श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“…  श्री सुहास सोहोनी ☆

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

येति स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

*

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

*

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

*

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

*

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद*, चौथ्यातुन…

*

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

*

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments