श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला बदली झाल्याची ऑर्डर आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात!त्या त्या वेळचे माझी कसोटी पहाणारे क्षण, त्या क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा त्यावेळी अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता, आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं त्या क्षणी नजरेसमोरुन सरकत गेलं. या सगळ्या घटीतांच्या रूपाने ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत असायचा!) – इथून पुढे – 

महाबळेश्वरमधला माझा जुलै ८४ ते एप्रिल ८७ दरम्यानचा कार्यकाळ, तिथली यशस्वी कारकीर्द आणि आधी उल्लेख केलेल्या सर्व अकल्पित घटनांमुळे माझ्यासाठी यशदायी, आणि अविस्मरणीय ठरलेला आहे. तिथून माझी बदली अपेक्षित होतीच पण मला पोस्टींग मिळाले ते मात्र अनपेक्षित! जणूकांही माझं दर पौर्णिमेचं दत्तदर्शन विनाविघ्न घडत रहावं म्हणूनच झाल्यासारखं माझं पोस्टींग पुणे, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा अशा कुठल्याही दूर, गैरसोयीच्या ठिकाणी न होता, मी आवर्जून तशी विनंती न करताच माधवनगर ब्रॅंचला झालं!

ही बदली/पोस्टींगच नव्हे तर त्यानंतरच्या संपूर्ण सर्व्हीस-लाईफमधली सगळीच पोस्टींग्ज आणि प्रमोशन्सही माझ्या आयुष्यातल्या त्या त्या वेळी चमत्कार वाटाव्यात अशाच अनपेक्षित कलाटण्या होत्या! प्रत्येकवेळी श्रीदत्तकृपेचं सुरक्षाकवच म्हणजे काय याची  नव्याने प्रचिती देणारे ते अनुभव म्हणजे माझ्या आठवणींमधला अतिशय मौल्यवान असा ठेवाच आहेत माझ्यासाठी!

आता लगोलग महाबळेश्वर सोडायचं म्हणजे आधी आरतीच्या शाळेतील नोकरीचा राजीनामा देणं अपरिहार्य होतं. तसं तिने त्याच दिवशी मुख्याध्यापकांना सांगूनही ठेवलं होतं. अर्थात कधीतरी हे होणारच होतं हे त्यांनीही गृहीत धरलेलं होतं. त्यामुळे त्याक्षणी त्यांच्या दृष्टीने ते अनपेक्षित असलं तरी त्यात फारशी कांही तांत्रिक अडचण यायचा प्रश्न नव्हताच. तरीही तिथलं शैक्षणिक वर्ष मेअखेर संपत असल्यामुळे तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्रश्नच नव्हता. पण आमच्या तातडीने महाबळेश्वर सोडण्यामुळे विद्यार्थ्यांचा राहिलेला पोर्शन पूर्ण करणे आणि त्यांची वार्षिक   परीक्षेसाठीची पूर्वतयारी करून घेणे ही महत्त्वाची कामे अर्धवट रहाणार होती. त्यामुळेच मुख्याध्यापकांनी ‘जून अखेरपर्यंत तरी तुम्ही काम करावे आणि मग राजीनामा द्यावा’ अशी विनंती केली. हे आमच्या दृष्टीने थोडं गैरसोयीचं होणार असलं तरी ते नाकारणं योग्यही नव्हतं. त्यामुळे फॅमिली शिफ्टिंग महिनाभर पुढे ढकलून ते जूनमधे करायचं असं ठरवलं आणि एप्रिलमधे मी एकटाच माधवनगरला जाऊन ब्रॅंचमधे हजर झालो.

अर्थात हा निर्णय केवळ कर्तव्यापोटी आणि कोणत्याही नफा-नुकसानीचा विचार न करता आम्ही मनापासून घेतला होता हे खरं, पण या सर्व घटना याच क्रमाने घडण्यात आमची नकळत का होईना पण खूप मोठी दीर्घकालीन सोय आणि फायदा लपलेला होता याचा अनुभव पुढे लगेचच आला. परमेश्वरी कृपाच वाटावी असं ते सगळं आपसूक आणि अचानक घडत गेलं होतं! त्या पुढच्या सगळ्याच घटनांचा शुभसंकेतच असावा अशी एक घटना मी माधवनगरला चार्ज घेतला त्या पहिल्याच दिवशीच घडली!!

मी शाळकरी वयात किर्लोस्करवाडीला असताना श्री. भ. रा. नाईकसर आम्हाला ‘किर्लोस्कर हायस्कूल’मधे मुख्याध्यापक होते. बाबांच्या निवृत्तीनंतर किर्लोस्करवाडी सोडून आम्ही साधारण  १९६७-६८ मधे माझ्या कॉलेजशिक्षणाच्या सोयीसाठी मिरजेला रहायला आलो होतो. त्यामुळे नंतरची सलग २२-२३ वर्षे आमचा सरांशी संपर्कच राहिला नव्हता. मी माधवनगरला जाॅईन झालो त्या पहिल्याच दिवशी मी मस्टरवर सही करण्यापूर्वीच ‘मे आय कम इन सर’ म्हणत, हातात बचत खात्याचा अकाउंट ओपनिंग फॉर्म घेऊन भ. रा. नाईकसर माझ्या केबिनच्या दारात उभे राहिले! मी मान वर करुन पाहिलं न् सरांना पहाताच अदबीने उठून उभा राहिलो.

“सर, तुम्ही.. ?” मी आश्चर्याने विचारलं.

“तू.. तू.. हो.. लिमये.. अरविंद लिमये.. हो ना?” त्यांचा अनपेक्षित प्रश्न!

“हो सर.. या.. बसा ना सर” मी शिपायाला बोलावून पाणी आणायला सांगितलं.

“सर, तुम्ही इतक्या वर्षांनंतर भेटूनही मला नावासकट कसं काय ओळखलंत?” मी विचारलं.

“तुला पहाताच कशी कुणास ठाऊक मला तुझ्या बाबांची आठवण झाली आणि मी तुला ओळखलं. त्यांना आणि त्यामुळेच तुम्हा भावंडानाही मी विसरलो कुठे होतो?” ते म्हणाले.

माझ्या बाबांबद्दल सरांच्या मनात किती आदर होता हे आणि त्यामागचे ऋणानुबंधही सरांशी नंतर सातत्याने होणाऱ्या भेटींमधील गप्पांमधून मला प्रथमच समजले होते.

योगायोग असा की या ब्रॅंचमधला माझा तो पहिला दिवस हाच सरांचा त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकीर्दीतला अखेरचा दिवस होता! माधवनगरच्या ‘शेठ रतिलाल गोसलीया हायस्कूल’ मधून सर त्याच दिवशी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होणार होते. त्यांचे पेन्शन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे अनिवार्य होते आणि जवळची बँक म्हणून सर त्यादिवशी सकाळीच आमच्या बँकेत आले होते. नॉर्मल रुटीननुसार सर परस्पर खाते उघडून बाहेरच्या बाहेर गेलेही असते, पण खात्यावर त्यांना ओळखणाऱ्या एखाद्या खातेदाराची सही आवश्यक होती ज्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे काऊंटरवरील क्लार्कने त्यांना सांगितल्यामुळे त्यांची अडचण दूर करायची विनंती करण्यासाठी सर माझ्या केबीनमधे आले होते. मी इन्ट्राॅड्युसर म्हणून स्वत:च त्या फाॅर्मवर सही केली आणि तो फाॅर्म न् पैसे शिपायाकडे देऊन त्याला नवीन खात्याचे पासबुक तयार करुन आणायची सूचना दिली.

गोष्ट तशी अगदी साधीच पण त्या क्षणाचा विचार करता सरांच्यादृष्टीने अतिशय मोलाची. मी पासबुक त्यांच्या हातात दिलं तेव्हा त्याकडे ते क्षणभर अविश्वासाने पहातच राहिले.

“तुझे कसे आभार मानावेत तेच समजत नाहीये” ते म्हणाले.

“आभार कशाला मानायचे सर?तुम्ही आशिर्वाद द्यायचे”

सर समाधानाने हसले. माझे हात अलगद हातात घेऊन त्यांनी मला थोपटलं. म्हणाले, “इथे तुझी भरभराट होणाराय लक्षात ठेव. बघशील तू. माझे आशिर्वाद आहेत तुला…!”

त्यांचे अतिशय प्रेमाने ओथंबलेले ते शब्द ऐकले आणि मला माझे बाबाच आशीर्वाद देतायत असा भास झाला… !

सरांनी‌ मनापासून दिलेल्या आशिर्वादाचे ते शब्द सरांच्या मनातल्या तत्क्षणीच्या भावना व्यक्त करीत होते हे खरेच पण त्याच शब्दांत नजीकच्या भविष्यकाळात घडू पहाणाऱ्या अनेक उत्साहवर्धक घटनांचे भविष्यसूचनही लपलेले होते याचा प्रत्ययही मला लवकरच येणाराय याची मात्र मला त्याक्षणी पुसटशीही कल्पना नव्हती.. !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments