श्री नितीन सुभाष चंदनशिवे
कवितेचा उत्सव
☆ “नाहीतर धर्मच जिवंत ठेवणार नाही…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
☆
संध्याकाळच्या भाकरीचं गणित
जी माणसं दिवसभर सोडवतात,
त्यांना लोकशाहीची व्याख्या
विचारू नका कधीच,
पण,
तेच लोक भुकेचा अर्थ सांगतील तेव्हा,
कानावर हात ठेवा
फार भयंकर बोलतात ही माणसं
*
कोणत्याही फुलांचं सौंदर्यशास्त्र
त्यांच्यासमोर उलगडू नका
भाकरीसारखं सुंदर फुल
पाहण्यासाठी तडफडत असतात ही माणसं
*
ह्या माणसांची भूकच फार फार
सुंदर आहे माझ्या देशा
तरी सुद्धा त्यांची विझेलेली चूल
राष्ट्रगीत अभिमानाने गाते
*
राशनच्या दुकानात हातात कार्ड धरून
फार उशिरापर्यंत उभी राहतात ही माणसं
तेव्हा धान्य देणारा राशनवाला माणूस
त्यांना कायम हिटलरच वाटत आलाय
तरीसुद्धा,
ही माणसं चार्ली चॅप्लिनपेक्षाही
हसण्याचा फार सुंदर अभिनय करतात
*
मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे भारता
ह्या माणसांनी भाकरीवरच प्रतिज्ञा लिहिली
तर तुला वाचता येईल का?
प्रतिज्ञा तीच असेल जराही फरक नसेल
तरीसुद्धा तुला ती वाचता येणार नाही
कारण एक भाकरी
फक्त इथंच चारी धर्मात वाटली जाते
कदाचित पोट भरल्यावर कळेल
कोण हिंदू
कोण मुसलमान
कोण सिख
आणि कोण इसाई..
*
पण पोट भरत नाही कारण,
भुकेवर फार प्रेम करतात ही माणसं
ही माणसं कधीच प्रतिज्ञा वाचत नाहीत भारता
ती मनोमन जगतात प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
*
जाता जाता माझ्या कवितेला एवढंच सांग
ही लढाई लढताना त्यांच्या उपाशी पोटाला
जात आणि धर्म काय कळणार आहे.?
*
आणि माझी कविता वाचणाऱ्या
प्रत्येकाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे
तुम्हा सर्व भारतीयांना
माणूस म्हणून जिवंत राहायचंय की,
तुमच्या धर्माचे पाईक म्हणून?
*
तुम्ही काहीही म्हणून जिवंत राहा
पण,भुकेचे बळी देऊन जर तुम्ही
ही लढाई जिंकणार असाल
तर मात्र,
मी तुमचा कुणाचाच धर्म जिवंत ठेवणार नाही.
☆
कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈