श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ’हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु. पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वरमहाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल.

 पण या शंकेचे निरसन झाले, ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यांनी या शब्दांचा अर्थ असा सांगितला … कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा. हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल.

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळा फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा ॥१॥

 … ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

 कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेवूनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥

… प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु) आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी, माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भूमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंथी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे.

 शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥

 … प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

 पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

 …. या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे. पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

 क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनी स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव राहो॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल.. त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये। तव भीतरी पालटु झाली॥६॥ 

… हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असे कळले म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारख्याला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आले तर पाउले लपवतोस, समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. … कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि अनाकलनीय (कानडा) आहेस.

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

लेखक : सचिन कुलकर्णी 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments