सुश्री नीता कुलकर्णी
☆ माझा बाप्पा… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆
गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट … कोणाला विचारायला गेलेच नाही
रीती रिवाज घराणं परंपरा…… नकोच ते … माझ्या मनालाच विचारलं
प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? सुबक छानशी पितळी मूर्ती घेऊन आले
लहानगी दोन्ही नातवंड एकदम खुष.. त्यांनी आरास केली.. हौसेनी बाप्पाला सजवलं.
पूजा नैवेद्य आरती अथर्वशीर्ष यथासांग झालं
नंतर विसर्जन…..
अहो ते तर मोठ्या पातेल्यातच … ते पाणी घातलं तुळशीला
एक सांगू ? विसर्जन कशाचं करायचं ते आता नीट समजलं होतं…
परत बाप्पा जाऊन बसले जागेवर.. राहू देत की घरीच…. नाहीतरी मी काय करते हे बघायला घरात कोणीतरी मोठं हवंच ना..
हे करताना विचार केला होता …
चौकटी असतातच.. वापरून वापरून थोड्या झिजतात खराब होतात.. बेढब दिसायला लागतात
अट्टाहासानी तशाच का ठेवायच्या ? बदल करायला हवा ना.. ‘ राहु दे.. तशाच ‘… म्हणणारे असतील
तरी विचार करून त्या बदलाव्या, नीट नेटक्या कराव्या, नविन कल्पनांनी अधिक देखण्या सुंदर दिसतील
हळूहळू शहाणपण येत जातं. आपल्याही मनाला न दुखवता बदल सुचतो आपला आपल्याला.. अनेक ठिकाणी आवश्यक असलेला … चौकटीत राहुनच आपण केलेला … कुणाला न भिता केलेला … आणि
तो खराखुरा आनंद देतो
गणपती बाप्पाला आपण काय प्रार्थना करतो….
” प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दयासागरा
अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा “
© सुश्री नीता कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈