श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यानं आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा आढावा घेतला.. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या पुस्तकांच्या जवळपास चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.
मानधनातुन अफाट पैसा कमावणारा हा अब्जाधिश लेखक..
सॉमरसेट मॉम..
आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील उच्च समजली जाणारी मंडळी त्याच्या स्नेहात होती. त्याच वर्तुळात त्याचा वावर होता… भारतात जेव्हा तो आला होता.. तेव्हा तर व्हाईसरॉयचा खास पाहुणा म्हणूनच आला होता. आपल्या प्रचंड इस्टेटीतला काही भाग काढून त्यानं सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरु केलं. अनेक होतकरु लेखकांना पैसा उपलब्ध करुन दिला..
त्याचं लेखन अतिशय शिस्तशीर.. सकाळी नऊ ते दुपारी एक ही त्याची लिहीण्याची वेळ.. अगदी रोजच्या रोज.. सुट्टी नाही.. सण नाही.. वार नाही.. रविवार पण नाही.. प्रवासात असलं तरीही खाडा नाही..
रोजच्या रोज काय सुचणार? पण नाही.. तो टेबलपाशी जाऊन बसायचाच.. ती एक शिस्तच लावून घेतली होती त्यानं.. काहीच सुचलं नाही तर कागदावर सही करून परत परत गिरवायचा.
मुळचा तो लघुकथा लिहिणारा.. पण त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या.. नाटकं लिहिली.. चित्रपट लेखन केलं.. लेखक म्हणून त्याची प्रतिमा तेजस्वी होती.. पण..
.. पण त्याच्या आयुष्याला एक दुसरीही बाजू होती.
सॉमरसेट मॉम बोलताना अडखळत बोलायचा.. तोतरा.. त्यामुळे त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.. सगळ्यांपासून दुर दुर रहायचा.. खास करुन स्त्रियांपासून..
आणि यातूनच त्याच्यात लैंगिक विकृती निर्माण झाली होती.. त्यानं चार लग्न केली.. पण ती टिकली नाहीत.. सगळेजण आपल्या वाईटावर आहेत असंच त्याचं म्हणणं असायचं.. सगळ्यांबद्दल मनात संशय.. त्यामुळे भांडणं.. मग अवहेलना..
त्याला एक मुलगीही होती. सायरा तिचं नाव.. तिच्याशी तर त्याचं अजिबात पटलं नाही.. तिच्यावर त्यानं नाही नाही ते आरोप केले. ती कशी लबाड आहे.. वाईट चालीची आहे हे तो वारंवार सांगु लागला. एका अमेरिकेन मासिकात त्यानं सायराचं चारित्र्यहनन करणारी लेखमालाच लिहिली.
पण लोकांना ते आवडलं नाही.. त्याच्या नेहमीच्या प्रकाशकांनी पण ते ग्रंथरूपात आणण्यास नकार दिला.
त्याची एक आजी होती.. ती पण थोडंफार लेखन करायची. लहान मुलांसाठी तिनं अनेक छोटी छोटी पुस्तकं तिनं लिहिली होती.. वाटायचं तिला आपल्या नातवानं पण ती वाचावी.
पण सॉमरसेटनं ती कधीच वाचली नाही.. तो तिला भेटतही नसे.. खुप दुस्वास करायचा. आपल्या अगोदर आपल्या घराण्यात कुणी लेखन केलंय याच गोष्टीचा राग त्याच्या मनात कायम होता.
वयोमानानुसार आजी म्हातारी झाली.. अनेक व्याधी तिला जडल्या.. पण मरतेसमयी तिच्या जवळ फुटकी कवडीही नव्हती. पैशाच्या अभावी ती उपचार घेऊ शकली नाही. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेली ॲन आजी वाट पाहु लागली.. नातवाची..
.. पण मॉमने तिची घोर उपेक्षा केली. तो तिला भेटायला आलाच नाही.. बेवारस मरणच तिच्या नशिबी होतं.
सॉमरसेट मॉमची ही दोन रुपं. वयाच्या पंचाहत्तरीत त्यानं लेखन थांबवलं.. आणि वयाच्या नव्वदीत आल्यावर त्याला जाणवलं….
…. काय मिळवलं मी? माझं सगळंच चुकत गेलं.. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं..
आत्महत्येचे विचार त्याच्या मनात चोळु लागले.. पण ती वेळच आली नाही.. ऐश्वर्यसंपन्न असलेला सॉमरसेट मॉम वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकाकी अवस्थेत हे जग सोडून गेला.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈