डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ मावळतीवर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
(२१ ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त)
☆
निसर्गाने नेमलेल्या नियमांनी
नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत
आयुष्याने नेलेल्या मार्गावर
जीवनक्रमण करत आलो
विहित कर्मे समर्पित
निरपेक्ष बुद्धीने करता करता
मावळतीच्या क्षितिजासमीप
नकळतच येऊन पोहोचलो
*
उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे
मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन
हळू हळू कसे क्षीण होत गेले
मावळतीच्या क्षितिजावर
समजलेच नाही
*
तरीही याच लोभसवाण्या
भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून
हातून सुटलेले कित्येक छंद
जाणवतायत मोहकशी साद घालतांना
माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना
उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना
किती आतुरतेने
*
तिन्हीसांजेला उषःकालासाठी
मध्यरात्रीला भेटावेच लागेल
निसर्गाचे हे चक्र
उलटे कसे फिरेल माझ्यासाठी
पुन्हा उदयाची आंस असली तरी
परतीचा मार्ग
केव्हाच बंद झाला आहे
*
पुन्हा प्राचीवर यायला
मावळतीच्या क्षितिजा पलीकडे
बुडी मारायलाच हवी
पश्चिमेला मावलायालाच हवे
अस्त करून घ्यायलाच हवा.
☆
कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈