श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “आणखी एक. मनात आले ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांपर्यंत पोचल्या आहेत. आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन दिवसभर काम करून पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. दगदग नका करू. “

 सासरे सांगत होते. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या चुकीमुळेच आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. हातातून काहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झाले होते. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता!!)

एरवी सगळ्यांशीच मोजकं बोलणारे माझे सासरे आज भावनेच्या भरात कां होईना अंत:प्रेरणेने जे बोलले ते माझ्या काळजीपोटीच होते. पण त्यातही त्यांच्याही नकळत एक सूचक संदेश दत्तगुरुंनी माझ्यासाठी पेरुन ठेवला असल्याची जाणिव या परतीच्या प्रवासात माझ्या अस्वस्थ मनाला अचानक स्पर्श करुन गेली आणि मी दचकून भानावर आलो. एरवी नंतर मला कदाचित कामांच्या घाईगर्दीत जे जाणवलंही नसतं तेच ही जाणिव नेमकं मला हळूच सुचवून गेली होती!मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो. ‘आज पौर्णिमा आहे. मी मनात आणलं तर आज पुन्हा दुपारच्या बसने नेहमीसारखं निघून नृ. वाडीला जाणं मला अशक्य नाहीय. सासऱ्यांनी जे मी करीन हे गृहित धरलं होतं त्याचा तोवर मी विचारही केला नव्हता. पण आता मात्र मी काय करु शकतो, करायला हवं याची नेमकी दिशा मला मिळाली आणि मनातल्या मनात त्याचं 

नियोजनही सुरू झालं!अर्थात ते जमेल न जमेल हे माझ्या स्वाधीन नव्हतं. जमायचं नसेल तर कांहीही होऊ शकतं. बस चुकणं, ती मिळाली तरी बंद पडणं, वाटेत अपघात होणं किंवा आज बॅंकेत पोचताच अचानक आॅडिट सुरु होणं, ए. जी. एम् अचानक ब्रॅंच व्हिजिटसाठी येणं असं कांहीही. यातल्या कोणत्याच गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या आणि त्यापैकी कांही घडलंच तर त्याला माझा इलाजही नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं एवढंच मी करू शकत होतो आणि ते मी करायचं असं ठरवून टाकलं!!

त्यामुळे अर्थातच प्रवास संपताना मनातली अस्वस्थताही कमी झाली होती. ब्रॅंचला गेल्यानंतर मात्र असंख्य व्यवधानं तिथं माझीच वाटच पहात होती. त्यामुळे कामाचं चक्र लगेच सुरु झालं न् पुढे बराच वेळ श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. रांजणेंच्याजवळ मनातला विचार बोलून ठेवायचंही भान नव्हतं. गर्दीचा भर ओसरला तेव्हा सहज माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते. मी रांजणेना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिली. सहज शक्य झालं तर आज सव्वातीनच्या बसने परत नृ. वाडीला जाऊन यायची इच्छा असल्याचंही त्यांना सांगितलं.

“अजून तुमचं जेवणही झालेलं नाहीय. मेस बंद होण्यापूर्वी तुम्ही लगेच जाऊन जेवून या. तोवर मी आधी कॅश टॅली करून ठेवतो. म्हणजे कॅश चेक करून तुम्हाला निघता येईल. बाकीची माझी कामं तुम्ही गेल्यानंतर मी केली तरी चालू शकेल. ” रांजणेंनी मला आश्वस्त केलं. त्याक्षणानंतर सगळं मार्गी लावून मी स्टॅंण्ड गाठलं. बसमधे मनासारखी जागा मिळाली. मान मागे टेकवून मी शांतपणे डोळे मिटले. आदल्या दिवशी याच बसमधे मी असाच बसलो होतो तेव्हा पुढे काय घडणाराय याबाबतीत मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. त्यानंतरच्या सगळ्याच घटना माझ्या नजरेसमोरुन सरकत जात असताना मला त्या स्वप्नवतच वाटत राहिल्या.

नृ. वाडीला पोचलो तेव्हा मनातली उत्कट इच्छा फलद्रूप झाल्याचं समाधान मन उल्हसित करीत होतं!दत्तदर्शन घेताना आत्यंतिक आनंदभावनेने मन भरून येत असतानाच माझी मिटली नजर ओलावली होती!

दर्शन झाल्यानंतर हीच कृतार्थ भावना मनात घेऊन मी पायऱ्या चढून वर आलो आणि मला वास्तवाचं भान आलं. रात्रीचे दहा वाजत आले होते. इथेच मुक्काम केला तर पहाटे वेळेत सांगलीला पोचून सहाची बस मिळवणं शक्य होणार नव्हतं. त्यासाठी मुक्कामाला सांगलीला जाणं आवश्यक होतं.

सांगली स्टॅंडला बस येताच मी घाईघाईने बसमधून उतरलो. पावलं नकळत सासुरवाडीच्या घराच्या दिशेने चालू लागताच मी थबकलो. तिथे जाणं मला योग्य वाटेना. काल सासऱ्यांनी पोटतिडकीने मला जे करु नका असं सांगितलं होतं नेमकं तेच मी केलेलं होतं. ‘आता त्यांच्याकडे जायचं तर हे लक्षात येऊन त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तसं होऊन चालणार नाही’ असा विचार मनात आला. मी परत फिरलो. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. केवळ दोनतीन तास पाठ टेकण्यासाठी लाॅजवर जाणं ही त्याक्षणी गरज नव्हे तर चैन ठरणार होती हे लक्षात आलं आणि पुन्हा स्टॅण्डवर आलो. ती पूर्ण रात्र सांगली स्टँडवर बसून काढली!

स्टॅंडच्या बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. कारण मनातलं पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान त्यावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला स्वच्छ आठवले.

‘दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळेच ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकालाच जमत नाही. निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात. तेच आपल्या कसोटीचे क्षण!जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात…!’

त्या रात्री बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments