श्री मेघ:श्याम सोनावणे
मनमंजुषेतून
☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. !
तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.
साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.
त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !
बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. !
पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.
राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.
पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ?
आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.
“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !
आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.
एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा?
“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी?
आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.
समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.
कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…!
आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !
लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके
मानस तज्ज्ञ, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. मो 8905199711
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈