श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता. मराठी कादंबरीकार. १९७० ते १९९० हा त्याचा लेखनकाल. या काळात त्याने साधारण हजार कादंबऱ्या लिहिल्या. त्याचा खप अक्षरशः तडाखेबंद होता. ‘अश्लील कादंबरीकार ‘ म्हणुनच त्याची ओळख होती. पण त्याने कधी पर्वा केली नाही.

जन्म सांगलीचा. सुरुवातीच्या काळात त्याने काही मासिकं काढली. नट नट्यांची लफडी.. आणि त्याला साजेशी चित्रे असं त्यांचं स्वरुप असायचं. मासिकाची नावही तशीच.. राणी.. प्यारी.. मस्ती अशी.

ही माहिती तो कुठुन गोळा करायचा ते कधीच समजलं नाही. मासिकांवर त्याने टाकलेले पत्ते नेहमी खोटेच असायचे. तो नेमका कुठं रहातो.. अंक कुठून प्रकाशित करतो.. प्रिंट कुठून करतो हे कधीच समजायचं नाही.

पण त्यांची विक्री अफाट होती‌. महाराष्टातील सगळीच रेल्वे स्टेशन.. बस स्टॅण्ड.. आणि गावागावांत असलेले विक्रेते एजंट अंकाची आतुरतेने वाट पहात. आलेले अंक हातोहात खपत. कधी दुप्पट तिप्पट किमतीतही ती विकली जात.

काही काळ हा उद्योग चालला.. आणि मग बंदही पडला. मग त्यानं कादंबरी लेखन सुरू केलं. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे रहस्यकथा असत. त्या नावाखाली पानोपानी कामुक वर्णने.. जोडीला खुन. दरोडे.. बदले हा मसाला.

त्याच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. महीन्यात २०-२५ कादंबऱ्या सहजपणे तो लिहून काढायचा.

एक बाहेरगावचा प्रकाशक त्याच्याकडं आला होता…. कबुल करुनही अजुन का कादंबरी लिहीली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी.

त्याने मग स्वतःला खोलीत कोंडुन घेतलं. दुपारपासुन तर रात्रीपर्यंत अखंड लेखन करुन कादंबरी त्या प्रकाशकांच्या हातात ठेवली.

याच काळात आशु रावजी.. दिनु कानडे या नावांनी लिहिलेल्या अश्लील कादंबऱ्या पण वाचकांमध्ये गाजत होत्या. हे दोन लेखक कोण हे कधीच समजलं नाही. पण बऱ्याच जणांच्या मते ह्या कादंबऱ्या तोच टोपण नावाने लिहीत होता.

त्यानं लेखन सहायक म्हणुन सुंदर मुलींचा तांडाच ठेवला होता. पुण्यात आल्यावर त्याला भेटायला गर्दी लोटे.

सुहास शिरवळकर एकदा त्याला भेटायला गेले होते. तो पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याला भेटायला आलेल्या प्रकाशकांची गर्दी.. त्याच्या सेवेत असलेल्या सुंदर ललना.. आणि मद्याचा महापूर हे सगळं बघुन ते चकीतच झाले. ‘सु. शि. ‘सांगतात… या माणसाकडे पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. या माणसानं आयुष्य खुप ‘उपभोगुन’ घेतलं आहे.

या अश्या लिखाणामुळे त्याच्या मागे कोर्ट कचेरी खटले मागे लागले. एक वेळ तर अशी होती की ऐंशी खटले त्यांच्यावर दाखल झाले होते.. मग त्यानं एक कायमस्वरूपी वकील पगारावर ठेवला.

जितका पैसा त्यानं मिळवला.. तो सगळा दारु.. स्त्रिया.. कोर्ट.. आणि पोलिसांची सरबराई यात घालवला. ऐषोरामी जीवन. ‌विलासी जगणं यात आलेली कमाई उधळली.

सुभाष शहा हे या लेखकांचं नाव. त्यांची पुस्तक वाचणं.. अगदी उघडपणे बाळगणं हेही अप्रतिष्ठतेचं.. अभिरुचीहिनतेचं लक्षण मानलं जातं होतं. तरीदेखील लपुन छपुन सगळेचं जण सुभाष शहांच्या पुस्तकांकडे आकर्षित होत असत.

पण या सगळ्याला उतरती कळा लागणं नैसर्गिक होतं. काळ बदलला.. लोकांच्या आवडी बदलल्या.. करमणुकीची साधनं बदलली.. त्यांच्या पुस्तकांचा खप खाली आला. दारु.. व्यसनं करता करता पैसा संपत गेला. शरीर पोखरत गेलं. देवानं सुभाष शहांना अपार प्रतिभा बहाल केली होती. लेखन शैली असुनही त्यांनी ती चुकीच्या कामांसाठी वापरली. त्यांना कधी मानसन्मान मिळालेच नाही. स्वत:च्याच अश्या सवयींमुळे एक उमदा लेखक संपून गेला.

या पार्श्वभूमीवर आठवतात लेखक रवींद्र पिंगे.. आणि त्यांचे विचार. ते म्हणतात..

“पन्नास वर्षे मी जीव लावून गोमटं आणि घाटबध्द लेखन केलं. दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही. माझं मन नेहमीच वखवखशुन्य असतं. जे सुखदुःख मिळालं ते भोगलं.. तक्रार नाही. माझी ठाम श्रद्धा आहे की..

… माणसानं दिलेलं पुरत नाही..

आणि..

देवानं दिलेलं सरत नाही.

पोएट बोरकरांच्या भाषेतच सांगायचं तर..

.. वळुन पाहता मागे..

.. घडले तेच पसंत

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments