सौ राधिका भांडारकर
☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
खरं म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा ऐकतच आम्ही लहानपणी रमलो. रामायणातला राम आणि महाभारतातला कृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा तेव्हापासूनच मनावर ठसलेल्या पण या दोन्ही व्यक्तींचा प्रभाव मात्र भिन्न होता— भिन्न आहे. राम म्हणजे एकनिष्ठ, एकपत्नीव्रती, प्रजाहितदक्ष, एकवचनी, पितृवचनी, माता बंधुप्रेमी असा आदर्शवादी म्हणून मनात रुजला. कृष्णामध्ये मात्र निराळीच भावनिक गुंतवणूक झाली. रामात आणि आपल्यात एक पारलौकिक अंतर जाणवलं. कृष्ण मात्र अगदी जवळचा सवंगडी, सखा, जिवलग झाला म्हणूनच बालपणीचा कृष्ण आणि त्याच्या खोड्या, मिस्कीलपणा सांगणाऱ्या कथेत मनापासून रमलो. आजही मनाला भावतो तो नटखट कन्हैया. यशोदेचा कान्हा. यमुनेच्या प्रवाहात कालियाच्या मस्तकावर नाचणारा कृष्ण, गवळणींची मटकी फोडणारा मिस्कील नंदलाल, टांगलेल्या हंडीतलं लोणी मित्रांसोबत चोरून खाणारा तो लबाड माखनचोर, रंग उडवणारा, रास खेळणारा, गोपींची वस्त्रे लपवणारा खोडकर पण तरीही प्रिय असा हा गोकुळवासी गोपीनंदन. कुंजवनात कदंब वृक्षातली, पाय दुमडून मंजुळ बासरी वाजवणारा, शामल वर्णी, शिरी मोरपीसधारी, राधेच्या सहवासातला दंग मुरारी. गाई राखणारा, आणि गोरक्षणार्थ पर्वत उचलणारा गोवर्धनधारी, वसुदेवसुत, देवकीनंदन, यशोदेचा कान्हा मनात कायमचं वास्तव्य करून राहिला.
बोबडा पेंद्या आणि कृष्णाची मैत्री तर फारच रंजक. अविस्मरणीय.
पेंद्या रुसलाय. दुखावलाय. म्हणतो कसा,
“कुत्ना थमाल ले थमाल आपल्या गाई आम्ही आपल्या घलाशी जातो भाई ।
कृष्ण मित्र म्हणून भोळा पेंद्या त्याच्याजवळ तक्रार करतो,
काल बलाचि ले बलाचि खलवस केला
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला
मी गलीब म्हणुनी थोलका दिला
तू म्हणशील ले याला कलतीच नाही ।
कृष्ण हा आपला सखा आहे आणि तो आपलं गार्हाणं, आपलं रागावणं, आपलं दुःख जाणून घेईलच याची पेंद्याला किती खात्री! म्हणूनच खऱ्या मित्राची खरी प्रतिमा कृष्णाच्या रूपातच मनावर ठसते.
जसा पेंद्या तसाच सुदामा. राजमहालातल्या पंचपक्वांनाना डावलून, फडक्यात बांधून आणलेल्या सुदामाच्या मूठभर पोह्यांचा तो मनापासून चट्टामट्टा करतो. या साऱ्याच कथांमधला कृष्णस्पर्श मनात अमरत्वाच्या भावनेनं बिलगलेला आहे…
देवाचा देव बाई ठकडा
एका पायाने लंगडा
करी दही दुधाचा रबडा… असा हा मनात बसलेला लडीवाळ कान्हा, अचल असला तरी जसं वय वाढत गेलं, तसं महाभारतातला, अर्जुनाला गीतामृत पाजणारा, पार्थसारर्थी, हाती शस्त्र न धरता चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा राजनीतीज्ञ, धर्मपरायण, धूर्त, धोरणी, युगंधर हळूहळू उलगडायला लागला. गोकुळातून, मथुरा, द्वारका आणि हस्तीनापुरातला कौरव पांडव यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी प्रयत्नशील पण त्यानंतर केवळ सत्य धर्माची बाजू सांभाळणारा, रथारुढ भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मप्रतिज्ञेला आव्हान देत पितामह भीष्मांशी संवाद साधणाऱ्या कृष्णाची अध्यात्मिक प्रतिमा मनात साकारू लागली. त्या प्रतिमेपर्यंत पोहचणं ही एक तपस्या आहे हेही जाणवू लागलं.
बालपणीचा राधेत रमणारा, गोपींची वस्त्र पळवणारा कृष्ण एका निराळ्याच तत्त्वात दिसू लागला. रूपकात्मक भासू लागला. अंगावरची वस्त्रे ऐहिकतेच्या रूपकात पाहता आली. ती कृष्णभक्तीने पळवली गेली म्हणजेच देह परमात्मा स्वरूप झाला. हा भक्तीयोग असा कळू लागला. राधाकृष्ण प्रेमाचं स्वरूप भक्ती आणि प्रीतीच्या उदात्त अद्वैतात जाणवलं. ते अशरीरी, अंत:प्रवाहातलं प्रीतीचं अमर स्वरूप होतं. हा कृष्ण खूप वेगळा होता. तो सगुण होता, आकृतीबंधातला होता पण तरीही आकलनाच्या पलीकडला होता.
कुब्जेच्या कुबडाला त्याचा दिव्य स्पर्श होतो, एका चिंधीच्या बदल्यात बंधू, सख्याच्या नात्याने भर दरबारात लज्जित झालेल्या द्रौपदीला सहस्त्र वस्त्रे पुरवून तिची लाज राखतो, सत्यभामेच्या हट्टासाठी इंद्रदेवाशी युद्ध करून स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणतो पण त्याचवेळी रुक्मिणीच्या “मला ती सुगंधी प्राजक्त फुले आणून द्या” या लडिवाळ हट्टाचाही मान राखून “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” अशी कमाल त्या दोघींच्या जीवनात घडवून आणतो, सोळा सहस्त्र स्त्रियांचा पती म्हणून मिरवतो असा हा स्त्रियांचा कैवारी माझ्या स्त्री मनावर एक रक्षक म्हणून भक्तिभावाने राज्य करतो.
रणभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. कर्ण चाक काढण्यासाठी रथाखाली उतरला. धनुष्यबाण ठेवल्यामुळे तो नि:शस्त्र होता. कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला असताना कर्ण म्हणतो अर्जुनाला, ” हे धर्मयुद्ध आहे. हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालणे हा अधर्म आहे. ”
तेव्हा कृष्ण उत्तरतो,
“हे राधासुता! तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म ज्यावेळी द्रौपदीच्या पदराला भर सभेत हात घातला जात होता, एकट्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कौरवांनी घेरले?”
एकाच वेळी धर्मपरायण आणि जशास तसे कृतीतून उत्तर देणारा कृष्ण, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक पापभीरू मानवासाठी आधारभूत ठरतो. कणखरपणे प्रत्युत्तर देणारा हा महाभारतातला कृष्ण, मनातल्या देव्हाऱ्यात भगवंत म्हणून स्थित होतो आणि नकळत बालपणीचा खोडकर कन्हैया याच तत्वाशी अलगद जोडला जातो.
अशा या मनातल्या गाभार्यात जपलेल्या कृष्णाला मात्र सभोवतालच्या नकारात्मक आणि अनीतीत बुडालेल्या, धर्मसंज्ञेचा धिक्कार झालेल्या, विकृत समाजात भयग्रस्त होऊन जगताना एक प्रश्न विचारावासा वाटतो,
“संभवामी युगे युगे” म्हणून आश्वासन देणारा तू कुठे आहेस? तू कसा लोपलास? का दिसत नाहीस? का जाणवत नाहीस? जर तू विश्वाच्या अंशा अंशात सामावलेला आहेस मग तू प्रकट का होत नाहीस? विठ्ठलाच्या रूपात तू जनीची लुगडी धुतलीस, दळण दळलेस, गोऱ्या कुंभाराची मडकी भाजलीस मग आत्ताच कुठे दडी मारून बसला आहेस? असं तर नाही ना की आम्हीच करंटे तुला पाहू शकत नाही. कृष्णस्वरूपांशी आमचीच समर्पण भावना कमी पडत आहे का?माझ्यात मीरा नाही. माझ्यात राधा नाही. मग हे मीराके प्रभु! सांग मला माझे भरकटलेले तारू तुझ्याविना किनारी कसं लागेल?”
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈