सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि मी… एक आठवण — ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आषाढ सरला श्रावण आला. कॅलेंडरचं पान उलटलं, आज नागपंचमीचा सण– लक्षात आल आजच्या दिवशी तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आहे. त्यांची शुभ प्रभात शुभेच्छामय करावी म्हणून मी फोनकडे धावले. पलीकडून खणखणीत आवाज आला, “‘ गुरुकन्या? सिंहगड रोड ना हो? “
“हो बाबासाहेब, मी तुमच्या माजगावकर सरांची कन्या. ” मी होकार भरला.
बरं का मंडळी ! बाबासाहेब नेहमी याच नावाने माझा आवाज ओळखायचे मी नवलाईने विचारल, ” बाबासाहेब तुम्ही कसं ओळखलंत माझा फोन आहे ते?” इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आपण वयानी कितीही लहान असलो तरी बाबासाहेबांच्यातला विनय, प्रत्येकाला “अहो जाहोच” म्हणायचा. ते म्हणाले, “अहो अस्मादिकांचा आज जन्मदिवसआहे ना ! पेपरवाले इतर काहीजण तारखेने माझा वाढदिवस साजरा करतात, पण नागपंचमी तिथी साधून तुमच्यासारखे हितचिंतक याच दिवशी मला भेटायला येतात. पण खरं सांगू, तुमच्या वडिलांनी, माझ्या गुरूंनी, म्हणजे माननीय माजगावकर सरांनी शाळेत साजरा केलेला तो वाढदिवस कायम माझ्या मनांत कोरला गेला आहे. आत्ता मी तोच प्रसंग मनामध्ये आठवत होतो, आणि काय योगायोग बघा गुरूंच्या मुलीचा म्हणजे लगेच तुमचा फोन आला. मी तर म्हणेन तुमच्या आवाजात माझ्या सन्माननीय सरांनी हा शुभ संदेश माझ्यासाठी पाठवला असावा. “असं म्हणून श्री बाबासाहेब प्रसन्न- प्रसन्न हंसले. मलाही माझ्या वडिलांची आठवण झाली. आणि हो इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की शिवशाहीर, पद्मभूषण, प्रसिद्ध इतिहासकार, श्री बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या वडिलांचे म्हणजे श्री. माजगावकर सरांचे अतिशय आवडते पट्ट शिष्य होते.
माझ्याशी बोलतांना बाबासाहेब मागे मागे अगदी बालपणात, भूतकाळात, शालेय जीवनात शिरले, आणि मला म्हणाले, ” काय सांगू तुम्हाला ! माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि बालमनांत कायम ठसलेला असा तो वाढदिवस श्री. माजगावकर सरांनी आणि माझ्या वर्ग मित्रांनी दणक्यात साजरा केला होता.
” तो प्रसंग जणू काही आत्ताच डोळ्यासमोर घडतोय. अशा तन्मयतेने बाबासाहेब बोलत होते. इकडे माझीही उत्सुकता वाढली. आणि मी म्हणाले, ” बाबासाहेब मलाही सांगा ना तो किस्सा, माझ्या वडिलांची आठवण ऐकायला मलाही आवडेल “. खुशीची पावती मिळाली आणि ते पुढे सांगायला लागले,
” माझ्या वर्गमित्रांकडून सरांना माझ्या वाढदिवसाबद्दल कळले होते. त्यावेळी आत्तासारखा वाढदिवसाचा धुमधडाका नव्हता. औक्षवण हाच उत्सव होता. नव्या पोषाखात कपाळाला कुंकूम तिलक लावून मी वर्गात शिरलो, आणि सरांनी टाळी वाजवली. त्यांच्यात आधी ठरल्याप्रमाणे कदाचित तो वर्गाला इशारा असावा, कारण एका क्षणात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सारा वर्ग त्या कडकडाटाने दुमदुमला, अक्षरशः दणाणला. अनपेक्षित झालेल्या या प्रकाराने मी गोंधळलो, हा काय प्रकार आहे म्हणून बावचळलो. सर हंसून पुढे झाले. त्यांनी मला जवळ घेतल, आणि म्हणाले, ” पुरंदरे आज वाढदिवस आहे ना तुझा? वर्ग मित्रांकडून तुला शुभेच्छा आणि माझ्याकडून तुला, हा घे खाऊ. “असं म्हणून श्रीखंडाच्या गोळ्या त्यांनी माझ्या हातावर ठेवल्या. “बाबासाहेब पुढे सांगू लागले, “अहो काय सांगू तुम्हाला, सरांनी दिलेल्या त्या श्रीखंडाच्या गोळीत अख्ख भूखंड सामावलं होत. वर्ग मित्रांच्या टाळ्या, मनापासून दिलेली ती दाद, शंभर हातांकडून मला शतशत शुभेच्छा मिळाल्या होत्या अजूनही तो आवाज माझ्या कानात घुमतो, आतापर्यंत छत्रपतीशिवाजी महाराजांबद्दल भाषण करून खूप टाळ्यांचा वर्षाव मी मिळवला. पण खरं सांगू! त्या वर्ग मित्रांच्या टाळ्यांची सर नाही येणार कशाला आणि सरांच्या त्या छोट्या एक इंचाच्या गोळीपुढे ताटभर आकाराचा डेकोरेशन केलेला केकही फिक्का पडेल. ” शिवशाहीर त्या आठवणीत रमले होते, त्यांच्या आवाजात खंत जाणवली. ते म्हणाले “दुर्दैवाने आज ते सर, तो वर्ग, ते वर्गमित्र, आता आपल्यात नाहीत, पण ती आठवण दर वाढदिवसाला नागपंचमीला मी मनात आठवतो. ”
… हे सगळं मला सांगताना श्री बाबासाहेब गहीवरले, माझाही कंठ दाटून आला. आणि आम्ही फोन खाली ठेवला.
… धन्य ते माझे वडील, आणि धन्य ते गुरु शिष्याचं नातं जपणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈