श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ आला श्रावण श्रावण / वेध माहेराचे… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
“वेध माहेराचे” या आधीच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, नव्या नवरीला श्रावणात माहेरी जाण्याचे वेध तर लागतात पण एकदा माहेरी आल्यावर नवऱ्याची आठवण पण छळायला लागते ! तर तिच्या मनांतले विचार कसे असतील ते सांगायचा प्रयत्न खालील कवितेत केला आहे.
☆ हु र हू र ! ☆
*
नाही उतरली अंगाची
ओली हळद अजून,
आले धावत माहेरी
साजरा करण्या श्रावण !
*
भेटता माहेरवाशिणी
आनंद झाला मनांतून,
तरी पहिला तो स्पर्श
जाईना माझ्या मनांतून !
*
रमले जरी सणावारात
भान चित्ताचे तिकडे,
शरीरी जरी इकडे
मन मिठीत त्या पडे !
*
सख्या साऱ्या करती
माझीच थट्टा मस्करी,
मी मग हासून वरवर
विरह झाकतसे उरी !
*
आता संपताच श्रावण
जाईन म्हणते सासराला,
जाण्या मिठीत रायाच्या
जीव माझा आसुसला !
जीव माझा आसुसला !
☆
मागच्या कवितेत नवी नवरी श्रावणात माहेरी आली, तरी तिचं मन नवऱ्याकडे कसं धावत असतं याच वर्णन केलं होतं. तिच्याप्रमाणे तिच्या नवऱ्याचे मनांत सुद्धा काय विचार असतील, ते खालील कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
☆ त ग म ग ! ☆
*
तुझं पहिलं माहेरपण
करी जीव कासावीस,
रात खाया येई खास
जाई कसाबसा दिस !
*
सणवारात गं तुझा
जात असेलही वेळ,
इथं आठवात तुझ्या
नाही सरत गं काळ !
*
येते का गं माहेराला
तुला माझी आठवण,
का झुरतो मी उगाच
डोळी आणुनिया प्राण ?
*
वेळी अवेळी गं होतो
मज तुझाच गं भास,
येता श्रावणाची सर
लागे भेटीची गं आस !
*
नको लांबवू माहेरपण
जीव होतो गं व्याकुळ,
जसं उजाड वाटे कृष्णा
राधेविण ते गोकुळ !
राधेविण ते गोकुळ !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈