श्री संदीप रामचंद्र सुंकले
☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)
शिरसाष्टांग प्रणिपात,
उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.
आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !
प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..
आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?
मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….
श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!!
प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…!
या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!
आपला,
दासचैतन्य.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈