श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला !‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी !!! सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभ राशीला असताना रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात येतो.
‘कर्षति आकर्षति इति कृष्ण:’ ( जो सर्वांना आकर्षून घेतो तो कृष्ण). असे कृष्णाचे वर्णन करता येईल.
आपल्याकडे जरी तेहतीस ‘कोटी’ देव असले तरी त्यातील राम-कृष्ण या प्रमुख अवतारी देवांनी भारतीय जनमानसाला भुरळ पाडली आहे. प्रत्येक मनात रामकृष्णांनी ‘घर’ केले आहे. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा म्हणून त्या दिवशी उपवास करण्याची तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ’काला’ करण्याची परंपरा आहे. आज सुद्धा ती परंपरा तितक्याच श्रद्धेनी सर्व ठिकाणी पाळली जाते. फक्त आता काही ठिकाणी गोपाळकाल्याचे रुपांतर ‘दहीहंडी’त झाले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. दुर्दैवाने आज दहीहंडी ‘पैसाहंडीत’ रुपांतरीत झालेली नाही असे म्हणायचे धाडस कोणी करु शकेल असे वाटत नाही.
‘गोपाळकाला’ ह्या शब्दाचा अर्थ आज पुन्हा एकदा नव्याने समजावून घेण्याची आणि समजावून देण्याची गरज आहे असे वाटते. किती साधा शब्द आहे ‘गोपाळकाला’. ‘गो’ ‘पाळ’ आणि ‘काला’ असे तीनच शब्द आहेत. जसे गो म्हणजे गाय तसे ‘गो’ चा दुसरा अर्थ इंद्रिय असाही आहे. गायींचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांचे पालन करणारा कृष्ण !! इंद्रियांवर जो अंकुश ठेवू शकतो तो कृष्ण!! तसेच त्याचा असाही अर्थ घेता येऊ शकतो जो इंद्रियांवर विजय प्राप्त करतो तो कृष्ण !! कृष्ण म्हणजे काळा. काळ्या रंगात सर्व रंग सामावले जातात. काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. ज्याची ‘स्वीकार्यता’ (Acceptance) पराकोटीची आहे तो कृष्ण !! सर्वात कुशल व्यवस्थापक कोण असेल तर कृष्ण !! किंवा आपण त्याला ‘आद्य व्यवस्थापन कौशल्य तज्ञ’ असेही म्हणू शकतो. भगवंताने रणांगणात सांगितलेली ‘गीता’ ही व्यवस्थापन कौशल्याचा विश्वकोश म्हटला पाहिजे.
ज्या कृष्णाला जन्माला येण्याच्या आधीपासून त्याचाच मामा मारायला टपला होता, जन्म झाल्याझाल्या ज्याला आपल्या सख्ख्या आईचा वियोग सहन करावा लागला, पुढे ‘पुतना मावशी’ जीव घेण्यास तयारच होती. नंतर ‘कालियामर्दन’ असो की ‘गोवर्धन’ पूजा असो ), कृष्णाने प्रत्येक गोष्ट सामाजिक बांधिलकी ध्यानात ठेऊन आणि मनाची प्रगल्भता दाखवत केली आहे, त्यामुळे आपण त्याला आद्य समाजसुधारक म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सामान्य मनुष्याचे जीवन सुकर होण्यासाठी वेळ पडल्यास जीव सुद्धा धोक्यात घालायचा असतो तसेच प्रत्येक गोष्ट भगवंत अवतार घेऊन करेल असे न म्हणता आपणही आपल्या काठीला झेपेल इतकी सामाजिक जबाबदारी घेऊन आपले समाजाप्रती, देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडायचे असते ही शिकवण कृष्णाने वरील दोन घटनांतून दाखवून दिली आहे असे म्हणता येईल. कृष्णाचे अवघे जीवन समाजाला समर्पित असेच आहे. अख्ख्या आयुष्यात श्रीकृष्णाने एकही गोष्ट स्वतःसाठी केलेली नाही.
आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट निस्वार्थपणे करणारा कृष्ण !! आपल्या भक्तासाठी आपण दिलेले वचन मोडणारा कृष्ण !! आपल्या गरीब मित्राचाही (सुदामा) सन्मान करणारा कृष्ण !! पीडित मुलींशी विवाह करुन त्यांना प्रतिष्ठा देऊन सन्मानाने जगायला शिकविणारा कृष्णच !! महाभारतातील युद्ध टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा कृष्ण !! युद्धात अर्जुनाला ‘कर्मयोग’ समजावून सांगणारा आणि त्यास युद्धास तयार करणारा कृष्णच !! स्वतःला बाण मारणाऱ्या व्याधास अभय देऊन कर्मसमाप्ती करणारा कृष्णच !!
श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे सदैव सत्वपरीक्षा आणि कायम अस्थिरता !! किती प्रसंग सांगावेत ? सर्वच गोड !! कृष्णाचा प्रेम गोड! कृष्णाचे भांडण गोड!, कृष्णाचे मित्रत्व गोड!, कृष्णाचे शत्रुत्व गोड! कृष्णाचे वक्तृत्व गोड! कृष्णाचे कर्तृत्व गोड! कृष्णाचे पलायन गोड! कृष्णाचा पराक्रम गोड! कृष्णाची चोरी गोड! कृष्णाचे शिरजोरी गोड! अवघा कृष्णच गोड! मधुर !!!
कृष्णाचा जन्म हा रात्रीचा म्हणजे स्वाभाविक अंधारातील आहे. आईच्या गर्भात देखील अंधारच असतो. सामान्य मनुष्याला पुढील क्षणी काय घडणार आहे याचे किंचित कल्पना देखील नसते. एका अर्थाने त्याच्या समोर कायम अंधार असतो. या अंधारातून मार्ग कसा काढायचा? हा मनुष्यापुढील मूलभूत प्रश्न आहे. याचे उत्तर आपल्याला भगवान कृष्ण आपल्या चरित्रातून देतात. कृष्णचरित्र म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला / घटनेला ‘प्रतिसाद’ देत ‘आनंदात’ कसे जगायचे ह्याचा वस्तुपाठच ! आज सुद्धा कृष्णासारखे आचरण करुन सामान्य मनुष्य ‘कृष्ण’ होऊ शकतो. कृष्णाला यासाठीच ‘पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
राम-कृष्ण यांना ‘अवतारी’ पुरुष ठरवून, त्यांचे उत्सव साजरे करुन आपले ‘कर्तव्य’ संपणार नाही. मग तो रामाचा जन्म असो की कृष्णाचा. येथील प्रत्येकाने महापुरुषाने मनुष्य म्हणूनच या भरतभूमीत जन्म घेतला आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी ‘याची देही याची डोळा’ ‘सामान्य मनुष्य’ ते ‘भगवान रामकृष्ण’ असा दिग्विजयी प्रवास केला असे इतिहास सांगतो. आपला ‘इतिहास’ खरा रामकृष्णांपासून सुरु होतो पण दुर्दैवानेआपण त्याला ‘मिथक’ मानतो. हीच खरी आपली शोकांतिका आहे. ( भारतीय ‘मानचित्रा’तील
(सांस्कृतिक नकाशा) ‘श्रीकृष्णमार्ग’ आणि ‘श्रीराममार्ग’ बघितला तर हे दोन्ही नरोत्तम आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतिक आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल. ‘द्वारका ते प्रागज्योतिषपूर’ आणि ‘अयोध्या ते रामेश्वरम्’ असे हे भारताच्या चारी कोपऱ्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारे पुरातन मार्ग आहेत.
सध्या असे मानले जाते की देवांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचे उत्सव धुमधडाक्यात साजरे केले म्हणजे आमची त्यांच्याप्रति असलेली इतिकर्तव्यता संपली. सध्या सर्व देवतांचे उत्सव आपण ‘समारंभ’ (इव्हेंट) म्हणून साजरे करीत आहोत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सर्व उत्सवातील ‘पावित्र्य’ आणि उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागील ‘मर्म’ आपण सध्या विसरुन गेलो आहोत की काय? असे वाटावे अशी आजची परिस्थिती आहे. ‘गोपाळकाल्या’ तील कोणत्याच शब्दाला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही असे वाटते. आधुनिककाळानुसार गोपाळकाला साजरा करताना त्यात योग्य ते बदल नक्कीच करायला हवेत पण त्यातील ‘मर्म’ मात्र विसरता कामा नये. सध्याच्या उत्सवात ना ‘गो’ (गायींचे ना इंद्रियांचे) चे रक्षण होते ना कसला ‘काला’ होतो. सर्वांचे सुखदुःख वाटून घेणे किंवा सर्वांच्या सुखदुःखात नुसते सहभागी न होता समरस होणे म्हणजे ‘काला’. ज्याला ‘श्रीकृष्णाचा काला’ समजला त्याला वेगळा ‘साम्यवाद’ (मार्क्सवाद नव्हे!) शिकायची गरज नाही.
श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला हे खरेच आहे. ‘गोकुळ’ म्हणजे आपले शरीर ! श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की मन म्हणजे मीच आहे. ‘त्या’ गोकुळात झालेला श्रीकृष्णाचा जन्म आपण सगळे अनेक वर्षे साजरे करीत आहोत. श्री सदगुरु गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येकाच्या मनात श्रीकृष्णाचा जन्म होईल तोच खरा सुदिन !!!
राम कृष्ण हरी ।।
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर