श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “एक नवीन बालकविता…” लेखक : श्री गणेश घुले ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
☆
बाबा, आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का….. ?
खेळण्यामधली खोटी बस, पेट्रोल टाकून जाळू का.. ?
*
टीव्ही मध्ये बघून शिकलोय, दगड कसा मारायचा.
आम्हालाही कळले आहे, झेंडा कसा धरायचा.
सहल काढा म्हणून आम्ही शाळा बंद करू का.. ?
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का…. ?
*
घरामध्ये करू खोटी जमावबंदी लागू,
एका खोलीत एकजण रात्रभर जागू,
परीक्षा नको म्हणून उपोषण करू का.. ?
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?
*
गुरुजींच्या बदलीची मागणी लावून धरू.
सारे मिळून शाळेला आम्ही दांडी मारू.
परिक्षेतले कमी मार्क वाढवून मागू का.. ?
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?
*
घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यु आपण लावू,
आई अडकेल किचनमध्ये, आपण हॉलमध्ये राहू,
पोलिसांना चुकवत चुकवत, इकडे तिकडे पळू का.. ?
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?
*
पुतळ्याला काळे फासू, की खोटी गाय मारू?
आधी खोटी दगडफेक, मग जाळपोळ करू?
मोठ्या माणसासारखे आम्हीसुद्धा वागू का?
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?
*
दंगलीनंतर आमच्यावर लागेल कोणता गुन्हा?
की राजकीय दबावाखाली सोडून देतील पुन्हा?
सगळे सोडून साधे सरळ संविधान वाचू का… ???
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ???
…….. सांगा ना…. ????
☆
कवी: श्री गणेश घुले
औरंगाबाद. मो – 9923807980.
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈