श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
‘बाबा मला पण तुमच्याबरोबर यायचं’.. म्हणून तो मुलगा मागे लागला.त्याचे बाबा निघाले होते नाटकाच्या तालमीला.हौशीच कलाकार होते सगळे ते.कोणी नोकरी करणारे..कोणी दुकानदार.दिवसभर आपापले उद्योग करुन कधीमधी नाटकं करत.
तर सध्या ते अश्याच एका नाटकाची तालीम करत होते.कोणाच्या तरी घरी जमले होते.नाटकाचा जो दिग्दर्शक होता तो आपल्या या पाच सहा वर्षाच्या मुलाला पण घेऊन आला होता.. खुप मागे लागला म्हणून.
पेट्रोमॅक्सच्या.. कंदिलाच्या उजेडात तालीम सुरू झाली.कोणाच्या तरी हातात स्क्रिप्ट होतं..त्यांच्या सुचनेनुसार सगळं सुरू होतं.त्या लहान मुलाला हे सगळं नवीनच होतं.जमलेल्या मंडळीत कोणी अप्पासाहेब होते..कोणी दादा होते.. त्या त्या भुमिकेनुसार ते बोलु लागले.एकजण गडी झाला होता.खोट्या खोट्या दिवाणखान्यातल्या खोट्या खोट्या खुर्च्यांवर तो फडके मारु लागला.
आणि हे सगळं त्यांच्या नेहमीच्याच कपड्यात.. नेहमीच्याच वेशभूषेत..पण त्यांच्या वागण्यातून.. बोलण्यातुन नवीन जग निर्माण होत होतं.कोणीतरी एकजण स्त्री भुमिका पण करत होता.तो स्त्री सारखं बोलु लागला..चालु लागला.
हे सगळं तो लहानगा बघत होता.त्याच्या वयाच्या द्रुष्टीने ही नाटकाची दुनिया वेगळीच होती.तो या नाटकाच्या जगात पार हरवुन गेला.. अणि पहाता पहाता झोपी गेला.
काही दिवसांच्या तालमीनंतर आता प्रत्यक्ष प्रयोग.नेपथ्य..प्रॉपर्टी..वेशभुषा..रंगभुषा..मंडळी जरी हौशी होती..तरी जमेल तसं त्यांनी सगळं उभं केलं होतं.तालमीत पाहीलेलंच तो आता पुन्हा नव्याने पहात होता.तेच नट..तेच संवाद..पण आता त्यांनी मेकअप केलेला.. कोणी दाढी.. कोणी मिशी चिकटलेली.स्त्री पार्ट करणारा नट.. त्याच्या चेहऱ्यावरील भडक रंगरंगोटी..नेसलेली साडी.. आणि कंबर लचकत चालणं..
एखादी जादू घडावी तसं सगळं बदललं होतं.सगळं तेच..पण सगळं नवीन.दु:खाच्या प्रसंगात प्रेक्षक दु:खी होत.. विनोदी प्रसंगात प्रेक्षकात हास्याचे फवारे उडत होते. प्रयोग रंगत गेला.
इतक्या दिवसांची मेहनत घेऊन केलेला प्रयोग संपतो.घरच्यांच बोट धरुन तो मुलगा रंगमंचामागे जातो.आता तर आणखीनच वेगळं जग.तो मघाचा मिशी लावलेला नट बिडी पेटवतो आहे.. स्त्री पार्ट करणारा नट एका कोपऱ्यात जाऊन तंबाखू मळतो आहे.कोणी कपडे बदलतं आहे.
तालमीतलं जग.. प्रत्यक्ष रंगमंचावरचा प्रयोग.. आणि आता हे प्रयोगानंतरचं रंगमंचा मागचं जग..
‘नाटक’ या नावाच्या जादूचा.. आणि त्या मुलाचा तो पहिला संबंध.कुठेतरी नाटकाचं बीज मनात रोवली गेलं ते तिथुनच. नंतर थोडं मोठं झाल्यावर त्यानं शाळेत नाटकं पाहिली..वाचली..कांहीं केली..
आणि तेथुन त्याच्या नाटकाच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पुढे त्या मुलाला एक जगप्रसिद्ध नाटककार म्हणून जग ओळखू लागले.
तो मुलगा म्हणजेच.. विजय तेंडुलकर.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈