सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

डोळे

काही गोष्टी सहजच घडतात पण बालपण सरलं तरी ती आठवण आणि त्यातली गंमत मात्र जात नाही. कधी विषय निघाला आणि पुन्हा ती आठवण सहजपणे मनाच्या कोपऱ्यातून वाट काढत वर आली की नकळत हसू फुटतेच.

आमच्या पप्पांच्या व्यक्तिमत्वातली ठळक आणि आकर्षक बाब म्हणजे त्यांचे तेजस्वी, मोठे, पाणीदार डोळे. आम्हा पाचही बहिणींचे काहीसे मोठे डोळे म्हणजे पप्पांकडून आलेला वारसाच असे म्हणायला हरकत नाही.

तर त्या डोळ्यांचीच गोष्ट आज मला लिहिता लिहिता आठवली. गल्ली मधला आमचा सवंगड्यांचा चमू तसा फारच विस्तारित होता आणि कळत नकळत वयाच्या थोड्याफार फरकांमुळे असेल पण वेगवेगळे समूह सहजपणे बनले गेले होते. लहान गट, मध्यम गट, मोठा गट अशा प्रकारचे. गटागटातले खेळही वेगळे असायचे. एक मात्र होतं की हे ‘मुलींचे खेळ” हे “मुलांचे खेळ’ असा फरक नाही केला जायचा. विटी दांडू, गोट्या, पतंग उडवणे, हुतुतु (कबड्डी), क्रिकेट या खेळातही मुलींचा तितकाच दांडगा सहभाग असायचा. लहान गटातल्या मुलांचा मोठ्या गटातल्या मुलांशी खेळण्याचा खूपच हट्ट असायचा आणि ती पण कुणाकुणाची भावंडे असायची, त्यामुळे त्यांना खेळायला घ्यावंच लागायचं पण तत्पूर्वी त्यांना एक लेबल मिळायचं कच्चा लिंबू आणि या कच्च्या लिंबाला मात्र बऱ्याच सवलती असायच्या.

खेळातल्या नियमांची माफी असायची पण माझी धाकटी बहीण छुंदा हिला मात्र ‘कच्चा लिंबू” म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. तिला तो ‘रडीचा डाव” वाटायचा. ‘रडीचा डाव खडी’ वगैरे तिला कोणी बोललं की तिला फारच राग यायचा. शिवाय तिचे स्वतःचेच तिने ठरवलेले नाही रे ही बरेच असायचे. ती नेहमीच काहीशी शिष्ट, भिडस्त आणि ‘मला नाही आवडत हे’ या पठडीतली होती पण गल्लीतल्या मोरया आणि शेखरशी तिचे मस्त जुळायचे. हे तिघेही तसे बरोबरीचेच होते आणि म्हणून असेल पण छुंदा, मोरया आणि शेखर यांची मात्र घट्ट मैत्री होती आणि या मैत्रीतली आणखी एक गंमत म्हणजे छुंदाला लहानपणापासून मुलांसारखे शर्ट— पॅन्ट घालायला आवडायचे आणि माझी आई, कधी आजीही तिच्यासाठी अगदी हौसेने तिच्या मापाचे शर्ट— पॅन्ट घरीच शिवत. त्यावेळी रेडीमेड कपड्यांची दुकाने फारशी नव्हती. कपडे शिवून देणारे शिंपी असायचे पण आमचे गणवेशापासून, रोजचे, घरातले, बाहेरचे सगळेच कपडे आई अतिशय सुंदर शिवायची.

तर विषय असा होता की शेखर, मोरया आणि ही मुलांच्या वेषातली बॉयकट असलेली मुलगी छुंदा. मस्त त्रिकूट. ते नेहमी तिघंच खेळायचे. खेळ नसला तर आमच्या घराच्या लाकडी जिन्यावर बसून गप्पा मारायचे. मोरया जरासा गोंडस आणि दांडगट होता. शेखर तसा मवाळ होता पण नैसर्गिकपणे असेल कदाचित ती दोघं छुंदाचं मात्र ऐकायचे. तिला त्यांनी कधी दुखवलं नाही. भांडणं झाली तरी परत दोघेही तिला हाक मारून खेळायला घेऊन जायचे.

आज हे लिहीत असतानाही मला ती एकाच उंचीची, एकाच वयाची, निरागस तीन मुलं जशीच्या तशी दिसत आहेत. खरं सांगू गद्र्यांचा नवसाचा मोरया, मोहिलेंचा शेखर… गद्रे, मोहिले आमचे टेनंट्स, त्यांच्याशी असलेली स्वाभाविक बनती बिघडती नाती पण या साऱ्यांचा छुंदा— मोरया— शेखर यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम कधीच झाला नाही. बाल्य किती निष्पाप असते ! छुंदा त्यांच्या घरातही सगळ्यांची फार आवडती होती.

सर्वसाधारणपणे आम्ही सारीच मुलं गल्लीतच खेळायचो. गल्लीच्या बाहेर खेळायला जायची फारशी वेळ यायचीच नाही आणि जायचंच असलं तर घरून परवानगी घेतल्याशिवाय तर नाहीच. शिवाय संध्याकाळचं दिवेलागणीच्या वेळेचं शुभंकरोति, परवचा, गृहपाठ हे कधी चुकायचं नाही पण त्या दिवशी खेळता खेळता.. मला वाटतं मुल्हेरकरांच्या दिलीपच्या लक्षात आलं की हे त्रिकूट कुठे दिसत नाही.

गेलं कुठे ?

घराघरात, पायऱ्या पायऱ्यांवर, जिन्यात, सगळीकडे शोधाशोध झाली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एव्हाना खात्री पटली “हे तिघे हरवले. ”

यांना स्वतःची नावं, घराचा पत्ता तरी सांगता येईल का ?

कुठे गेले असतील ?

तसं त्यावेळेस ठाणे एक लहानसं गावच होतं आणि हे गावही अनेक गल्ल्यागल्ल्यातूनच वसलेलं होतं. कुणीतरी म्हणालं, “ठाण्यात मुलं पळवण्याची टोळी आलेली आहे. ”

बापरे !

आई, पप्पा, जीजी आणि आम्ही सारेच पार हादरून गेलो.

संध्याकाळ होत आली. घरोघरी दिवे लागले. तोंडचं पाणी पळालं तरी या तिघांचा पत्ता नाही. शोध मोहीमही असफल ठरली. आता शेवटचा मार्ग— पोलीस चौकी. मागच्या गल्लीतली, त्या पलीकडची, इकडची, तिकडची बरीच माणसं गोळा झाली.

मुलं हरवली.

कुणी म्हणालं, ”पण अशी कशी हरवली ?”

दिलीप तापट. आधीच बेचैन झालेला. तो ताडकन म्हणाला, “कशी हरवली माहीत असतं तर सापडली नसती का ? काय विचारता काका तुम्ही…?”

आणि हा सगळा गोंधळ चालू असताना एकाएकी त्या लहानशा गल्लीत पांढरी, मोठी, अँम्बॅसॅडर गाडी हाॅर्न वाजवत शिरली. घोळक्यापाशी थांबली आणि गाडीतून ठाण्यातील मान्यवर आणि प्रसिद्ध समाजसेविका मा. विमल रांगणेकर आणि त्यांच्या समवेत ही तीन मुलं उतरली. विस्कटलेली, भेदरलेली, रडून रडून डोळे सुजलेली, प्रचंड भ्यायलेली… छुंदाने तर धावत जाऊन जीजीला मिठी मारली. आता त्या मुलांच्या मनात भीती होती.. घरच्यांचा मार बसणार की काय याची.

विमलताई म्हणजे प्रसन्न व्यक्तीमत्व. उंच, गोऱ्या, मोहक शांत चर्या. सुप्रसिद्ध क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या त्या पत्नी. यांना कुठे सापडली ही मुलं आणि या स्वतः मुलांना घेऊन आल्या? घंटाळी रोडवरच्या कोपऱ्यावर खंडू रांगणेकरांचा प्रशस्त बंगला होता. आजही आहे. ही तिघं मुलं गप्पांच्या नादात चालता चालता रस्ता चुकले असावेत. रांगणेकरांच्या बंगल्यासमोर कोपऱ्यात बावरलेल्या, रडवेल्या स्थितीतल्या या मुलांना विमलताईंनी पाहिले आणि त्यांनी चौकशी केली.

त्या सांगत होत्या, ”या मुलांना काहीही धड सांगता येत नव्हतं. नावं सांगितली. तीही पूर्ण नाही. कुठे राहतात, घराचा पत्ता त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. खूप घाबरलेली होती म्हणूनही असेल. मी निरखत होते या मुलांना आणि त्यापैकी एकाच्या डोळ्यात मला ओळखीची चमक दिसली. मनात म्हटलं हे तर ढग्यांचे डोळे पण ढग्यांना तर मुलगा नाही. तरी मी याला विचारलं, ‘तू ढगे का ?’

हा म्हणाला, ”हो”

“तूच ढग्यांचा मुलगा आहेस का ? पण… ”तेव्हा तडफदार उत्तर आलं,

“नाही. मी मुलगी आहे. ”

मग सारा उलगडा झाला.

खंडू रांगणेकर आणि पप्पा दोस्तच होते. त्यांना आमचं घर माहीतच होतं.

हरवलेली मुलं सापडली.

तर असा हा गमतीदार किस्सा.

आजही, वेळप्रसंगी गल्लीतली ती माणसं कशी आपुलकीनं जोडलेली होती याची जाणीव झाली की मन भरून येतं. आता जग बदललं.

पण खरी ही गोष्ट डोळ्यांची.

गोष्ट मोठ्या डोळ्यांची. आयुष्यभर पपांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःच कसे समर्थपणे करावे याचे भरपूर धडे दिले पण या पप्पांसारख्याच असलेल्या डोळ्यांमुळे माझ्या धाकट्या, लाडक्या बहिणीचे असे रक्षण झाले, याला काय म्हणावे ?

आज हे आठवत असताना सहज ओठातून ओळी येतात..

या डोळ्यांची दोन पाखरे

फिरतील तुमच्या भवती

पाठलागही सदैव करतील

असा कुठेही जगती…

वंश, कुल, जात, गोत्र, नाव याची परंपरा भले तुटली असेल पण आम्हा बहिणींच्या परिवारात या डोळ्यांची परंपरा अखंड वाहत आहे आणि या डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा आजही टिकून आहे. आता थांबते. भावूक होत आहे माझी लेखणी..

 – क्रमशः भाग दहावा

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments