श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- स्टॅंडच्या बाकावर बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान माझ्या थकल्या मनावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला आठवले…
‘निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात, तेच आपल्या कसोटीचे क्षण! जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात.. !’
त्या रात्री स्टॅंडवरच्या एकांतात बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!) इथून पुढे —-
एरवी अविश्वसनीय आणि अतर्क्य वाटावीत अशी यासारखी अनेक घटीतं पुढे प्रत्येक वेळी मला मात्र ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातलं अंतर कमी होत चालल्याची आनंदादायी अनुभूती देत आलेली आहेत!
यावेळी पौर्णिमेची तारीख बघण्यात माझी नकळत झालेली चूक आणि त्यामुळे पौर्णिमेचं दर्शन अंतरण्याची निर्माण झालेली शक्यता हा बाबा नेहमी म्हणायचे तसा माझ्या कसोटीचाच क्षण असावा आणि केवळ अंत:प्रेरणेनेच मी सलग दोन रात्रींचं जागरण करून भुकेल्यापोटी आंतरीक ओढीने ‘त्या’च्याकडे धाव घेत कसोटीला खरा उतरलो असेन. कारण त्यानंतरच्या महाबळेश्वरमधील पुढच्या साधारण पावणेतीन वर्षांच्या कालावधीत अशी कसोटी पहाणारे क्षण कधी आलेच नाहीत. या प्रदीर्घकाळात ब्रॅंचमधील सगळी कामे, जबाबदाऱ्याच नव्हेत फक्त तर प्रत्येक पॅरामीटर्सवरील माझा परफॉर्मन्सही वरिष्ठांकडून मला शाबासकी मिळवून देणारा ठरत होताच, शिवाय दर पौर्णिमेलाही जाणिवपूर्वक नियोजन न करताच सगळं कांही निर्विघ्नपणे पार पडत होतं!आश्चर्य हे कीं या पौर्णिमेनंतरच्या पुढच्या अडीच-तीन वर्षातल्या कुठल्याच पौर्णिमेच्या प्रवासासाठी मला ना कधी रजा घ्यायला लागली ना कधी प्रवासासाठी कसला खर्चही करावा लागला. कारण नेमक्या त्यावेळी अचानक असं काही घडून जायचं की पौर्णिमेच्या जवळपास जसंकांही बँकेमार्फत दत्तमहाराजच मला बोलावून घ्यायचे!दरवेळी निमित्तं पूर्णत: वेगळी असत पण ती निर्माण होत ती मात्र पौर्णिमेच्या सलग आधी किंवा नंतर. आमचं रिजनल ऑफिस कोल्हापूरलाच होतं. तिथे कधी हिंदी वर्कशॉपसाठी ब्रॅंचतर्फे मला जावं लागे, कधी ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी, कधी कोर्टात सुरू असलेल्या वसुली केसेसमधे साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या कोर्टात उपस्थित रहावं लागे किंवा कधी छोटे-मोठे ट्रेनिंग प्रोग्रॅमस्… कांही ना कांही कारण निघायचं आणि त्या त्या वेळच्या रुटीनचाच एक भाग म्हणून रिजनल-ऑफिसकडून मला बोलावणं यायचं आणि त्या निमित्ताने माझं पौर्णिमेचं दत्तदर्शन तर व्हायचंच शिवाय सगळे प्रवास खर्च आणि टीए डीए बँकेकडून मिळायचे.
खरंतर सहज घडलेल्या एका साध्या प्रसंगाच्या निमित्ताने सलग बारा वर्षांचा दीर्घकाळ दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला नियमित दत्तदर्शनाला यायचा मी केलेला तो संकल्प! ‘आपल्याला या पौर्णिमेला जायला जमेल ना? काही अडचण येणार नाही ना?’अशी टोकाची साशंकता या बारा वर्षांच्या दीर्घकाळात मनात कधीच निर्माण झालेली नव्हती. या एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यात आणि ‘सर्विस लाइफ’ मधेही प्रचंड उलथापालथ आणि स्थित्यंतरं व्हायचे अनेक प्रसंग आले. पण त्यावेळीही मन कधीच साशंक झालेले नव्हते. या दरम्यानच्या काळात मला मिळत गेलेली सलग प्रमोशनस् मला प्रगतीपथावर नेत असायची. त्या प्रत्येकवेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांच्याच मनात सेंट्रल-आॅफीसची ‘प्रमोशन पोस्टिंग पॉलिसी’ काय ठरते याच्या उत्सुकतेइतकेच दडपणही असायचेच. या प्रत्येक प्रमोशनच्यावेळी असणारी अनिश्चितता काय किंवा एरवीही वेळोवेळी कधीही होऊ शकणाऱ्या माझ्या बदल्या काय, त्या प्रत्येकवेळी माझ्या संकल्पपूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकलेही असते, पण आश्चर्य म्हणजे तसं कधीही झालं नाही!आज मागे वळून बघताना मला तीव्रतेने जाणवते की त्या त्या प्रत्येकवेळी ‘त्या’नेच मला अलगदपणे अनपेक्षित आधार दिला होता, सांभाळलं होतं आणि त्यानेच एक अदृश्य, अभेद्य असं ‘संरक्षक कवच’च माझ्याभोवती तयार करून ठेवलं होतं जसंकांही!अशा अनुभवांपैकी एखाददुसरा प्रातिनिधिक प्रसंग लिहिण्याच्या ओघात पुढे कधीतरी येईलही. अशा प्रसंगी अगदी अचानकपणे मिळालेल्या अकल्पित कलाटणीने थक्क झालेल्या माझ्या मनाला ‘माझी संकल्पपूर्ती हा माझ्याइतकाच त्याचाही आनंद असणाराय’ असा भारावून टाकणारा विचार मनाला स्पर्श करुन जात असे. आज त्या कल्पनेनेसुध्दा मन भरून येते!
महाबळेश्वरनंतर माझ्या झालेल्या बदल्या आणि नंतरच्या प्रमोशन्सनंतर झालेली पोस्टिंग्ज् यावरून नजर फिरवली तरी माधवनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या ब्रॅंचेसमधला कार्यकाळ मला आपसूक आठवतो. प्रत्येकवेळी प्रमोशननंतरही मला एकाच रिजनमधे असा सलग बारा वर्षांचा काळ व्यतीत करायला मिळाला आणि तोही कुणाच्याही खास ओळखी आणि जवळीक न वाढवता हे आमच्या बँकेपुरता विचार केला तरी माझे एकमेव उदाहरण असावे.. !
पण या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी. महाबळेश्वपुरतं बोलायचं तर महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचा साधारण वर्षभराचा काळ हा अशा अनेकविध अनुभवांमुळे मला दिलासा देत आला होता. हा एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. इकडे माझ्या रुटीनमधे मला कराव्या लागणाऱ्या तडजोडींपेक्षाही काॅलेज, प्रॅक्टीकल्स, अभ्यास यांचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि जोडीला लहान मुलाची जबाबदारी यांचा विचार करता माझ्या बायकोने, आरतीने केलेल्या तडजोडी निश्चितच कणभर कां होईना अधिक कौतुकास्पद होत्या असंच मला वाटतं. कारण लग्नानंतर तिला सहज योगायोगाने मिळालेली राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने पूर्ण विचारांती सोडलेली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने काहीतरी करण्याचे तिने ठरवलेही होते. त्यानुसार योगायोगाने याच वर्षी तिला कोल्हापूरच्या सरकारी बी. एड् कॉलेजमधे ऍडमिशनही मिळालेली होती. माझी महाबळेश्वरला बदली झाली ती या पार्श्वभूमीवर! या सगळ्याचा लिहिण्याच्या ओघात आत्ता संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे !
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈