सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

ब्रह्मदेवाने स्वतः आणखी प्रजा विस्तार करण्यासाठी अनेक ऋषी उत्पन्न केले. त्यांना प्रजापती  ऋषी असे म्हणतात. त्यापैकीच एक कृतु हे प्रजापती ऋषी. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाच्या हातातून त्यांचा जन्म झाला.

ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी दक्ष प्रजापती आणि क्रिया यांची कन्या सन्नती हिच्याशी विवाह केला. उभयतांना बालीखिल्य नावाचे साठ हजार पुत्र झाले. त्या पुत्रांचा आकार अंगठ्याएवढा होता. ते सगळे सूर्याचे उपासक होते. ते सदैव सूर्याच्या रथाच्या समोर आपले मुख करून चालत रहात. सूर्याची स्तुती करत. ते सारे ब्रम्हर्षी होते. त्यांची तपस्या आणि शक्ती सूर्य देवाला मिळत असे.

एकदा महर्षी कश्यप ऋषींनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कृतुंना सांगितले ,या यज्ञात आपण ब्रम्हाचे स्थान ग्रहण करा. महर्षी कृतुंनी ते मान्य केले. आपल्या साठ हजार पुत्रांना घेऊन ते यज्ञ स्थळी आले. तेथे देवराज इंद्र आणि कृतूंचे पुत्र यांच्यामध्ये वाद सुरू झाला. महर्षी कृतु आणि महर्षी कश्यप दोघांनी मध्यस्थी केली. कृतुंच्या  पुत्रांनी पक्षी राज गरुडाला महर्षी कश्यपांना पुत्र रूपात देऊन टाकले.

महर्षी कृतुंना दोन बहिणी होत्या . त्यांची नावे पुण्य आणि सत्यवती अशी होती. महर्षी कृतु आणि सन्नती यांच्या एका मुलीचे नावही पुण्य होते.

सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी एकच वेद निर्माण केला. त्यानंतर महर्षी कृतुंनी वेदांचे चार भागात विभाजन करण्यासाठी त्यांना मदत केली. पुढे वराहकल्प युगात महर्षी कृतुच वेदव्यास या नावाने जन्माला आले.

स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांचा पुत्र उत्तानपाद. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव. ध्रुववर महर्षी कृतुंचे खूप प्रेम होते. जेव्हा ध्रुव अपमानित होऊन अढळस्थान मिळवण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा तो प्रथम महर्षी कृतु यांच्याकडेच आला. कृतु ऋषींनी त्याला विष्णूची आराधना करण्यास सांगितले. देवर्षी नारदांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच ध्रुवाला अढळस्थान मिळाले. ध्रुवावर खूप प्रेम असल्यामुळे महर्षी कृतु अखेर धृवाकडेच गेले. म्हणूनच आजही ध्रुवताऱ्याच्या जवळ कृतु ऋषींचा  तारा आहे.

पुराणात महर्षी कृतुंबद्दल अनेक कथा आहेत. महर्षी अगस्ती यांचा पुत्र ईधवाहा याला त्यांनी दत्तक घेतले होते. शिवाय महाराज भरतने देवांच्या चरित्राविषयी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. महर्षींनी त्यांच्या शंकांचे समाधान केले. अशा या थोर महर्षींना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments