श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
शेगाव रेल्वे स्टेशन. संध्याकाळची शेवटची एक्सप्रेस निघून गेली आणि काही मिनिटांतच फलाट रिकामा झाला. रेखताईंची ड्युटी थोड्याच वेळात ड्युटी संपणार होती. आता युनिफॉर्म बदलून सिव्हिल ड्रेस चढवायचा आणि घराकडे निघायचे अशा विचारात असतानाच त्यांना ती दिसली… फलाटावरील शेवटच्या एका बाकड्यावर काहीशा विचारमग्न अवस्थेत… शून्यात नजर लावून! रेखाताईंनी आपल्या चेंजिंग रुमकडे जाण्याचा विचार बदलला. तिच्याकडे काही पिशवी वगैरे दिसत नव्हती. सोबत कुणीही नव्हते आणि इतक्यात कोणतीही प्रवासी गाडी या स्टेशनवर थांबणार नव्हती… शिवाय ती बाई दोन जीवांची दिसत होती… दिवस भरत आलेले!
ताईंनी तिच्याजवळ जाऊन तिला हटकले तर म्हणाली “आत्या येणार आहे.. तिला घ्यायला आलेय!”. “एक्स्प्रेस तर मघाशीच निघून गेली की तुझ्यासमोरूनच! नाही आली का तुझी आत्या?” त्यावर ती बाई निरुत्तर झाली… तिला बाई म्हणायचं कारण तिच्या गळ्यात असलेलं ते मंगळसूत्र! लग्नाला एका वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले असतील असं वाटतं नव्हतं. एकोणीस- वीस वर्षांची पोरच ती!
ती खोटं बोलते आहे हे ताईंनी अनुभवाने ओळखलं. तिला जरा जरबेच्या आवाजातच सांगितले… ”घरी जा.. आणि रिक्षेने जा! अशा अवस्थेत तुझं पायी जाणं बरोबर नाही!”
“कुठे राहतेस?” या प्रश्नावर तिने तिचे राहण्याचे ठिकाण सांगितले. याच गावातल्या स्टेशनवर GRP मध्ये म्हणजे General Railway Police खात्यात खूप वर्षे सेवा करीत असल्याने आणि जवळपास राहत असल्याने ताईंना सारा परिसर चांगलाच माहित होता. सहज चालत जाण्यासारखे अंतर तर नव्हतं.. आणि गर्भारपणात आणि ते ही दिवस भरत आल्याच्या दिवसांत तर नव्हतंच नव्हतं!
ती पोर हळूहळू पावलं टाकीत स्टेशनच्या बाहेर जायला निघाली. स्टेशनच्या पाय-या उतरून बाहेर पडली आणि तिथेच घुटमळली. ताईंचे तिच्यावर लक्ष होतंच. ती पोरगी काही रिक्षात बसली नाही. ती काही घरी जाण्याच्या मन:स्थितीमध्ये असेल असं दिसत नव्हतं!
ताई स्टेशन सोडून तिच्या मागोमाग निघाल्या. तशी ती फार दूर गेलेली नव्हती. पण आपण तिचा पाठलाग करतो आहोत, असे तिला वाटू नये म्हणून ताईंनी आपला वेग कमी ठेवला होता. अन्यथा तिने भलतंच काही केलं असतं.. अशी शक्यता होती.
ताईंचा सहकारी विशाल जाधव त्याची ड्युटी संपवून स्टेशन बाहेर पडत होता. ताई स्टेशन सोडून बाहेर का पडत आहेत.. आणि ते सुद्धा युनिफॉर्मवर.. हे त्याला समजेना.
नियमानुसार ताईंची जबाबदारी सस्टेशनच्या हद्दीपुरती मर्यादित होती. पण का कुणास ठाऊक आज त्यांना या मर्यादेबाहेर जावंसं वाटलं. असंच होतं त्यांच्याबाबतीत. का कुणास ठाऊक पण काही विपरीत घटना घडायची असली की त्यांचं मन त्या ठिकाणी जा असं सुचवायचं. गेल्या कित्येक वर्षांच्या सेवेत त्यांनी कितीतरी अपघात, आत्महत्या पाहिल्या होत्या. जमेल त्यांना स्वतःहून मदतीचा हात दिला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवापाड मेहनत करून त्या रेल्वे पोलिसात भरती झाल्या होत्या आणि आज हवालदार पदावर पोहोचल्या होत्या. आज यावेळी स्टेशनबाहेर पडताना ताईंनी वरीष्ठांना कल्पना दिली नाही.. कारण एकतर ड्युटी संपली होती आणि तेव्हढा वेळच नव्हता!
त्यांच्यापुढे चालणारी ती पोरगी तिच्या घराच्या रस्त्याकडे वळणार नाही हे त्यांनी ताडले.
“ताई, इकडे कुठं स्टेशन सोडून?” विशालने विचारले. तो तिला ताई म्हणायचा! “ती समोर चाललेली पोरगी बघतलीस का? तिचा काहीतरी भलताच विचार दिसतोय. एक काम कर… तुझ्या अंगावर सिविल ड्रेस आहे. तू तिच्या मागोमाग चाल… मी मागून येतेच.. मला युनिफॉर्म वर बघून तिला संशय येईल! आणि लोकही विनाकारण गर्दी करतील”
आणि तिला शंका होती तसंच झाली… ती पुढं चालणारी घराच्या दिशेने न वळता गजानन महाराजांच्या मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या दुस-या रेल्वे ट्रॅकच्या दिशेने निघालेली होती… त्या मार्गावरून यावेळी ब-याच ट्रेन्स जात-येत असतात… आणि त्याबाजूला तशी कुणाची गजबजही नसते. काही वेळातच अंधार पडणार होता. आता या दोघांनीही आपल्या पावलांचा वेग वाढवला. ती पोरगी सारखी मागे वळून बघत होती… तिला आपण दिसू नये म्हणून ताई एखाद्या आडोशाला जात… आणि पुन्हा पाठलाग सुरू करत. येणा-या जाणा-यांना विनाकारण संशय येऊ नये याची काळजी घेत ते दोघे तिच्या दिशेने निघाले. कारण विनाकारण आरडाओरडा केला असता तर ती पोरगी भेदरली असती आणि काही भलतंच होउन बसलं असतं! त्या पोरीचं लक्ष नव्हतंच. ट्रॅक वरचे दोन्ही बाजूंचे सिग्नल हिरवे झालेले होते… ट्रेन तिथून जाण्याची वेळ झालीच होती.. कोणतीही ट्रेन काही क्षणांत तिथे पोहोचणार होती!
आता मात्र हे दोघेही पळत निघाले… तिचं लक्ष नव्हतंच.. आवाज देऊनही काही उपयोग नव्हता… विशाल दादाने पुढे धावत जाऊन तिला रुळावर जाण्याच्या आधीच आडवे होऊन तिचा रस्ता रोखून धरला…. तेंव्हा ती भानावर आली! ताई क्षणार्धात तिच्याजवळ पोहोचल्या!
“काय विचार आहे? घरी जायचं सोडून इकडं कशाला आलीस? मरायचंय पोटातल्या बाळाला सोबत घेऊन?” या प्रश्नांची तिच्याकडे उत्तरे होतीच कुठे? डोळे अश्रूंनी डबडबले आणि पाठोपाठ जोराचा हुंदका उमटला गळ्यातून. ताईंनी तिच्या खांद्यावर थोपटले आणि मग तिला स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवू दिले!
“शांत हो! काय झालं मला सांगशील? तुझ्या नव-याचा मोबाईल नंबर दे! त्याने तुला असं एकटीला घराबाहेर पडू दिलंच कसं?” एवढ्यात एक मालगाडी भरधाव अप ट्रॅकवरून धडधडत निघून गेली! त्या पोरीनं त्या गाडीकडे एकदा पाहिलं आणि डोळे मिटून घेतले!
बराच वेळ झाल्यावर तिने कसाबसा नव-याचा नंबर सांगितला. ताईंनी आपल्या मोबाईलवरून त्याला कॉल लावला. पलीकडून हॅलो असे काळजीच्या सुरातील प्रत्युत्तर ऐकताक्षणीच ताईचा रागाचा पार चढला…. ”असशील तिथून आणि असशील तसा निघून ये… !” तिचा नवरा होता फोनवर. त्याने कसाबसा ठिकाण विचारले आणि तो बाईकवर निघाला…. ”लगेच पोहोचतो, मॅडम!”
तो पर्यंत त्या बाजूने जाणारे काही बघे तिथे थांबून झाला प्रकार समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. ताईंनी त्यांना पिटाळून लावले. त्या पोरीचा नवरा पोहोचलाच… घामाघूम होऊन. ती घरातून निघून बराच वेळ झाला होता आणि तो तिला गावभर शोधत होता. ती मोबाईल घरीच ठेवून बाहेर पडली होती.. घरात काहीतरी कटकट निश्चित झाली असावी!
ताईंनी त्याला झापझाप झापलं. या पोरीच्या जीवाला याच्यापुढं काही झालं ना तर पहिलं तुला आत टाकीन.. असा सज्जड दम दिला! “अरे, या दिवसांत व्याकूळ असतात पोरी. त्यांना समजून घ्यायला पाहिजे की नको? तुझ्याही बहिणी असतीलच की लग्न करून सासरी गेलेल्या? त्यांच्या सासरच्यांनी त्यांना असं वागवलं तर चालेल का तुला? तुझ्या घरच्यांना समजावून सांग…. म्हणावं…. ही सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”
तो खाली मान घालून सारं ऐकून घेत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी होतं… आज आपण बायको आणि मूल अशी दोन माणसं गमावून बसलो असतो, याची जाणीव त्याला झालेली दिसत होती. ताईंनी एका कागदाच्या तुकड्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून तिच्याकडे दिला. “घरी जाऊन आधी तुझ्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह कर आणि कधी गरज पडली तर विनासंकोच फोन कर.. आणि असा वेडेपणा पुन्हा कधीच करू नकोस…. बाळ झाल्यावर सगळं काही ठीक होईल!”
त्या पोरीचा नवरा रेखाताईंचे, विशालदादांचे पुन्हा पुन्हा आभार मानून बायकोला बाईकवर घेऊन सावकाश गाडी चालवत तिथून निघाला. ती पोरगी ताईंकडे पहात हात हालवत राहिली… नजरेआड होईतोवर!
इकडे ताई स्टेशनकडे लगबगीने निघाल्या. ताई स्टेशनबाहेर गेल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. ताईंनीही कुणाला काही सांगितलं नाही.. out of the way आणि out of jurisdiction जाऊन काम करण्याची परंपरा तशी कमीच आपल्याकडे!
युनिफॉर्म बदलून ताई घराकडे निघाल्या! गजानन बाबांच्या मंदिरासमोरून जाताना त्यांनी कळसाकडे पाहून हात जोडले… आणि आरती सुरू झाल्याचा शंख वाजू लागला…. ताईंची सेवा गजानन महाराजांच्या चरणी रुजू झाली होती ! रेखाताईंनी आजवर अशा अनेक लोकांना बचावले आहे. त्यांचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले आहेत. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रेखताईंचे पती नुकत्याच झालेल्या एका गंभीर अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. चांगल्या कर्मांची फळे परमेश्वर आपल्याला देतोच, अशी रेखाताईंची श्रध्दा आहे. त्यांच्या अनुभवांचे संकलन त्या करणार आहेत. सकारात्मक गोष्टींचा प्रसार व्हावा, म्हणून मी हा लेख त्यांच्या संमतीने लिहिला आहे. यात प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नाही.
(नुकत्याच केलेल्या शेगाव-पुणे रेल्वे प्रवासात GRP हवालदार रेखाताई वानखेडे नावाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेशी संवाद करण्याचा योग आला. त्यांच्याकडून अशा कितीतरी गोष्टी ऐकायला मिळाल्या. प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात ‘आऊट ऑफ वे ‘ जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून समाजाची सेवा करणारी माणसं आपल्या भोवती आहेत, याचा आनंद झाला. त्यांनी सांगितलेल्या अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव थोडेसे लेखन स्वातंत्र्य घेऊन सुहृद वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रेखाताईंना, विशाल जाधव यांना तुम्ही मनातून का होईना… आशीर्वाद, शुभेच्छा द्यालच, कौतुकाचे चार शब्द लिहाल, अशी खात्री आहे ! )
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈