सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘संध्याछाया ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

महात्मा फुले बसस्टॉप . बस मध्ये बायका मुले, वयस्कर मंडळी रिकाम सीट पकडण्यासाठी धावत पळत धडपडत वर चढत होती. हो बसायला जागा तर मिळायला हवी ना ! खिडकी जवळची सीट मिळाल्यामुळे मी अगदी खुशीत होते. इतक्यात ती आली आणि माझ्या शेजारचं सीट तिने चपळाईने पकडलं. हातातल्या भाजीच्या जड पिशव्या खाली ठेवताना, मी तिला न्याहाळलं. गोरापान गोल चेहरा धावत पळत आल्याने लाल झाला होता.

इतक्यात कंडक्टरचा कर्कश  आवाज आला “ओ दादा, किती वेळा सांगायचं तुम्हाला? धड  चालता येत नाही तर येता कशाला बस मध्ये धडपडायला? घरी पडा की  एका कोपऱ्यात आरामात . त्यातून हा पांगुळगाडा बरोबर. वर चढताना इतर पॅसेंजरना त्रास, आणि रोज रोज पुढच्या बस स्टॉप वर उतरवून देताना आम्हाला त्रास, आमचा वेळ जातोच की फुकट.”

आजोबांच्या केविलवाण्या  चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत कंडक्टर ओरडतच होता, “चला उतरा,  उतरा खाली. एकदा सांगून कळत  नाही का तुम्हाला? रोजची साली कटकट.”   

आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पायरीवर चढवलेला पांगुळगाडा आणि एकच पाय असलेलं पाऊल मागे सरकलं.

माझ्या शेजारी बसलेल्या तिच्या कानावर हा वरील संवाद पडला. ती ताडकन उठली. आता तिचा गुलाबी चेहरा रागाने लालीलाल झाला होता. मला तिचं सीट पकडायला सांगून ती आवेशाने खाली उतरली. आजोबांना बस मध्ये चढायला मदत करताना ती म्हणाली, “चढा हो आजोबा, मी उतरवून देईन तुम्हाला तुमच्या स्टॉप वर.”

कंडक्टर खेकसला,”ओ बाई, तुम्ही कशाला मध्ये पडताय? खाली पिली टाईम जातोय आमचा. तुमचा काय संबंध?”

ती कडाडली, “संबंध? माझा  काय संबंध ? माझा संबंध आहे माणुसकीशी. आणि काय हो ? वेळेच्या गोष्टी कुणाला सांगता? पानाच्या पिचकाऱ्या टाकत, टाळ्या देत इतका वेळ तुम्ही टाईमपास करीत बसला होतातच ना? बस सुटायची वेळ उलटून गेलीय. बस मधली वृद्ध माणसं, अवघडलेल्या बायका, ओझ्याने वाकलेल्या मावश्या आणि शाळा सुटल्यावर दमलेली, दप्तराच्या ओझ्याने  थकलेली भुकेलेली ही शाळकरी चिमणी पाखरं, किती जणांना ताटकळत ठेवलंत तुम्ही,? तेव्हां कुठे गेला होता तुमचा वेळ ?असंच काहीतरी कारण असल्याशिवाय हे आजोबा घरा बाहेर पडले नसतील. काहीतरी काम असेल, कुणाला तरी भेटायच असेल. त्यांनाही शारीरिक त्रास होत असेलच ना! एकाच पायावर भर टाकून चढताना. त्यांचा तरी काही विचार करा.” कंडक्टरच्या गुर्मीला न जुमानता तिने आजोबांना वर चढवून, माझ्या शेजारी, म्हणजे तिच्या सीटवर बसवलं आणि म्हणाली, “बाबा! तुमचं काय काम असेल तर मला सांगा. अगदी नाईलाजानेच तुम्हाला कुठे जाण्याची वेळ आली तर मला आधी फोन करा. मी रोज असते या बसला. माणुसकी सोडून, या लोकांनी बस सुरू केली तर मी बस अडवून तुम्हाला वर चढवीन. आणि हो,अहो बाबा कुणा करता?,  कुणाच्या ओढीने एवढा स्वतःला त्रास करून तुम्ही हा  बसचा अवघड प्रवास  कशाकरता? आणि का करताय ? तुमच्या परिस्थितीचा, वयाचा पण विचार करा ना जरा! रिक्षा करावी नां!”

दम लागल्याने डोळे मिटून शांत बसलेले आजोबा उत्तरले,”ते समद खरं आहे पोरी, पर रिक्षासाठी रोज  पैसा आणू कुठून?”

आता मलाही आजोबांची दया आली आणि प्रश्न पडला. न राहून मी विचारलं, “बाबा काही त्रास आहे का तुम्हाला? रोज कुणाला भेटायला जाता ? बरोबर तुमचा मुलगा का नाही येत?”

बाबा म्हणाले,”काय सांगू ताई माझी कर्म कहाणी? मुलगा नशेत असतो नेहमी. मोठ्या मुलाला अटॅक आला म्हणून त्याच्या आजारात पैका लावला.   अन धाकट्याचं डोकं फिरलं, भाऊबंदकी आडवी आली.”

आजोबांची गाडी वळणावर आणत  मी विचारलं,” सांगा ना बाबा, तुम्ही अशा परिस्थितीत रोज का आणि कुठे जाता?”

आता बस मधल्या सगळ्यांचे लक्ष बाबांच्या उत्तराकडे लागलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता  होती. अगदी कंडक्टर आणि ड्रायव्हर सुद्धा थबकले होते. आजोबा पुढे म्हणाले, “संपत्तीची जमिनीची, घराची, वाटणी होते. पण आमची, — आमची नवरा-बायकोची वाटणी केली, या आमच्या मुलांनी. मुलगा म्हणाला, ‘आम्ही नाही तुम्हाला दोघांना पोसू शकत.’ आईला हाकललं मोठ्याकडे आणि मी तुकडे मोडतोय धाकल्याकडं. घरात सारखी कचकच चालतीया. त्यातून कारभारीन जवळ नाही. दुखल्याखुपल्याला भाकर तुकड्याला, ह्या वयात जवळचं मायेचं माणूस  आपल्याजवळ हव़च ना हो ताई? ती तिकडं झुरतीया आणि मी बी इकडं कणाकणाने मरतोया. आज पंधरा दिवस झाले ती आजारी आहे. हातापायाच्या काड्या झाल्यात. सरकारी दवाखान्यात टाकलंय तिला. आज काही वंगाळ तर ऐकायला नाही ना मिळणार? या विचाराने धडधडत्या छातीने तिला भेटायला मी रोज जातो. तिला पाहून मला असं वाटतं माझी साता जन्माची सोबतीण,माझी  रोज वाट पाहतीय आणि मग मला पाहून तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर  हंसु उमटतं.. मायेने माझ्या हातावरून ती हात फिरवते. तिच्या डोळ्यात हसूं ही असतं आणि आसवंही असत्यात. पण मला पाहून ती खुलते, एवढं  मात्र खरं, आणि त्यासाठीच, फक्त तिला भेटण्यासाठी, तिच्या थकलेल्या सुकलेल्या चेहऱ्यावरचे हंसू बघण्यासाठीच  मी रोज तिथे जातो, तिच्याजवळ घडीभर बसतो. तिला चमच्याने चहा पाजतो, बिस्किटाच्या पुडा हातांत सरकवतो, घडीभर सुखा दुःखाच्या गोष्टी करतो आणि जड अंतकरणाने एका पायात मणा मणा चे ओझं बाळगून दवाखान्याच्या बाहेर पडतो. मागे वळून बघताना तिचे आसवांनी भरलेले डोळे बघत, माझ्या डोळ्यातलं पाणी लपवत या काठीचा, या पांगुळ गाड्याचा आधार घेत, मी परतीची वाट धरतो. या वयात मला तिची सोबत हवी असते. तिला माझा आधार हवा असतो. पण दुर्दैव माझं, मलाच या काठीचा आधार  घ्यावा लागतोय”.  आजोबा बांध फुटावा तसे घडाघडा डोळे मिटून अखंड बोलत होते.

अपंगत्वा बरोबर दुसरं आणखी एक दुःख त्यांच्या मनात सलत होतं. हे ऐकून बस मधले प्रवासी आणि मी पण निशब्द झाले. वरवर सामान्य दिसणाऱ्या या आजोबांची व्यथा ऐकून सगळे अंतर्मुख झाले होते.

माझ्या मनात आलं, प्राप्त परीस्थितीला सामोरं जाणं, आहे ते स्विकारून मार्ग काढणं, कठीणच आहे  किती कौतुक करण्यासारखं आहे आजोबांचं हे असं वागणं! दुःख प्रत्येकालाच असतं. पण प्राप्त परिस्थितीला सामोरं जाऊन नेटाने त्यांनी पुढचं पाऊल टाकलं होतं. कोंडलेली मनातली खळबळ कुणापाशी तरी त्यांना मोकळी करायची होती. पण ती व्यथा सांगताना त्यांचे डोळे मिटलेले होते. जणू काही पापण्यांच्या पडद्याआड ते आपले अश्रू लपवत असावेत.  काय सांगावं कदाचित मिटल्या डोळ्यातून ते आशेचा किरणही शोधत असतील. त्यांच्या मनात विचार येत असतील, ऋतू बदलतो,  हवामानही बदलतं. तसं आजचं हे परिस्थितीचं वादळही मिटेल.आणि आम्ही सगळे एकत्र येऊ. आज नाही उद्या मार्ग निघेल आणि नवरा बायकोची ही ताटातूट संपेल. ही आशा असेल त्यांच्या मनात.मला ‘तू तिथे मी’ सिनेमा आठवला. ते ही नवरा बायको        एकमेकांपासून दूर मुलांकडे राहण्याच्या व्यथेमुळे असेच कासाविस झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची सोबत ही हवीच नाही का ?

मी विचारांच्या तंद्रीत होते. अचानक तीरा सारखा कंडक्टर पुढे आला. आजोबांना हात जोडून म्हणाला, ” बाबा चुकलं माझं! तुमच्या रोज येण्याचं कारण नव्हतं माहित मला! गर्दीच्या या ड्युटीमुळे आम्हीपण चिडचिडे झालो आहोत. तरी पण रागाच्या भरात असं टाकून बोलायला नको होतं मी तुम्हाला. मला माफ करा आजोबा.” 

आजोबा   कनवाळु होते. ते म्हणाले, “आरं माझ्या लेकरा,पोरासारखा आहेस तु मला!  माझ्या चढण्या उतरण्याचा त्रास बघवला नाही तुला! म्हणून तू रागावलास बाळा.”    

कंडक्टर पुढे म्हणाला, “या ताईंनी झणझणीत अंजन घातल्यामुळे माझे डोळे उघडले, आणि तुमचंही सांठलेलं दुःख मोकळं झालं. नाव काय तुमचं  ताई.?”

“अरे दादा तिचं नाव अहिल्या  आहे अहिल्या. सगळ्यांच्या सुखाचा विचार करून प्रत्येकाला मदत करते ती..” बस मधली एक मावशी ओरडून सांगत होती कंडक्टरला.  

अहिल्येचा राग केव्हाच पळाला होता. ती रोज येणाऱ्या प्रवाशांकडे वळून म्हणाली, “आपण बाबांना बसमध्ये चढा उतरायला मदत करायचीय बरं का! रोज दोन तरी फळं बाबां बरोबर त्यांच्या कारभारनी साठी द्यायची, म्हणजे त्यांची व बाबांची शक्ती भरून येईल. बाबांना बसमधून त्यांच्या स्टॉपला उतरवून दवाखान्यात पोहोचवण्याचं काम माझं. आणि हो! माझ्या मुलाचं कॉलेज दुपारी नसतं. बाबा आणि मी तिथे पोहोचेपर्यंत तो बसेल दवाखान्यात अभ्यास करत आजींजवळ, त्यांना हवं नको ते बघायला. आणि हो! बस मधल्या प्रत्येकाला मी विनंती करते, जमेल तशी जमेल तेव्हा बाबांना आपण मदत करायची आणि आर्थिक बाबतीतही थोडी मदत करू या. तुमच्यापैकी कुणाची ओळख आहे का सरकारी दवाखान्यात? म्हणजे डॉक्टरांना भेटून आपण आजींची चांगली देखभाल करायला सांगू, बाबांची  पण काळजी मिटेल, हो ना बाबा ?” एका दमात सगळं बोलणाऱ्या 

अहिल्येचा हात हातात घेत बाबा गहिवरून म्हणाले, “हो गं पोरी हो! मग तर माझी अख्खी काळजी मिटल. बसचं इंजिन बंद करून ड्रायव्हर उडी मारून पुढे आला आणि म्हणाला, “उद्या माझी रेस्ट आहे, सरकारी दवाखान्यात माझी ओळख आहे. उद्याच भेटतो मी डॉक्टरांना.  बाबा तुमच्या कारभारणीचं नांव सांगा. कॉट नंबरही सांगा,

 पुढचं मी बघतो. काळजी करू नका.” 

अहिल्या पण उत्साहाने   म्हणाली, “बाबा मी कामाला जाते शनि पाराजवळ. तिथे वरकामाला एक बाई हवीय. तुमच्या सुनेसाठी विचारू का? त्यांना वरकामासाठी बाई आत्ताच हवी आहे.” 

एक सदृहस्थ उठले आणि म्हणाले,”आमच्या रोटरी क्लब तर्फे बाबांच्या पायासाठी काही मदत नक्कीच मिळेल. खर्च बराच आहे पण शक्य तितकी मदत मिळेलच.”

अहिल्या म्हणाली, “आपण मदत केंद्राकडूनही मदत घेऊ शकतो. आमच्या मालकीण बाईची खूप ठिकाणी ओळख आहे. जगात नुसत्या पैशांनी नव्हे तर मनानेही श्रीमंत दानशूर आहेतच.

बाबांसाठी असा चहूबाजूनी पैशाचा ओघ आला तर, त्यांच्या पायाच्या मापाचा बुटही करता येईल. आणि हो! व्यसनमुक्ती केंद्रात माझ्या दादाची ओळख आहे. आता काळजी करू नका बरं का बाबा! तिकडे  गेल्यावर तुमच्या मुलाचं व्यसनही सुटेल “.

मी त्या चुणचुणीत व भराभर प्रश्न सोडवून मदत करणाऱ्या अहिल्याकडे बघतच राहयले. अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आपण नेहमी उत्साहाने साजरी करतो. त्यांच्यासारखीच लोककल्याणासाठी झटणारी ही समोर उभी असलेली सेवाभावी वृत्तीची आधुनिक अहिल्याच भासली ती मला.

मी आजोबांकडे बघितलं, मघाचा त्यांचा काळवंडलेला  दुःखी चेहरा आता या सगळ्याच्या दिलाश्याने उजळला होता. आधीसारखे डोळ्यातले अश्रु आता दुःखाचे नसून आनंदाश्रु होते. माझ्या मनातं आलं, आधार देणारा हात नेहमी श्रेष्ठच असतो. मग तो हात आधार देणारा असो की मानसिक बळ देणारा असो.     

60 मिनिटांचा  बसचा प्रवास होता तो. पण आम्ही सारे एक आहोत, समदु:खी आणि सम -सुखीही आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. मनात विचारआला ‘आम्ही सारे भाऊ भाऊ, एक दिलाने सुखी राहू .l    

बाहेर बघितलं तर १५ ऑगस्ट चा  तिरंगा महात्मा फुले मंडईवर डौलाने फडफडत होता‌. सळसळणाऱ्या उत्साहाने तो आम्हाला संदेश देत होता ‘हर घर घर मे तिरंगाl हर मन मन मे तिरंगा l’ देशभक्तीपर गाणं रेकॉर्डवर लागलं होतं माझा हात सलामी साठी वर उचलला गेला.

‘ जयहिंद. भारत माता की जय. 🇮🇳 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments