सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ समतोल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
धो धो पाऊस पडो आणि
नदिस यावा मोठा पूर
माणसांतील चुकांना तो
वाहो नेऊन खूप दूर
*
वृत्ति कृतीतील चुका वाहता
परतून याव्या कधी ना पुन्हा
पूर जाईल ओसरून अन्
मागे राहील माणूस शहाणा
*
कधीच टाकणार नाही मग
प्लॅस्टिक गटारी रस्त्यावर
तुंबून गटारी घनकचऱ्याने
नदीस फुगवटा, येतो पूर
*
जागोजागी लावीन झाडे
घेईन काळजी हिरवाईची
कळेल आपसूक ही श्रीमंती
खरी असते मिरवायाची
*
बँकबॅलन्स जसा गरजेचा
सुखी जगण्या निसर्ग बॅलन्स
दोन्हीकडचा समतोल साधून
मिळे शाश्वतता येत्या पिढीस
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈