श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 250
☆ प्रेमभंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सर्व विसरलो प्रीत सागरी पडल्यावरती
शुद्ध हरपली समोरून ती गेल्यावरती
*
अर्थशास्त्र हे तिचे कळाले नंतर मजला
प्रेमभंग हा झाला पैसे सरल्यावरती
*
हाॅटेलातुन ती तारांकित आली दिसली
चहा पीत मी बसलो होतो ठेल्यावरती
*
पाठवणीचा हृद्य सोहळा तिच्या पाहिला
श्वास मोकळा झाला थोडे रडल्यावरती
*
एक रात्र ती छान राहिली माझ्यासोबत
स्वप्नाने बघ कृपाच केली निजल्यावरती
*
प्रेमभंग अन मधुमेहाचे साटेलोटे
दोन्ही व्याधी संपतात बघ मेल्यावरती
*
भेटायाला तशी एकदा आली होती
मृत्यूशय्येवर तो आहे कळल्यावरती
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈