सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी ☆
साधारणपणे ऑगस्ट महिन्याची 13-14 तारीख होती. शाळेमध्ये विद्यार्थिनीची 15 ऑगस्ट साठी विविध कार्यक्रमाकरिता तयारी करून घेण्यात येत होती. पि. टी. चे शिक्षक संचलनाची तयारी करत होते… नृत्य बसवणारे नृत्य बसवून घेत होते…
स्वराज्य सभेचे मंत्रिमंडळाच्या भाषणाची तयारी चालली होती… एकूण शाळेत विविध कार्यक्रमाची रेलचेल होती आणि त्याचा सराव चाललेला होता. बाकी मग ग्राउंड आखणे झेंडा व्यवस्थित आहे का पाहणे इत्यादी कामे लक्षपूर्वक केली जात होती. वर्गावरती सगळ्यांना नोटीसही गेली होती की 15 ऑगस्टला सकाळी सात वाजता सर्वांनी झेंडावंदनासाठी हजर राहावे. दुसरे दिवशी माझ्या वर्गातील म्हणजे मी ज्याचे क्लास टीचर होते.. आठवी अ.. त्या वर्गातील दोन-तीन मुली आल्या आणि म्हणाल्या,.. बाई बोलायचे थोडं.. मी म्हणाले, काय? त्या मुलाने सांगितले आपल्या वर्गातल्या सर्व मुलींनी 15 ऑगस्टला न येण्याचे ठरवले आहे कारण दुसऱ्या दिवशी पासून चाचणी परीक्षा सुरू आहे त्याच्या अभ्यासासाठी घरीच रहावे असे सर्वांचे ठरले आहे. मी म्हणलं “ठीक आहे असं काही होत नाही तू जा बाळा मी त्यांना समजावेन” त्या दिवशी सातवा तास मला ऑफ होता वर्गावर असलेल्या शिक्षकांकडून मी तास मागून घेतला आणि सातव्या तासाला वर्गावर गेले मुलींना वाटले बुलेटिन पिरेड आहे मी म्हणाले चला आज गणित घेणार नाहीये मी गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणल्यावर सर्वांना आनंद मुलीने टाळ्या पिटल्या आणि मग एक गोष्ट सांगायला सुरुवात केली…
मुलींनो गोष्ट आहे खूप जुनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या कालावधीतली आपले अनेक क्रांतिकारक या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि त्यांना पकडून तुरुंगात डांबले जात असे त्यामध्ये 19/ 20 वर्षाची मुले होती त्यांना एका बरॅकित घातले होते म्हणजे एक आठ बाय आठ चा खोलीवजा तुरुंग. त्यामध्ये ही चार मुले राहत होती. जमावा मध्ये इंग्रजांन विरूद्ध भाषण केले म्हणून त्यांना पकडून आणलेले होते व शिक्षाही झालेली होती. येरवड्याच्या तुरुंगात ही सगळी मंडळी होती त्यामध्ये जागा नसल्यामुळे त्यांना बी क्लासमध्ये जागा दिली होती. त्या ठिकाणाच्या सुविधा जरा वेगळ्या असतात तिथे जरा वयस्कर नेते होते इन्कम टॅक्स भरणारे लोक होते आणि त्या ठिकाणी इतर कैद्यांना दररोज सकाळी गंजी देत असत म्हणजे पिठाची पेज त्या ऐवजी या बी क्लासमध्ये त्यांना दूध देत असत या चारी तरुणांनी ठरवले की आपल्याला जे दूध मिळते त्याचे आपण पाडव्या दिवशी श्रीखंड करून खाऊ पण या दुधाचे दही कसे लावायचे? तर त्यातील एक तरुण थोडा शिकलेला असल्यामुळे त्याला स्टोअर मध्ये काम दिले होते तो स्टोअर किपर म्हणून काम करीत असे त्याने त्याच्या स्टोअरमधून येताना धोतराच्या कनवटीला एक छोटासा तुरटीचा तुकडा चोरून आणला आणि त्या सर्वांनी सकाळी मिळालेले दूध तुरटी फिरवून विरजण लावलं त्यावेळी साखरेची पुडी वेगळी मिळायची या सर्वांनी ती साखर साठवून ठेवली होती खरंतर त्या चौघांना सकाळी दोघा दोघांच्या पाळीने दोन पायली दळण दळावे लागे त्या दिवशी दोघांनी उपाशीपोटी दळण दळले कारण दुसऱ्या दिवशी श्रीखंड खायचं काम होत ना आणि पाडवा साजरा करायचा होता. मग त्यांनी संध्याकाळी जे घट्ट लागलेले दही होते ते धोतराच्या फडक्यात बांधून रात्री तुरुंगाच्या गजाच्या बाजूला बांधून ठेवले आणि त्याच्या खाली एक भांडे ठेवले गंमत म्हणजे त्या चक्क्यामधून जे पाणी खाली पडत होते त्याचा टप टप असा आवाज येत होता तुरुंगामध्ये रात्री 10 नंतर लाईट बंद आणि पुन्हा लाईट लावण्याची कुणालाही परवानगी नसे. फक्त जेलर हे काम करू शकत पण तेही क्वचितच नियम म्हणजे नियम रात्री पहाऱ्यावर असणाऱ्या शिपायाला ही टप टप टिकी टिकी सारखी ऐकू आली तो घाबरला त्याला वाटले कुणीतरी तुरुंग फोडत आहे. कारण सगळे क्रांतिकारी त्यामुळे हे सहज शक्य होते त्याने तातडीने अधिकाऱ्यांना बोलवले त्यांनी प्रत्येक बऱ्याकीत जाऊन तपास करायला सुरुवात केली की आवाज कुठून येतोय….. रात्रीची निरव शांतता…. अधिकाऱ्याच्या हातात बॅटरी…. प्रत्येक बर्याकि मध्ये तो प्रकाशझोत टाकून तपास होत होता… दिवसभराच्या कामाने कैदी गाढ झोपलेले…. एकेक बऱ्याक पाहत असताना तो पुढे पुढे येत होता बुटांचा टाॅक टाॅक आवाज आणि पुढे प्रकाश झोत बाकी सर्वत्र अंधार या चार मुलांच्या बरॅकित आवाज येतोय त्याच्या लक्षात आले. त्याने सर्वत्र बॅटरी फिरवली तर त्याला एक गाठोडे बांधलेले आणि त्यातून पाणी पडण्याचा आवाज येतोय हे लक्षात आले त्याने आत येऊन काठीन ढोसून उठवले आणि विचारले, “क्या है ये?” त्यावर दोघे घाबरून गेले ते म्हणाले, “हमे कुछ पता नही” पण उरलेल्या दोघातील एका तरुणांनी उत्तर दिले, ” “हमारा कल त्योहार है और हम श्रीखंड बनाके खा रहे है” त्याला श्रीखंड म्हणजे काही कळलं नाही पण धोका काही नाही हे पाहून तो खुश झाला. और कल देख लेंगे असं म्हणत तो निघून गेला दुसऱ्या दिवशी यांच्या अंघोळ्या झाल्या अंघोळ्या म्हणजे शिट्टीवर तांबे ओतून घेणे.. चार चार तांब्यामध्ये आंघोळ पूर्ण करावी असा शिरस्ता होता अंघोळ झाल्यावर या तरुणांनी गंध लावले. देवाचे नामस्मरण केले श्रीरामाला वंदन केले जय श्रीराम घोषणा दिली आणि तयार झालेले चक्क्यात साखर मिसळून तयार झालेली श्रीखंड खालले नंतर “वंदे मातरम वंदे मातरम” ची घोषणा दिली कारण त्यांना ठाऊक होते आता आपल्याला शिक्षा होणार आहे… एकदा भीती गेली की मग काय? त्यांना लगेच बोलावणे आलेच अधिकाऱ्याने त्यांना शिक्षा सुनावली या दोन तरुणांना हात वर बांधून पाच वाजेपर्यंत टांगून ठेवा आणि पाठीवरती वीस फटके चाबकाचे मारा. शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈