सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ सैनिकांची मावशी… अनुराधाताई – लेखक – श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
अनुराधाताई
“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक ‘ मावशी ‘ नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा हा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.
सीमेवर एक जवान चुकून भूसुरुंगवार पाय पडल्यामुळे जखमी होतो. अनुराधाताईंना ते कळते. त्या काळजीपोटी त्याला फोन करतात. तो फोन उचलून म्हणतो, ” जय हिंद मावशी. मी अगदी फिट आहे. सुरुंगवार पाय पडल्यावर स्फोट झाला आणि माझा एक पाय माझ्या डोळ्यांसमोर आकाशात तुटून उडाला. आणखी काही जखमा झाल्या आहेत, पण मी फिट आहे!” एक पाय गमावलेला जखमी जवान स्वतःला फिट म्हणवतो. ही कथा अनुराधाताई आपल्याला सांगतात आणि आपले डोळे अभिमानाने चमकतात आणि पाणवतातही. भारतीय सैन्य म्हणजे धैर्य आणि शौर्याचं प्रतीक. पण सिनेस्टारच्या कथा जशा आपल्यापर्यंत पोहोचतात तशा ह्या सैनिकांच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आपण फक्त १५ ऑगस्टला त्यांची आठवण काढतो आणि नंतर विसरून जातो.
अनुराधाताई बँकेत नोकरीला होत्या तेव्हा त्याही फक्त १५ ऑगस्टला सैन्याची आठवण काढायच्या. एकदा त्या कारगिलला पर्यटक म्हणून गेल्या आणि त्या भेटीने त्यांचं जीवन बदललं. तिथे सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आणि अनुराधाताईंनी मनात ठरवून टाकलं की समाज आणि सैनिक ह्यांच्यात जे अंतर आहे ते मी कमी करेन. त्यातून त्यांनी लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना केली आणि आज त्या भारतीय सैनिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम करतात. त्या स्वतः एकेका सैनिकांबद्दल बोलतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून त्या बोलतात. तसेच सैनिकांना भेटण्यासाठी, सैनिकांशी बोलण्यासाठी त्या पर्यटकांना लद्दाख, कारगिल इत्यादी ठिकाणी घेऊन जातात. सैनिकांच्या विधवा पत्नीला समाजातून पाठबळ मिळवून देतात. महत्वाचं म्हणजे सामान्य भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत हे सैनिकाला जाणवू देतात.
आपल्या भाषणातून त्या म्हणतात, ” आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. कारण तिथे बॉम्ब हल्ले होत नाहीत, शत्रूने माईन्स पेरलेले नसतात आणि कोणीही आपल्यावर स्नाइपरमधून गोळी घालत नाही. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत ते सैनिकांमुळे. आपल्याला freedom मिळालं आहे, पण ते free नाही. त्यासाठी मायनस 56 डिग्री तापमानात, रात्रीच्या मिट्ट काळोखात सैनिक पहारा देत आहेत. “
अनुराधाताई बोलू लागल्या की सैन्यातील अनेक किस्से सांगू लागतात. आधी आपल्याला लेफ्टनंट कर्नल गोयलचा फोटो दाखवतात. तो नाच करताना दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये तो बुलेटवर दिसतो. पण ह्या फोटोमागचं सत्य काही निराळं असतं. ह्या २५ वर्षाच्या सैनिकाला श्रीनगरच्या भागात जाऊन अतिरेक्यांचा खात्मा करायचं काम दिलेलं असतं. तो तिथे जातो, पण अतिरेक्यांनी पेरलेल्या माईनवर त्याचा पाय पडतो आणि स्फोट होऊन त्याच्या पायाचे तुकडे होतात. त्याला वाचवायला दुसरा शीख सैनिक पुढे येतो तेव्हा हा आज्ञा देतो ” आगे मत आना. नही तो मै कोर्ट मार्शल कर दूंगा”. ही आज्ञा तो देतो कारण आणखी माईन्स दडवलेले असू शकतात आणि त्यात त्या शीख सैनिकाचा जीव जाऊ शकतो. पण तो शीख सैनिकही काही कमी नसतो. तो स्वतःचा फेटा काढतो आणि लेफ्टनंट कर्नल गोयलचा पाय बांधून त्याला दवाखान्यात नेतो. लक्षात ठेवा, शीख माणूस कधीही आपला फेटा उतरवत नाहीत. पण इथे त्याने तो उतरवला, आपल्या साथीदारांचा, एका निडर बहाद्दराचा जीव वाचवण्यासाठी!
लेफ्टनंट कर्नल गोयलच स्वप्न होतं मुलाला फुटबॉल शिकवणं. पाय तुटल्यावर तो मुलाला फुटबॉल कसा शिकवणार? पण परिस्थितीला शरण जाईल तो सैनिक कसला ? गोयलने कृत्रिम पाय लावला आणि तो सैन्यात प्रशिक्षक बनला. धावू लागला, खेळू लागला. पोहू लागला आणि पॅराग्लाईडींगही केलं.
त्याने म्हटलं आहे, “When people doubted my ability to walk, I decided to fly.”
नागालँड हा भारताचा भाग आहे. पण तिथे भारतीय सैन्याचा इतका दुस्वास करत असत की इंडियन आर्मी हे नाव जरी काढलं तरी ठार मारायचे. सामान्य नागालँडकर भारताचा अविभाज्य भाग आहे हे मानायला तयार नव्हते. तरीही एक तरुण भारतीय सैन्यात भरती झाला. सोबत आणखी काही नागालँडच्या तरुणांना आणले. पुढे हा मुलगा लद्दाखमधे युद्धात शहीद झाला. त्याला महावीर चक्र मिळालं. त्याचं हे सीमा नसलेलं काम अनुराधाताई अभिमानाने सांगतात तेव्हा आपला उर भरून आल्याशिवाय राहत नाही. पुढची कथा असते कॅप्टन मनोज पांडेची. कॅप्टन पांडे शहीद झाला. देशासाठी बलिदान देण्याआधी त्याने म्हटलं-एखादं ध्येय इतकं उत्तुंग असतं की त्यात मिळालेलं अपयशही तितकंच उत्तुंग असतं. मनोज पांडे वयाच्या २३ व्या वर्षी धारातीर्थी पडला.
भारतीय सैनिकांच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन घडवताना त्या १९७१ च्या संघर्षाचा आवर्जून उल्लेख करतात. अनेक सैनिकांनी आपलं बलिदान देऊन बांग्लादेशाची निर्मिती केली. सैनिकांनी एका देशाची निर्मिती केली अशी उदाहरणे फार दुर्मिळ आहेत. हे धैर्य आपल्या सैनिकांनी दाखवलं आहे आणि ही माहिती अनुराधाताईंमुळे आपल्याला कळते. त्यांच्या तोंडून कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला ह्यांचा किस्सा ऐकताना सैनिकांचं मनोबल काय असतं त्याची प्रचिती येते. १९७१ च्या युद्धात आयएनएस खुकरी ह्या बोटीवर महेंद्रनाथ हे कॅप्टन होते. पाकिस्तानच्या पाणबुडीने ह्या बोटीवर हल्ला केला. त्यामुळे बोटीचं नुकसान झालं. बोट बुडायला आली होती. म्हणून कॅप्टन महेंद्रनाथ ह्यांनी बोटीमधील सेलरला दुसऱ्या बोटीवर नेलं. शेवटचा सेलर उरला, त्याला स्वतःच लाईफ जॅकेट दिलं. सगळी बोट रिकामी झाल्यावर ते स्वतः डेकवर सिगारेट पीत शांत बसले आणि बुडणाऱ्या बोटीसोबत समुद्रात विलीन झाले. काही झालं तरी कॅप्टन बोट सोडत नाही ह्या सैनिकी परंपरेला ते जागले. भारतीय सैनिक आपलं कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजतात.
कारगिलमध्ये युद्ध झालं तेव्हा पर्वतावर चढाई करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला माहित होतं की आपला वर जायचा मार्ग आहे, पण आपण पुन्हा खाली कधीही येणार नाही. तरीही ते वीर न डगमगता शत्रूवर तुटून पडले. ह्यात कर्नल थापर ह्यांचा मुलगाही होता. एकदा एका २६ जुलैला अनुराधाताई कारगिल येथे वीर जवानांच्या स्मृतीसाठी बनवलेल्या विजय स्तंभाजवळ उभ्या होत्या. तेव्हा तिथे कर्नल थापरही आले. आपल्या शहीद झालेल्या मुलाला सलामी द्यायला हा पिता तिथे आला होता आणि ताठपणे उभा राहून अनुराधाताईंना म्हणाला, ” बेटा, डोळ्यात अश्रू नाही आणायचे. माझ्या मुलाचं कौतुक करायचं. ” कॅप्टन थापर ह्यांचं धैर्य पाहून आपणही नतमस्तक होतो. त्या धैर्यासमोर कारगिलचा हिमालयही थिटा वाटू लागतो. आज कॅप्टन थापर आपल्या शहीद मुलाने लिहिलेलं शेवटचं पत्र अभिमानाने वाचून दाखवतात. ज्या वयात मुलाला आशीर्वाद द्यायचे त्या वयात ते मुलाला सलामी देत आहेत.
इथे पदमा गोळेंची एक कविता अनुराधाताई म्हणून दाखवतात:
” बाळ, चाललासे रणा घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण.
नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली तुझ्या तलवारीस धार”
सैनिकाचे पालक असे खंबीर असतात. मुलाच्या तलवारीला धार लावून देतात. तो रणातून कदाचित जिवंत येणार नाही हे माहित असूनही!
अनुराधाताईंचं काम पाहून नेव्हीमधील सैनिकांनी त्यांना पाणबुडीमध्ये आमंत्रण दिलं होतं. ती पाणबुडी पाहून त्या थक्क झाल्या. कारण पाणबुडीत हलता येणार नाही अशी जागा होती. तरीही जिथे फक्त १० जण उभे राहू शकतात, तिथे ४२ जण जातात. एकदा ५६ जण गेले आणि तेही तीन महिने. पाणबुडी पाण्यात जाते तेव्हा त्यांचा जगाशी काहीही संपर्क राहत नाही. आपण २४ तास मोबाईल वापरतो आणि हे सैनिक अनेक महिने पाण्याखाली कोणत्याही संपर्काशिवाय कर्तव्य करत असतात. काम करून हे सामान्य माणसांना संदेश देत असतात की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आजचा दिवस देत आहोत. हे सैनिक लढाई होते तेव्हा फक्त प्राण पणाला लावून नव्हे तर प्राण देऊन लढतात. ते रोज स्वतःचा स्वयंपाक करतात. त्यांच्यातील काही डॉक्टर असतात जे आसपासच्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात, बांधकाम तज्ज्ञ असतात ते डोंगराळ भागात रस्ता-पूल उभारतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते Locवर उभे असतात. तरीही म्हणतात-Romancing Loc…
सैनिकांचं हे कठोर जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनुराधाताई ‘लक्ष्य’ फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी त्यांनी “सैनिक” हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा इंग्लिशमध्ये “soldier ” नावाने अनुवादही झाला आहे. हे पुस्तक त्यांनी सैनिकांच्याच हस्ते प्रकाशित केलं. सैनिक समाजाला समजला पाहिजे त्यासाठी ही धडपड आहे. गेली 15 वर्ष अनुराधाताई ही धडपड करत आहे. शिवाजी महाराजांची कवने गाणारे जसे भाट आहेत, तशा त्या सैनिकांच्या भाट बनून काम करत आहेत.
पण त्यांची इच्छा वेगळीच आहे. त्यांना असं वाटतं की समाजाला, सामान्य माणसाला सैनिक इतका समजावा की लक्ष्य फाऊंडेशनच काम बंद व्हावं.
चला, सैनिक समजावून घेऊ आणि अनुराधाताईंचं काम लवकर पूर्ण करू!!
सैनिक आणि त्यांची ही मावशी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा लेख पुढे पाठवू शकता.
लेखक : श्री निरेन आपटे
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈