सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ मातीपण… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
एकेकाळी तू मातीत राबताना,
मातीच्या कणाकणानी माखून जायचीस.
इतकी की, जणू मातीचीच व्हायचीस
अगदी न ओळखता येण्या इतकी.
इतकं सहजपणे तू मातीपण जपत होतीस.
त्या मातीचा रंग आणि गंध माखून जायचा,
तुझ्या साडीचोळीला.
अन हाताततल्या बांगड्यांचा आवाज,
भिडून जायचा रानाला.
राजा जनकला सुध्दा सीता अशीच
भेटली असेल का ?
कदाचित तुझ्यासारखीच …. मातीने माखलेली.
पण आज तू रानात राबतेस तुझं बाईपण विसरुन
घरातल्या गड्याचा जुनाट सदरा चढवून,
आणि चेहरा रूमालात लपेटून
तुझी कुणबी ओळख लपवून
*
आजकाल त्या मातीचा गंध कुठे दरवळत
नाही ग तुझ्या साडीचोळीला.
काय म्हणावं तुझ्या या तुसडेपणाला.
कुणब्याची लेक तू,
मातीत लोळत वाढलेली.
मातीनेच, अंगाखांद्यावर तुला खेळवलेली.
कदाचित त्या , मातीला पण दुःख होत असेल,
तुझ्या अशा तुटक वागण्याचं…
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈