सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ रैन बसेरा…! ☆ श्री सुलभा तेरणीकर

ज्यासाठी यात्रा आरंभिली होती, तो क्षण आला आणि प्रवासाला निघाल्यापासून मनावर आलेला ताण सैल झाला. आईच्या काशीयात्रेची सांगता व्हायची होती. काशीची गंगा घेऊन रामेश्वराला अभिषेक केला होता आणि तिथली वाळू म्हणजे, सेतू घेऊन ती गंगेत अर्पण करायचा संकल्प होता. बनारसच्या गंगेच्या पात्रात नौकेत बसून तो पार पडला आणि यात्रेचा एक चरण तिच्या कृतार्थ भावनेच्या साथीनं संपला. तिच्या दृष्टीनं ही केवळ पारंपरिक धर्मयात्रा नव्हती, की भौगोलिक आनंदपर्यटन… ती एक भावनिक यात्रा होती. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या आधीच्या पिढ्यांच्या स्त्रियांना कदाचित डोळा भरुन गंगा पाहण्याचं भाग्य लाभलं नसेल म्हणून तिनं ध्यास घेऊन ही प्रतीकात्मक यात्रा केलेली होती. गंगा न पाहिलेल्या अज्ञात स्त्रियांसाठी मीदेखील या यात्रेत नकळत सहभागी झाले होते ती एक सहप्रवासिनी म्हणून…

पण प्रवासात निघाल्यापासून विरोधाभासाचा जो विलक्षण अनुभव येतो, त्याची आवर्तनं मात्र सुरु होतीच. घरातून बाहेर खेचून नेणारी अन् पुन्हा कोटरात परतायची ओढ लावणारी अदृश्य शक्ती मला दमवीत होती. नमवीत होती. माझ्यासमोर भरतीचा-रितं होण्याचा खेळ सुरू होता.

माळव्यातून जाताना पाहिलेली सरसोची पिवळी शेतं, त्रिवेणी संगमावर सैबेरियातून आलेले शुभ्र पक्ष्यांचे लक्ष थवे, एकाकी देवळात शरपंजरी पडलेली गंगापुत्र भीष्मांची महाकाय मूर्ती, भारद्वाजांच्या तपोभूमीत थाटलेले गरिबांचे संसार, अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य, फाटक्या अंगाचा सायकलरिक्षावाला, खपाटीला पोट गेलेला गंगेवरचा म्हातारा नावाडी अन रात्रीचा निवारा देणारा गरीब यात्रेकरूंचा बिनभिंतींचा रैन-बसेरा… नोंदी संपेनात.

बनारसचे घाट संधीप्रकाशात न्हाऊन निघालेले होते. पंचगंगेच्या संगमाजवळच्या घाटावर नावाड्यानं सांगितलं -“इथंच कबीरांना गुरु रामानंद भेटले.. ” मी विचारलं, “कबीरांचा मठ कुठं आहे?” उत्तर आलं-“मालूम नहीं.. “

मग दुपारी सारे जण विश्राम करीत असताना कसल्याशा तिरीमिरीत बाहेर पडले. कबीर चौराहा परिसरात विचारत, चौकशी करत एका अरुंद गल्लीच्या तोंडापाशी पोहोचले. तिथून म्हशींचे गोठे, व्यावसायिकांची दुकानं, गॅरेजं, घरं पार करता-करता क्षणभर थांबले. वाटलं, परत फिरावं. कबीरांच्या ढाई अक्षर प्रेमाच्या ओढीनं आपण आलो खरं; पण… फसलोच पुरतं. बाह्य आडंबराच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, ‘आपण कुठलंही मत मांडलं नाही अगर कोणत्या मताचं खंडन केलं नाही’, असं स्पष्ट सुनावणाऱ्या कबीरांचं देऊळ शोधणं; मोठा विरोधाभास तर नाही ना… या विचारानं थोडी गोंधळले. पण समोरच तटबंदीसारख्या भिंतीत प्रवेशद्वार दिसलं. त्या कमालीच्या साध्या वास्तूनं खुणावलं. आत एका ऐसपैस वाड्याला सामावून घेतलं होतं. माणसांची वर्दळ तुरळक होती. ओवऱ्यात, छोट्या अभ्यासिकांतून साधक बसले होते. मी चबुतऱ्यावरच्या मंडपात पोहोचले. स्मृतिकक्ष होता तिथं. गोरखपंथी साधूंचा त्रिशूल, जीर्ण खडावा, रामानंदांनी दिलेली जपमाळ, एक काष्ठपात्र, कबीर वापरीत तो चरखा… अन अंधाराचं अस्तित्व सांगणारा समाधीपाशी तेवणारा क्षीण दिवा..

कबीरांनी देह ठेवल्यावर मागे राहिलेल्या फुलांवर त्यांच्या शिष्यानं- श्रुतिगोपालनं -त्यावर बांधलेली समाधी… फुलांची समाधी… म्हणूनच त्यावर फूल अर्पण करण्याच्या संकेतापासून मुक्त असावी.. युवा कबीराचं छायाचित्र पाहत असताना बावीस-तेवीस वर्षांचा देवेन्द्र… शुभ्रवेष धारण केलेला तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी माझ्या मदतीस आला.

कबीरांचं साधनास्थळ, जिथं सत्संग करायचे, ती जागा दाखवीत म्हणाला, ” आपने नीरू टीला नहीं देखा?” मग मंदिराच्या जवळच्या जागेत आम्ही पोहोचलो. बाहेरच्या दृश्यांशी पूर्ण विसंगत असं ठिकाण होतं. शेताचा तुकडा, वृक्षांची सळसळ, संगमरवरात विसावलेले नीरू व निमा. लहरतारा तलावात ज्येष्ठ पौर्णिमेला या दाम्पत्याला कमळात एक दिव्य बालक सापडलं होतं… नरहरपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या वेळच्या जंगलात, कसाई वस्तीत त्यांनी त्या बाळाला आणलं. वाढवलं. विणकराचा चरखा त्याच्या हाती दिला. कबीरांचं बालपण जिथं गेलं, त्या ठिकाणीच त्यांनी साधना केली आणि दलित, उपेक्षित, वंचित, दुःखी जनांना ईश्वराच्या भक्तीचा राजरस्ता दाखवून दिला. मुल्ला मौलवी, पंडित यांच्या माणसांना देवापासून दूर नेण्याच्या परंपरेवर आघात केले… निर्भयपणे, स्पष्टपणे अन अत्यंत प्रवाही भाषेत सामान्यांना समजावलं… बाह्य उपचारांचा अस्वीकार केला. धर्माच्या नावाखाली चाललेल्या विकृतीचा धिक्कार केला. मनुष्यात भेद करणाऱ्या कृतींचा निषेध केला. हृदयस्थ परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी प्रेरित केलं… देवेन्द्रशी बोलताना इतिहास आठवत होते. ऐकत होते.

१९३५ मध्ये हरिजन चळवळीची सुरुवात गांधीजींनी त्याच साधनास्थळापासून आरंभिली होती. राष्ट्रीय नेते, अभ्यासक, विचारवंत इथवर येऊन गेले होते. कबीरांच्या भाषावैभवापाशी गुरुदेव रवीन्द्रनाथ नतमस्तक झाले होते… या आणि अशा कितीतरी गोष्टी ऐकल्या. सहाशे वर्षांपूर्वी या इथे नांदलेलं चैतन्य पांघरून 

नीरू टीला पुन्हा ध्यानस्थ झाला..

कबीर साहित्याचे निस्सीम चाहते व गाढे अभ्यासक डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी कबीरांबद्दल सांगितलेल्या ओळी पुन्हा आठवायलाच हव्यात. “ऐसे थे कबीर… सिरसे पैर तक मस्त मौला, स्वभावसे फक्कड, आदतसे अक्कड, भक्त के सामने निरीह, भेषधारी के आगे प्रचंड, दिल के साफ, दिमाग के दुरुस्त, भीतरसे कोमल, बाहरसे कठोर, जन्मसे अस्पृश्य, कर्म से वंदनीय… ” 

आमच्या यात्रेच्या परतीचा प्रवास सुरू व्हायचा होता. चार रात्रीचा रैन-बसेरा सुटायचा होता. घरी परतायचं होतं. माघ पौर्णिमेचा चंद्र गंगेत उतरला होता. सृष्टीत वसंतागमनाची वार्ता होती. नीरू टीलामधला निःशब्द काळोख मात्र माझं मन उजळून टाकीत होता…

चल हंसा वा देस जहॅं पिया बसे चितचोर…. ज्या देशात नित्य पौर्णिमा असते अन् एकच नव्हे, तर करोडो सूर्य प्रकाशतात.. जिथं कधीही अंधार होत नाही, अशा देशी जायची वाट शोधायची, तर… थोडा अंधारही सोबत बांधून घ्यावा… नाही का? 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments