डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

माझी आदर्श उपासना… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

मी माझ्या आज्जीला फार वर्षांपूर्वी विचारले होते की, ‘ तुम्ही कोकणात असताना गणेश उत्सव कसा साजरा करायचात? ‘ 

ती म्हणाली, ‘तो उत्सव नसतो ते एक व्रत असत, चतुर्थीच्या दिवशी स्नान करून नदीवर जायच – 1, नदीतली माती घेऊन – 2 एका स्वच्छ जागेवर यायच- 3. त्या मातीतील जास्तीच पाणी सुकू द्यायच – 4, मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – 5. नंतर त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – 6, तीथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – 7. उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करून, 8 त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे 9 आणि घरी यायचे10. कोकणात सर्वच सणांना मोदक केले जातात तसे सवडीनुसार मोदक करुन, गणपतीचे प्रतिक म्हणून ब्राह्मण भोजन घालावयाचे’.

… आजवर या विषयावर मी विचार केला आणि काही पौराणिक माहितीही वाचली. त्यातून माझे एक मत तयार झाले आहे. ते कदाचित अशास्त्रीय, अतार्किक, अवास्तव आहे असेही काही लोक म्हणतील, पण ते माझे मत – माझे आहे आणि मला ते फार प्रिय आहे.

साऱ्या देवतांच्या पूजा, उपासना किंवा व्रत का केली जातात? 

… त्यांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करण्याकरता केले जाते. आपण अनेक कारणांनी अनेकांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करतो, त्याकरता आपण वेळ, काळ व अन्य उपलब्ध साधने यानुसार ते व्यक्त करतो. प्रत्येक माणसाने एकच पध्दत वापरावी हा आग्रह नसतो. ज्याची जशी पात्रता असेल, उपलब्धता असेल तसे आपण स्विकारतो. मग देवांच्या पूजांबाबत, उपासनांबाबत एवढा आग्रह का?….. देवता असोत, आदर्श व्यक्ती असोत त्यांची उपासना नियमितपणे करावी असे माझे मत आहे, पण त्याकरता, बाह्य पूजाविधीचीच जरुरी आहे असे मला तरी वाटत नाही. मानस उपासना जास्त प्रभावी ठरते, कारण बाह्यपूजा अहंकार वाढवतातच शिवाय त्या करताना वेळ, शक्ती आणि अन्य अनेक गोष्टींचा बरेचदा अपव्यय होतो.

(निर्माल्य, देवाला वाहिलेल्या, किंवा सजावट केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करणं – किमान शहरात तरी किती अवघड आहे.) 

याहीपेक्षा आणखी एक गोष्ट मला महत्वाची वाटते, ती म्हणजे प्रत्येक देवता व व्यक्तींच्यातील गुणांचा विकास आपल्यामधे (भक्तांमधे) कसा होईल? प्रत्येक सच्चा धार्मिक मनुष्य स्वत: विकास करुन घेण्यास झटत असतो, आणि हा विकास उत्तम प्रकारे व्हावा याकरताच तर भारतीय परंपरेने चारी पुरूषार्थांची संकल्पना मांडली.

या विकासातील आदर्श तत्वांचा समुच्चय म्हणजे विविध देवता आणि त्यांची चरित्र आणि चारित्र्य होत. अशांची उपासना करायला हवी, आणि माझ्या आज्जीनं सांगितलेली व्रतपध्दती त्या अर्थाने मला फारच मोलाची वाटते…..

1) नदीवर जावे – नदी हे आपल्या सतत वाहणाऱ्या मनाचे प्रतिक आहे. (ओशो रजनिश मनाला ‘minding’ म्हणायचे. ) आपल्याच मनाचे निरीक्षण करावे.

2) नदीतील माती घ्यावी – आपल्याच मनातील काही बाबींचे निरीक्षण विशेषपणे करावे.

3) स्वच्छ जागेवर यायचं – जेथे मन शांत आणि स्तब्ध होण्यास मदत होते अशा ठिकाणी रहावे.

4) जास्तीचं पाणी सुकू द्यायचं – आपण अनेक नको त्या गोष्टींना (आग्रहांना, जाहिरातींना, सजावटींना) बऴी पडतो, अनेक गोष्टींची भुरळ पडते आणि मनामागे, इंद्रिये आणि आपल्या साऱ्या उर्जा धावतात, त्यांची धाव कमी करण्याचा प्रयत्न करायचा.

5) मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – हे सार करताना आपल्यातील दुर्गुणांची ओळख पटू लागली की त्यांना लगेच दूर करण्याचा प्रयत्न करायचा.

6) त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – आपल्यातील दुर्गुण (मत्सर, द्वेष, दुर्वासना, पूर्वग्रह, अज्ञान) आणि प्रवाहीपण नाहीसे झाल्यावरच स्वत:तील उत्तम गुणांचा विकास होतो.

 …. आता गणपतीच का? (माझाच जुना प्रश्न) – लंबोदर – अत्युच्च सहनशक्तीचे प्रतिक (so do Happy man) लांब नाक, मोठे डोळे, मोठे कान – ज्ञानेंद्रियांच्या (समजशक्तीच्या) अत्युच्च विकासाचे प्रतीक. ज्यांची सर्व प्रकारची सहनशक्ती व इंद्रियशक्तींचा विकास झाला तरच आपल्यातील गुणांचा पूर्ण विकास होतो आणि आपणच देवांप्रमाणे लोकांकरता आदरणीय व पूजनीय ठरतो.

7) तिथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – आपल्यातीलच नव्हे तर अन्य वस्तूतील उत्तम गुणांची आपल्या व्यक्तीमत्वाला जोड द्यायची, किंवा असेही म्हणता येईल की आपल्याला लाभलेल्या साधनांचा आदराने वापर करायचा.

8) उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करणे – एकदा विशिष्ट स्थान निर्माण केल्यावर, त्या स्थानावर टिकून राहण्याकरता तप करावे लागते. (रामकृष्ण परमहंस याबाबतीत फार आग्रही होते.) स्तोत्र, जप, ध्यानाद्वारे स्वत:लाच परत परत उत्तम गुणांची आठवण करून द्यावी लागते.

9) त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे – आपल्यातल्या विकासामुळे हुरळून न जाता, आपल्या मर्यादा आणि अन्य सर्वच जीव आणि अजीवांचे भान ठेवायचे

10) आणि घरी यायचे — हे सारे करताना आपले नित्यकर्म सोडायचे नाही.

जगातील अगणित देवतांची अशीच उपासना करता येईल असे मला वाटते.

मला अशी उपासना आवडते, पहा ! तुम्हाला आवडते का ?

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments