श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ आषाढ, मेघदूत, यक्ष आणि यक्षिण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आषाढ….घनांचा मास आषाढ….मेघांचा मास आषाढ…मेघांनी मल्हार गावा,मयूराने पिसारा फुलवावा….मेघांनी आक्रमिलेल्या नभातून घन कोसळू लागावेत आणि फत्तरालाही पाझर फुटून निर्झर खळखळा वाहू लागावेत….तो आषाढ ! ज्येष्ठ पाठमोरा होऊन आषाढाचा पहिला दिवस उगवतो आणि मनात अगदी नकळत शब्द ऐकू येऊ लागतात… *आषाढस्य प्रथम दिवसे*… हो, तोच आषाढ… मेघदूताचा आषाढ… कालिदासाचा आषाढ…..प्रत्येक वेळी नवी अनुभूती देणारा मेघदूताचा आषाढ !
महाकवी कालिदासाचे कल्पनारम्यतेने नटलेले महाकाव्य! मेघदूत या काव्याच्या नावातच त्याचं वेगळेपण जाणवतं.फार मोठं कथानक नसलेल पण तरीही अफाट लोकप्रियता मिळवणारं हे काव्य जगातल्या काव्यरसिकांना वेड लावून गेलंय.पत्नीच्या विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवण्यासाठी त्या मेघालाच दूत होण्याची विनंती करतो.कोण हा यक्ष ? यक्ष हे कुबेराचे सेवक.हिमालयाच्या रांगा हे त्यांचं निवासस्थान.सूर्योदयाचेवेळी देवपूजेसाठी लागणारी हजार कमळे आणून द्यायची जबाबदारी कुबेराने एका यक्षावर सोपवलेली असते.हा यक्ष नवविवाहित असतो.त्यामुळे भल्या पहाटे ,सूर्योदयापूर्वी उठून हे काम करायचं म्हणजे त्याला शिक्षाच वाटत असते.पत्नीचा तेवढा विरहही त्याला सहन होत नसतो.विचार करता,एक गोष्ट त्याच्या लक्षात येते.ती म्हणजे,आपण सूर्योदयापूर्वी फुले,कमळे काढतो.तेव्हा ती उमललेली नसतात.मग ती रात्रीच,कळ्या असताना काढून ठेवली तर कुबेराला कुठे कळणार आहे ? यक्ष आपल्या कल्पनेप्रमाणे रात्री कळ्या खुडून भल्या पहाटे कुबेराकडे पोहचवतो.पण प्रेमाने अंध झालेल्या यक्षाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसते.पूजेच्या शेवटी,शेवटचे कमळ अर्पण करताना,कमळ उमलून त्यातून भुंगा बाहेर पडतो.आधीच्या संध्याकाळी कमळाची पाकळी मिटताना भुंगा त्यात अडकला आहे व कमळ उमलण्यापूर्वीच म्हणजे रात्री खुडले गेले आहे हे कुबेराच्या लक्षात येते.या चुकीची शिक्षा म्हणून ,ज्या पत्नीच्या मोहामुळे ही चूक घडली,त्या प्रिय पत्नीचा एक वर्ष विरह सोसावा लागेल,असा शाप कुबेर त्या यक्षाला देतो.एव्हढेच नव्हे तर या वर्षभरासाठी यक्षाच्या सर्व सिद्धीही काढून घेतल्या जातात.त्यामुळे यक्षाला विरह सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो .हा यक्ष मग अलकापुरी पासून खूप दूर असलेल्या रामगिरी पर्वतावर म्हणजे रामटेक येथे येऊन राहतो.या ठिकाणी आठ महिन्यांचा काळ व्यतीत केल्यावर,वर्षा ऋतुतील आषाढमासातील पहिल्या दिवशी,पर्वत शिखरांवर जमलेले,पाण्याने ओथंबलेले मेघ तो पाहतो.वर्षा ऋतुतील निसर्गरम्य वातावरणात त्याच्या मनातील हुरहूर वाढत जाते.एकीकडे पत्नीची आठवण व काळजी तर दुसरीकडे तिला आपली वाटणारी चिंता अशा अवस्थेत तो सापडतो.त्यामुळे आपले क्षेमकुशल पत्नीला कळवावे या हेतूने पर्वत शिखरावरील मेघालाच तो दूत म्हणून अलकापुरीला जाण्याची विनंती करतो.असा हा मेघ दूत!
या विरही यक्षाच्या मनात कोणते भाव जागृत होत असतील, त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? ते भाव शब्दातून मांडण्याचा हा प्रयत्न:
यक्षगान
*
मनोमंडला मधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले
विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग प्रेम आटले
*
मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु
कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरू
*
सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया
अशी कशी ग क्षणात सारी तुझी आटली माया
*
जाणशील का ह्रदयामधल्या कोमल या भावना
विरह गीत हे गात येथ मी,येईल का तव श्रवणा
*
भाग्यच माझे म्हणून होते स्वप्नी तव दर्शन
धडपडते मन तशात द्याया,तुजला आलिंगन
*
उत्सुक तुजला भेटाया पण,यावे सांग कसे
विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे
*
क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन
तडफडते मन येथ जसे की जळावाचूनी मीन
*
सुखदुःखाचा खेळ असे हा कळते सारे जरी
विरह वेदना मनात सलते उरते जी अंतरी
*
स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता
दुरावाच का आणिल अपुल्या प्रीतिला गाढता.
*
हा विरही यक्ष रामगिरी पर्वतावर काल व्यतीत करत असताना तिकडे अलकानगरीत यक्षिणीची काय अवस्था झाली असेल ? विरहाच्या अग्नीमध्ये होरपळून निघालेल्या यक्षिणीच्या मनात आलेले भाव असेच असतील ना ? :
यक्षिणीचा मानसमेघ
*
आठ महिने संपले पण राहिले हे चार मास
आठवांच्या मोहजाली का तुझे होतात भास
दूर देशी तू तिथे अन् मी इथे सदनी उदास
लोचने पाणावती मंदावुनी जातात श्वास
*
बंधनांची भिंत येथे,मी कुठे कशी शोधू तुला
कोणत्या अज्ञातदेशी जाऊनी तू राहिला
ना सखा साथीस कोणी,संवाद नाही राहिला
मूक झाले शब्द आणि हुंदकाही मूक झाला
*
नियतीचा खेळ सारा दोष मी देऊ कुणाला
ना कुणाचा आसरा खंगलेल्या माझ्या मनाला
मित्र म्हणवती एकही पण संकटी ना धावला
वेदना संदेश माझा तुझ्या मनी ना पोचला
*
ना तुझा सहवास येथे काय करू या वैभवा
यक्षभूमी ही नव्हे, की येऊन पडले रौरवा
रोज मी साहू किती या विरहाग्नीच्या तांडवा
बरसू दे आता जरासा स्नेहभरला चांदवा
*
प्रेम देते प्रेम, म्हणती,का असे शासन मला
घाव वर्मी या जिवाच्या कोणी असे हा घातला
मी गवाक्षी वाट बघता खुणावती मेघमाला
मेघ माझिया मानसीचा नित्य नयनी दाटला .
*
यक्ष आणि यक्षिणीच्या मनाची अवस्था समजून घेऊन शब्दात मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आषाढाच्या पहिल्या दिवशी असणाऱ्या …कालिदास दिनानिमित्त !
आषाढाला शोभेल असा पाऊस पडो आणि सर्वांचेच जीवन नवचैतन्याने उजळून जावो,ही सदिच्छा !
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈