श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कै. आचार्य अत्रे यांना काव्यांजली … ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

स्फंदू लागले कभिन्न काळे सह्याद्रीचे कडे

मूक जाहले कडाडणारे डफ, ढोलक, चौघडे

सीमा लढ्याचे सुरू जहाले पर्व नव्याने आता

अशा अवेळी केलीस का तू युद्धाची सांगता

*

शिवशक्तीच्या बुरुजावरची तोफच होता मूकी

हर्षौन्मादे नाचू लागतील वैरी ते घातकी

तुझ्या भयाने थरथरली ती जुल्मी सिंहासने

राष्ट्रघातकी हैवानांची डळमळली आसने

*

तुझ्या प्रयाने आज निखळला मराठभूचा कणा

आज भवानी म्यान जाहली शिवरायांची पुन्हा

अहर्निश पेटती ठेवली मराठमोळी मने

तुझ्यावाचून आता तयांची थांबतील स्पंदने

*

नाट्यदेवता विष्षण झाली जाता धन्वंतरी

हसण्याचेही विसरून जाईल विकलांगी वैखरी

टाळ्यांचे ते गजरही होतील अबोल आता खरे

चांडाळांची कोण लोंबवील वेशीवर लक्तरे

*

“सुर्यास्ता” ची शोभा स्मरते ‘सिंहगर्जना ‘ जुनी

प्रीतीसंगमी स्वैर विहरली तुझी दिव्य लेखणी

या झरणीचे झाले भाले प्रसंग बाका येता

आपत्काली तुवा राखिली मराठीय अस्मिता

*

चिरयौवन भोगिती अजून ती तव “झेंडूची फुले “

आज क-हेचे पाणी आटले शल्य अंतरी सले

जगण्यात असे तो मौज मरावे वचना तू पाळिले

विनम्र माथा नयनी पाणी काळीज आमुचे उले

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments