल का त्यांना? माणसांबद्दल, वाहनांबद्दल काय बोलत असतील ते? कसलीही कुरकुर न करता आपल्या खाचखळग्यांसह अखंड सोबत करणारा हा रस्ता, पटकन थांबावस वाटलं तर आडोशासाठी हक्काचं ठिकाण असणार झाड आणि रात्रीच्या अंधारात स्वतःचीच दृष्टी आपल्याला देणारा अविचल दिवा यांच्याकडे कधीतरी कृतज्ञतेनं पाहिलंय का आपण?
पण पाऊस या उपेक्षितांची कायमच दखल घेतो. आपल्या थेंबाने त्यांना गोंजारतो, त्यांच्या जगण्यावर चढलेली निराशेची, थकव्याची पुटं धुऊन काढतो, मोकळं करतो आणि त्यांना स्वच्छ, नितळ रूप देतो. पाऊस आपल्या ओल्या मायेने सगळ्यांना कवेत घेतो.
पाऊस आपल्या कल्पनेपलिकडेही बरंच काय काय करत असतो.
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈