सुश्री सुनिता गद्रे
☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
डॉ. इरावती कर्वे
“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी – –
थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका डाॕ. इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डाॕ. इरावतीबाई कर्वे याही एक आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य डाॕ. दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.
बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते. वडील म्यानमारमधील एका कंपनीत नोकरी करीत होते. मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे. त्यांना पाच भाऊ होते. म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले. कुटुंबात त्यांना माई म्हणत. विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.
लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती. ठसठशीत कुंकू. घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते. पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन काॕलेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कुतूहलाने व आदराने पाहत असत.
वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले. आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या. १९२२ साली त्या मॕट्रिक झाल्या. १९२६ साली फर्ग्युसन काॕलेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी. ए. झाल्या. आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन काॕलजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९२८ साली त्या एम. ए. झाल्या. त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी. एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या. १९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी. एचडी मिळाली. तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते. बाई तर परदेशात जाऊन पी. एचडी. होऊन आल्या होत्या. पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती. काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले. व नंतर त्यांनी डेक्कन काॕलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. त्यामध्ये त्या रमून गेल्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य रँग्लर र. पु. परांजपे यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या घरीच त्या राहत होत्या. या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले. संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.
संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता. संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या. जगभर प्रवास केला. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. अखंड वाचन केले. शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. जगभर व्याख्याने दिली. त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे. चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे. हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आॕरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द कीर्ती मिळवून दिली. नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रुढअर्थाने त्या स्त्रीवादी नाहीत. परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रीवादी विचार प्रसवले आहेत. हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल. स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात. इरावतीबाईंनी स्त्रियांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले. त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले. परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने शिकू द्या असे सांगितले.
इरावतीबाईनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे. महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे. त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे. “युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे. महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो. भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे. परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.
एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली. समारंभ संपला. बाई घरी चालल्या. परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते. त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. याच विचारात त्या घरी चालल्या होत्या. वाटेत मुलांचा खेळ चालला होता. बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे!शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? त्या बाई जात आहेत ना, त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”. एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या. त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले. आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते. मनाची परिपूर्ती झाली होती. समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती. ” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच. “कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.
खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती. स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते. हे त्यांना सांगायचे होते. परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.
त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे. मनाचा तळ ढवळून काढणारे आहे. वैचारिक घुसळण करणारे आहे. एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे. अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुद्धीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाई वारीत सामील व्हायच्या. भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम ! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.
बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले. ११ आॕगस्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली. खूप व्याख्याने दिली. परदेशात लौकीक मिळविला. शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या. सनातनी पुण्यातल्या भर रस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन काॕलेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी … या महाराष्ट्राच्या विद्वान सुपुत्रीला त्यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्य साष्टांग दंडवत.
लेखक : श्री. बी. एस. जाधव
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈