श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ मनाच्या लहरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
मनाच्या लहरी की लहरी मन !!!
अर्थात वरील विषय वाचल्या वाचल्या आपल्या मनात देखील असाच विचार आला असेल. हो न ? अहो, साहजिकच आहे. कळायला लागल्यापासूनची मनुष्याला असलेली मनाची सोबत मनुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम असते.
मन कसं असतं ? याची विविध उत्तरे देता येतील. आणि ही सर्व उत्तरे जरी खरी असली तरी मोठी गमतीशीर आहेत. कोणी त्याला चंचल म्हणेल, कोणी अचपल म्हणेल. कोणी अधीर म्हणेल तर कोणी बधिर म्हणेल. कोणी मनाला धीट म्हणेल तर कोणी सैराट म्हणेल. इतकं सार वर्णन केलं तरी कोणीही मनाचे इत्यंभूत वर्णन केले आहे असे छातीठोक पणे सांगू शकत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपले मन कसे आहे ? तर
“अचपळ मन माझे नावरे आवरीता’
आपले मन हे समुद्रासारखे विशाल असते, अथांग असते. कधी कधी तर स्वतःला देखील आपल्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. एकाच वेळेला मन हे खंबीरही असते आणि तितकेच नाजूकही असते. ज्या प्रमाणे समुद्राच्या लाटांमध्ये फेस असतो, वाळू असते आणि लाटांबरोबर वाहून येणारे ओंडके सुद्धा असतात. अर्थात या ओंडक्याचा समुद्राच्या स्वाभाविक गती-प्रगती मध्ये फारसा फरक पडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत बरेच वेळा उलट घडते. कारण मनुष्याला आपले मन सागरा इतके विशाल करणे जमतेच असे नाही. ज्याप्रमाणे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी किंवा योग्य त्या प्रमाणात ताणण्यासाठी व्यायामाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे व्यायाम करणारा मनुष्य आपले मन योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात ताणू शकतो, विशाल करू शकतो. अर्थात हा सरावाचा भाग आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही.
गुंतणं हा आणिक एक मनाचा रंग आहे किंवा स्वभाव आहे. मनाच्या ह्या स्वभावाचा गैरफटका बरेच वेळा मन धारण करणाऱ्या देहाला सोसावा लागतो, मग त्याची इच्छा असो व नसो.
मन हे एक न दिसणारं तरीही असणार मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. आजपर्यंत भलेभले थकले, पण मनाचा अंत खऱ्या अर्थाने लागला असे म्हणणारे अतिदुर्मिळ!! मला मन कळलं, मी कोणाच्याही मनातलं जाणू शकतो असे म्हणणे म्हणजे मोठी गंमत. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचे मन जाणू शकत नाही तिथे दुसत्याचे मन काय जाणणार ? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की मन म्हणजेच ‘मी’ आहे. त्यामुळे भगवंताचा शोध आणि ‘मी’ चा शोध यामध्ये मूलभूत फरक काहीच नाही. पण व्यक्तिसापेक्ष त्यात फरक मानला जातो. म्हणून काही लोकं बाहेर देव शोधतात, तर काही आपल्या अंतरात देवाचा शोध घेतात.
सर्व संतांनी मनाचे वर्णन केले आहे.
“अचपळ मन माझे नावरे आवरीता”
– समर्थ रामदास
मन वढाय वढाय
उभया पिकाताल ढोर
किती हाकल हाकलं
फ़िरि येत पिकावर
– संत कवयित्री बहिणाबाई
“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण”,
– संत तुकाराम महाराज
“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी”, अशी काहीशी अवस्था प्रत्येक मनुष्याची असते. मनाचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल. मनाच्या लहरी किती आणि कशा कार्यरत असतात याचे नेमके असे कोष्टक नाही. मन स्थिर करणे म्हणजे एका अर्थाने त्या लहरींवर स्वार होणे. दैनंदिन जीवनात सामान्यपणे मनाच्या लहरी मनुष्यावर स्वार होतात आणि मनुष्याची अक्षरशः फरफट होते. खरंतर मनुष्याने या चंचल लहरींच्या छाताडावर स्वार होऊन जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. थोड्याश्या प्रयत्नाने हे सहज साध्य होऊ शकते, फक्त तशी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी.
“मनातल्या मनात डोकावता यावे।
मनातल्या शक्तीला जागवता यावे।
लहरी मनाच्या जाणता यावे, आणि।
जाणलेल्या लहरींवर स्वार व्हावे।।”
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर