सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी ☆
(शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.) – इथून पुढे —
कोवळी वीस वर्षाची पोरं त्यांच्या उघड्या पाठीवरती फटाफट फटकारे मारले जात होते वेदना होत होत्या पण ओठ दाताखाली दाबून ते घोषणा देत होते, ” वंदे मातरम भारत माता की जय” आणि हा जयघोष त्यांना वेदना सोसण्याचे बळ देत होता… शेवटी पाठीतून रक्त यायला लागले फटके देणारा खाली बसला संध्याकाळी पाच वाजता त्या दोघांना खाली उतरवण्यात आले हात खाली करता येत नव्हते कारण काखेत गोळे आलेले होते चार दिवस त्यांना पडून राहावे लागले वेदनाने जीव कळवळत होता पण चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते त्यांना आनंद या गोष्टीचा होता की आमचा सण पाडवा वर्षाची सुरुवात आम्ही साजरी केली आणि इंग्रजांना एक प्रकारचा शह दिला
ही गोष्ट सांगताना मी अनेक गोष्टी त्यांना समजून सांगत होते.. की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अशा छोट्या छोट्या व्यक्तींनीही खूप काम केले आहे श्रीखंड खाऊन दाखवणे हा त्यांच्या त्या वयातला इंग्रजांच्या विरुद्ध करावयाचा कट होता त्या सत्तेला त्यांना डिवचायचे होते पण त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली पण देशासाठी ती आनंदाने त्यांनी मोजली
हे सर्व कथन करत असताना मुलीही गंभीर झाल्या होत्या माझे डोळे पाणावले होते मी मुलींना शेवटी एवढेच म्हणाले मुलींनो इतक्या अनेक गोष्टींनी ज्यांनी त्याग केला आहे त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य आज उपभोक्ता येत आहे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशातली तरुणाई स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती झटली आहे आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येऊन त्यांचे स्मरण करतो आणि झेंड्याला मानवंदना देताना त्यांच्या प्रती ही कृतज्ञता व्यक्त करत असतो म्हणून त्या दिवशी सर्वांनी हजर व्हायचे असते अर्थात ज्याना या घटनेशी काही देणंघेणं नाही ती मंडळी ती सुट्टी एन्जॉय करतात हे दुर्दैव आहे आणि मुलींनो तुम्ही तरी सगळ्या हुशार मुलींचा वर्ग डिस्टिंक्शन मध्ये येणारा वर्ग… तुमच्यापुढे अभ्यासाव्यतिरिक्त काही दिसत नाही त्यामुळे तुम्हाला 15 ऑगस्ट ला उपस्थित राहण्याची गरज वाटत नाही कारण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या अनेक लोकांबरोबर हे चार तरुण जे होते त्यात दोन तरुणातला एक माझा “बाप” होता भगवान मुकुंद पत्की आणि दुसरे होते माझे काका मोहोळचे डॉक्टर श्रीनिवास जोशी! त्यात तुमचे वडिल नव्हते या दोन तरुणांनी हे भोगलं होतं तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? तेव्हा तुम्ही उद्याला येण्याची काहीच गरज वाटत नाही. स्वातंत्र्य दिनाचे नातं माझ्याशी आहे मला त्याची जाण आहे माझ्या वडिलांनी सोसलेल्या हाल अपेष्टा मला ठाऊक आहेत मुलींनो झेंडा जेव्हा वर जातो ना तेव्हा माझे डोळे भरून येतात उर अभिमानाने भरून येतो आणि वाटतं की हा झेंडा फडकवण्याच भाग्य आपल्याला लाभतंय त्याचं कारण अनेकांचा त्याग आणि त्या त्यागामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे अशा व्यक्तीची मी मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो…. तुम्हाला तसं काही वाटण्याचं कारण नाहीये तेव्हा कोणीही 15 ऑगस्टला उपस्थित राहावयाचे नाही आणि मी वर्गातून धाडकन निघून आले….. ! शेवटचे वाक्य बोलताना मी आवंढे गिळत होते माझे डोळे पाण्याने भरले होते मुली चिडीचूप होत्या त्यांचे डोळे ओलावले होते दुसऱ्या दिवशी आठवीच्या ओळीवर सगळ्या मुली हजर होत्या. वाचक हो हे लिहिताना आजही माझे डोळे भरून येतात मी वर्गातल्या एकाही मुलीशी बोलत नव्हते झेंडावंदन झाल्यावर सगळा वर्ग थांबला मॉनिटर ने मला आजची हजेरी घेतली आहे आणि ती मध्ये सर्व वर्ग हजर आहे असे सांगितले आणि आम्ही जे परवा वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा असे म्हणत मुली हात जोडून माझ्यासमोर उभ्या होत्या मी मॉनिटरला जवळ घेतल आणि म्हणाले, ” कशा ग तुम्ही अशा.. कस समजत नाही तुम्हाला… तुम्ही वेड्याही आहात आणि शहाण्या हि आहात.. माझे डोळे आनंदाने पाणावले होते माझा राग मावळला हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. तो 15 ऑगस्ट चा दिवस मी कधीच विसरत नाही पुढे 14 साली आमचा माजी विद्यार्थिनी मेळावा झाला त्यात एका मुलीने उठून आठवण सांगितली बाई तुम्ही तुमच्या बाबांची आम्हाला गोष्ट सांगितली होती.. श्रीखंडाची… आजही मी आमच्या कॉलनीमध्ये झेंडावंदनाला उपस्थित राहणारी पहिली असते आणि मुंबई सारख्या ठिकाणी मी माझ्या मुलांना शाळेत पाठवते त्यांना झेंडावंदन चुकवू देत नाही त्यांनाही मी तुमच्या बाबांची गोष्ट सांगितली आहे हे म्हणजे रुजलेल्या संस्काराची परत पावती होती तरुण पिढीला हे सतत सांगायला हवे… सांगणारी माणसं कमी पडत आहेत.. म्हणून पुढच्या पिढीवर संस्कार कमी झाला आहे हे सगळं समजून सांगणारे भेटले तर आजही आपली येणारी पिढी नक्कीच सुजाण असेल देशभक्ती आणि देश प्रेम हे त्यांच्या नसानसात बिंबवलं पाहिजे सोनार बांगला लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या मूर्तीचा भंग हे ज्याने पाहिलं आणि बांगलादेशी च्या तरुणाचा नंगानाच ज्यांनी पाहिला त्या सर्वांना या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होईल कि हे आपल्या मुलांनी असे करायला नको आहे राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कार हे दोन्ही देण्याची गरज आहे राष्ट्र नुसते समृद्ध असून चालत नाही ते सुसंस्कारित पाहिजे आणि प्रत्येकाचे आपल्या राष्ट्रावर प्रेम पाहिजे… जय हिंद!!!
वंदेमातरम !!!
– समाप्त –
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈