📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “हंडी…” – कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे रानडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
हंडी बांधली षडरिपूंची
रचले सहा पदरी थर
सहज पार करू म्हणत
चढू लागले वरवर
*
मोह होता दही लोण्याचा
प्रत्येकाची नजर वर
एकमेकांच्या आधाराने
मार्ग होई अधिक सुकर
*
जो पोहोचे हंडीपाशी
वाटे त्याचा मनी मत्सर
आधाराची कडी सुटता
निसटत जाई प्रत्येक थर
*
काम क्रोध येता आड
एकजुटीवर होई वार
लोभ सुटेना लोण्याचा
कृष्ण एकच तारणहार
*
करांगुली सावरे उतरंड
पुन्हा एकदा रचे डाव
कर्माचा सिद्धांत सांगे
फळाची नकोच हाव
*
हंडी बांधली संकल्पाची
कर्मयोग स्मरुनी मनात
सत्कर्मांची रास रचता
समाधान ओसंडे उरात …….
☆
कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे – रानडे
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈