सौ.अस्मिता इनामदार
मनमंजुषेतून
☆ तांदळाचे दगाबाज मोदक – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆
आत्तापर्यंत 1760 रीळं पाहून आणि शंभर रेसिप्या वाचून उकडीचे मोदक म्हणजे हातचा मळ वाटू लागले. मग डी मार्टमधून तांदळाचं पीठ आणलं. उकळत्या पाण्यात चमचाभर गावरान तूप आणि मीठ घातलं. चमच्याने हलवून तांदळाचं पीठ कालवलं. झाकून ठेवलं. कोमट झाल्यावर परातीत काढून हाताने मळलं. गोळ्यावर पातेलं पालथं घालून ठेवलं.
नारळ फोडण्याचे विविध विधी.
आधी नारळाच्या सगळ्या शेंड्या काढून त्याखाली त्याचे जे दोन डोळे आणि ओठ असतात ते मोकळे केले. नारळाच्या तोंडात सुरी घालून गोल फिरवली. नारळाचं पाणी चहाच्या गाळणीने पातेल्यात गाळून घेतलं. मग ओट्यावर नारळ धरून लाटण्यानं मारलं. मग बाल्कनीच्या कठड्याच्या भिंतीवर नारळाला आपटलं. मग जाड्या कडप्प्यावर धरून आपटलं. मग जिना उतरून खाली गेले आणि पेवमेंट ब्लॉकवर नारळ ठेवून वरून दगडाने ठोकलं.
हातोडी, दगड, उलथने, सुरी, लाटणे सर्व हत्यारांच्या मदतीने नारळाचे सविस्तर विच्छेदन केले. मग कुणीतरी सांगितल्यानुसार खोबरे सहजपणे निघावे म्हणून नारळाचे तुकडे गॅसवर ठेवले.
करवंटीवरचे उरलेसुरले धागे जळू लागले आणि चमत्कारिक वास सुटला. भयंकर हिंसाचारानंतर नारळाचे तुकडे ताटात पडले.
माझ्याकडे नारळाची खोवणी नाही. खोवणी हा शब्द मला खोबणी या शब्दासारखा वाटतो. आणि मला डोळ्याच्या खोबणीत सुरी घालायची भीती वाटते; त्यामुळे मी ती खरेदी करत नाही
त्यामुळे चाकूने नारळाच्या पाठीवरचे कडक सालटे सोलून काढले. मग ते गुळगुळीत पांढरे खोबरे किसणीवर बारीक किसून घेतले. त्यात गूळ, विलायचीचा चुरा, जायफळाचा किस घालून जाड बुडाच्या कढईत शिजवले.
त्यानंतर पातेल्याखाली दडवलेला पांढरा गोळा बाहेर काढला. हाताला तूप लावून त्यातला छोटा गोळा घेतला. तो हातावर थापतानाच कडेने फाटू लागला. त्याला मऊ पण यावा म्हणून त्यात दूध आणि साय घातली. तर ते जास्तच पातळ झालं. लाटता लाटता तुटू लागलं. मग ते विसविशित, भुसभुशीत द्रव्य हातावर धरून थापटून थापटून चपटं केलं. मध्यभागी दाबून त्याच्यात नारळाचे सारण भरावे म्हणून चमचा सारणाच्या कढईत घातला तर सारण दगडासारखे कडक होऊन बसले होते.
मग हातातली पुरी बाजूला ठेवून सारणात दूध आणि साय घातली. पुन्हा एकदा गॅसवर ठेवून हलवा-हलवी सुरू केली. सारण पातळ दिसू लागलं. मग त्यावर बाजारातून आणलेला खोबऱ्याचा चुरा टाकला. पुन्हा एकदा हलवून घेतलं. थोडं मऊ झाल्यानंतर एका चमच्याने ते पुरीवर ठेवले. पण ते गरम असल्यामुळे पुरी चिकटली नाही. कडक सारणामुळे ती फुटू लागली. काही केल्या सारण आणि पारी एकत्र नांदायला तयार होईनात.
एका बाईप्रमाणे मोदकाला कळ्या पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण कळ्या तुटून हातात येऊ लागल्या. आता या कळ्यांचा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा की काय असे वाटू लागले. मोदकाची पारी लाटेपर्यंत सारण पुन्हा-पुन्हा कडक होऊ लागले. मला वस्तूच्या आकाराचा मोह नाही पण वस्तूला कुठलातरी एक आकार तर दिला पाहिजे की नाही…. पण मोदक कुठलाच आकार धरायला तयार होत नव्हते.
आता पारीच पाहू का सारणाचं पाहू…. असं करता करता “एक तरफ उसका घर एक तरफ मैकदा… ” अशी अवस्था झाली. मग गमे जिंदगीतून सुटका मिळवण्यासाठी मी एका ताटाला तूप लावलं. आणि पुन्हा एकदा सारण गरम करून पटकन ताटात ओतलं आणि बाळाला झोपवण्यासाठी घाई-घाईने थोपटावं तसं थापलं. सुरेख नारळी वड्या तयार झाल्या. पांढऱ्या पिठाच्या पातळ पातळ भाकरी थापून भाजल्या. अशाप्रकारे भाकरी आणि नारळी वड्या असे दोन उपपदार्थ तयार झाले.
ज्या बायका कळीदार मोदक तयार करतात त्यांनी छान छान व्हिडिओ टाकून आम्हाला नादी लावू नये ही नम्र विनंती. तुम्ही तुमच्या घरात करून खा की. आम्हाला का मनस्ताप मोगरा जाई जुई च्या कळ्यांचा गजरा करून डोक्यात घालावा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा पण शहाण्या बाईने मोदकाच्या कळ्यांच्या नादी लागू नये.
लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.
संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈